ताप, सर्दी-खोकला, रोगांना बसेल आळा; आला पावसाळा अशी तब्येत सांभाळा...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 02:14 PM2024-06-07T14:14:58+5:302024-06-07T14:18:50+5:30
बदलत्या वातावरणाचा नकळतपणे आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो.
Health Tips For Rainy Season : बदलत्या वातावरणाचा नकळतपणे आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. पावसाळ्यामध्ये आपल्याला शरीराची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. विशेषत: पावसाळ्यात ताप, सर्दी-खोकला तसेच मलेरिया, डेंग्यू, त्वचेची अॅलर्जी यांसारखे आजार उद्भवतात.
दरम्यान, अजून तरी पाऊस सुरू झालेला नसला तरी अनेकजण हवामान बदलाच्या समस्येने त्रस्त आहेत. सध्या देशभरात काही ठिकाणी मान्सूनचं आगमन झालं आहे तर काही ठिकाणी पावसाची चाहूल लागण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे या सीझनमध्ये अनेकजण ट्रिपला जायचे प्लॅन बनवतात. त्यात बाहेरचं खाणं आलंच. थंड वातावरणात गरमागरम वडापाव, भजींवर ताव मारणं कोणाला आवडत नाही. पण त्याचा नकळतपणे आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. थंड, जिव्हाळ्याचा तसेच आनंददायी वाटणारा पावसाळा ऋतू आपल्यासोबत अनेक आजारही घेऊन येत असतो. त्यामुळे या ऋतूमध्ये आजारांना दूर ठेवण्यासाठी खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
इम्यूनिटी वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे-
पावसाळ्यामध्ये आपल्या आहारामध्ये इम्यूनिटी बुस्टर म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या अन्नपदार्थांचा समावेश करावा. उदा. ब्रोकली,गाजर, हळद,आले-लसूण या पदार्थांचा समोवश आहारात करावा. आले आणि लसूणमध्ये अॅंटीबॅक्टेरिअल गुणधर्म आढळतात ज्यामुळे सर्दी, खोकला तसेच ताप यांसारख्या आजारांना आळा बसतो.
त्वचेची अशी घ्या काळजी-
मुख्यत: पावळ्याच्या सीझनमध्ये स्कीन अॅलर्जीच्या समस्या निर्माण होतात. अशावेळी बाहेर पावसात जाऊन भिजणं टाळावं, त्याचबरोबर ओले कपडे जास्त वेळ अंगावर ठेवू नयेत त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकतं.
पाणी उकळून प्यावं-
या ऋतूमध्ये दूषित पाण्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण जास्त असतं. त्यामुळे पावसाळ्यात पाणी नेहमी उकळून, गाळूण प्यावं असा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देतात. दूषित पाण्यामुळे उलट्या, जुलाब, कावीळ यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात.