काही केल्या वजन कमी होईना? सकस आहार, दैनंदिन व्यायामाचं सूत्र ठरेल फायदेशीर; वाचा टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 01:32 PM2024-06-05T13:32:19+5:302024-06-05T13:34:52+5:30
वाढत्या वजनामुळे नागरिकांमध्ये लठ्ठपणा येत आहे. त्यामुळे आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
Health Tips : वाढत्या वजनामुळे नागरिकांमध्ये लठ्ठपणा येत आहे. त्यामुळे आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे जागतिक आरोग्य संस्थेने लठ्ठपणा हा आजार असल्याचे घोषित केले आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते लठ्ठपणा हा सर्व आजारांचा राजा असल्याचे सांगितलं गेलं आहे. वजन वाढत असेल तर तुमची दिनचर्या, आहार व व्यायाम यामध्ये योग्य समतोल राखणे खूप आवश्यक आहे. कुठल्याही एका गोष्टी मध्ये बदल करून चालणार नाही, त्याचा काहीही परिणाम होत नाही.
सकाळी काय खाल?
सकाळचा आहार हा दिवसभरातील आहारापेक्षा अधिक पोषक व जास्त प्रमाणात घेणे आवश्यक आहे. शिवाय तो प्रथिनयुक्त असणे आवश्यक आहे जसे की मोड आलेले कडधान्य, मूग डाळ, बेसन, तेलबिया, दूध व दुधाचे पदार्थ यांचा समावेश असणारा असावा. कुठलाही आहार घेताना तो फायबर युक्त असावा. असं तज्ज्ञ सांगतात.
रात्रीच्या जेवणात काय असावे?
पण रात्रीचे जेवण करताना काही गोष्टींचे कटाक्षाने पालन करणे गरजेचे आहे. रात्रीचा आहार पूर्ण दिवसाच्या आहारापेक्षा हलका असावा. त्यामध्ये भाकरी, भाजी, सॅलड असेल तर उत्तमच आहे. रात्री भात नाही खाल्ला तर एक वेळ चालेल पण डाळीचा समावेश रात्रीच्या आहारात नक्की केला पाहिजे. त्याचबरोबर रात्रीचे जेवण ८ वाजण्यापूर्वी घेणे योग्य आहे. अशा पद्धतीने रात्रीचे जेवण घेतल्यास झोप चांगली लागते व ते सहज पचते.
दुपारच्या जेवणात काय घ्यावे?
ज्यांना शक्य असेल तर भाकरी भाजी सॅलड असा सुटसुटीत आहार दुपारच्या जेवणात घ्यावा. रात्रीपेक्षा भात दुपारी खाणे कधीही योग्य, असं तज्ज्ञांचं मत आहे. दुपारच्या जेवणानंतर सायंकाळी भूक लागेल तेव्हा एखादे फळ, ताक, दही, ज्वारीच्या लाह्या, सूप असा पोषक आहार घ्यावा.
असं म्हणतात, आपली जीवनशैली सक्रिय असणे आवश्यक आहे. रोज ३० मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. असे केल्याने आरोग्य सबाधित राहते.
फावळ्या वेळेत इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटचा कमी वापर करावा. जास्त वेळ एका ठिकाणी बसून राहणे टाळावे. त्यामुळे वजन वाढण्याचे चान्सेस जास्त असतात.
लठ्ठपणापासून बचाव करण्यासाठी जैविक घडीचे अनुसरण करा. सकाळी लवकर उठणे व रात्री लवकर झोपल्याने हार्मोन्स नियंत्रणात राहतात. त्यामुळे चयापचयाच्या क्रिया चांगल्या राहतात. या सर्व गोष्टींचे व्यवस्थित अनुसरण केल्यास निश्चित वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल व आपले आरोग्य चांगले राहण्यास उपयोगी ठरेल.
हे खाणे टाळा-
तेलकट, खारवलेले पदार्थ, रेडी टू इट, बेकरी पदार्थ, कोल्ड्रिंक्स, आइस्क्रीम, मद्यपान हे टाळावे.