किडनी स्टोन झाल्यावर काय दिसतात लक्षणे, यांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 05:50 PM2022-08-18T17:50:24+5:302022-08-18T17:52:30+5:30
Kidney Stone Symoptoms : खरंतर हा त्रास होऊ नये यासाठी आधीच याची लक्षणे काय असतात याकडे लक्ष देणे फायद्याचे ठरेल. जेणेकरुन वेळेवर उपचार घेऊन ही समस्या दूर करता येईल. चला जाणून घेऊया किडनी स्टोनचे काही संकेत.
Kidney Stone Symptoms : खाण्या-पिण्यातील अनियमीतता आणि आवश्यक तेवढं पाणी न पिणे हे किडनी स्टोन होण्याचं मुख्य कारण आहे. मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन अनेकांना होतो पण काहींच्या किडनीमध्ये तयार झालेला स्टोन सहज बाहेर पडतो. मात्र, काहींचा स्टोन मोठा असल्याने तो बाहेर पडण्यास अडचणी येतात. त्यामुळे काही लोकांना फार जास्त त्रास सहन करावा लागतो. खरंतर हा त्रास होऊ नये यासाठी आधीच याची लक्षणे काय असतात याकडे लक्ष देणे फायद्याचे ठरेल. जेणेकरुन वेळेवर उपचार घेऊन ही समस्या दूर करता येईल. चला जाणून घेऊया किडनी स्टोनचे काही संकेत.
सुरुवातीची लक्षणे
किडनी स्टोनमुळे पाठीच्या खालच्या भागात फार जास्त वेदना होतात. हा त्रास काही तास किंवा काही मिनिटांसाठीही होऊ शकतो. यात वेदना होण्यासोबतच जीव मळमळणे किंवा ओमेटींगही होऊ शकते. खूप जास्त घाम येणे, लघवी करताना त्रास होणे असेही प्राथमिक लक्षणे आहेत.
लघवीतून रक्त
किडनी स्टोनची समस्या असणाऱ्या लोकांना नेहमी गुलाबी, लाल रंगाची लघवी येऊ लागते. आणि स्टोनचा आकार वाढल्याने मूत्रमार्ग ब्लॉग होतो. किडनी स्टोन झालेल्या लोकांच्या लघवीतून कधी कधी रक्तही येतं.
सतत लघवीला जावे लागणे
किडनी स्टोनने ग्रस्त लोकांना सतत त्रास होण्यासोबत लघवीला जावं लागतं. असं किडनी स्टोन मूत्रमार्गातून मूत्राशयात गेल्यावर होतं. ही गोष्ट फारच त्रासदायक असते. यामुळे असह्य असा त्रास होतो.
पाठदुखी
तीव्र वेदना होणं ही कि़डनी स्टोनने ग्रस्त लोकांसाठी सामान्य बाब आहे. खासकरुन कंबर आणि कबंरेखालील भागात खूप जास्त असह्य वेदना होतात. या वेदना काही मिनिटांसाठी किंवा काही तासांसाठीही होऊ शकतात.
मळमळ होणे आणि ओमेटींग
पोटात कसंतरी होणे आणि मळमळ होणे हे किडनी स्टोनचे सुरुवातीचे संकेत आहेत. अनेकदा ओमेटींगही होते.
लघवीतून दुर्गंधी येणे
किडनी स्टोन झाल्यास लघवीचा रंग लालसर येतो आणि दुर्गंधीही येते.
बसल्यावर वेदना होणे
किडनी स्टोन वाढल्याने त्या भागात वेदना होऊ लागतात. त्यामुळे त्या लोकांना बसायला त्रास होतो. इतकेच काय तर ते कधी कधी आरामात झोपूही शकत नाही.
ताप येणे आणि थंडी लागणे
किडनी स्टोनमुळे अनेकदा ताप येणे, थंडी वाजणे या समस्याही होतात. अशावेळी लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
किडनी आणि पोटावर सूज येणे
मोठ्या आकाराचे स्टोन हे मूत्रमार्ग ब्लॉक करतात. त्यामुळे किडनीवर वेदना देणारी सूज येते. त्यासोबतच पोट आणि कंबरेच्या भागातही सूज येते.