डिहायड्रेशनची लक्षणे काय; उष्माघाताचा त्रास उद्भवल्यास अशी घ्या काळजी, काय सांगतात तज्ज्ञ...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 03:22 PM2024-06-01T15:22:44+5:302024-06-01T15:27:43+5:30
मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशभरातील तापमानात कमालीची वाढ झाली असून नागरिक हैराण झाले आहेत.
Health tips : मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशभरातील तापमानात कमालीची वाढ झाली असून नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे आता काहींना उन्हामुळे डोकेदुखी आणि अतिसाराचा त्रास होत असल्याच्या तक्रारी दिसून येत आहेत. तर काही जण घसादुखीच्या समस्येने त्रस्त आहेत. मात्र, याला विषाणूचा संसर्ग जबाबदार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचं मत आहे.
विषाणूच्या संसर्गामुळे घसादुखीच्या तक्रारी निदर्शनास येत आहेत. त्यामुळे डिहायड्रेशनची लक्षणे जाणवल्यास वेळीच त्यावर उपचार केले पाहिजे. स्वतःहून उपचार करून घेण्याचा अट्टहास टाळावा. अतिउष्णतेमुळे अतिसार आणि डोकेदुखी होत असल्याच्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय. कारण मोठ्या प्रमाणात घाम येऊन शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे शरीरातील क्षार कमी होतात. आपसूकच त्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. परिणामी, चक्कर येणे, मळमळ होणे या आजारांचा सामना करावा लागतो. यासाठी रस्त्यावर उपलब्ध असणाऱ्या शीतपेयांचे सेवन करू नये, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
उष्माघाताचा त्रास उद्भवल्यास हे करा?
१) पायाखाली उशी किंवा तत्सम काही ठेवून रुग्णाला आडवे झोपण्यास सांगावे.
२) त्रास झालेल्या व्यक्तीला लगेच घरात, सावलीच्या ठिकाणी बसवावे.
३) थंड पाण्याच्या पट्ट्यांचा वापर करावा. सैल कपडे वापरावेत.
४) उलटी होत असल्यास त्यांना एका कुशीवर वळवावे.
५) उष्माघातासारखे वाटल्यास जवळच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा किंवा डॉक्टरचा सल्ला घ्यावा.
अशी काळजी घ्या-
१) दुपारी घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री वापरावी.
२) दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत शक्यतो घरात राहावे.
३) पांढरे, सौम्य रंगाचे, सैलसर कपडे वापरा, डोक्यावर टोपी घाला. असं केल्यास उन्हापासून संरक्षण होईल.
४) पुरेसे पाणी प्यावे, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रव पदार्थ घ्या, त्यामुळे वारंवार घसा कोरडा पडणार नाही.
अति उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे परिणाम दिसून येत आहेत. अति उन्हामुळे उष्माघात टाळण्यासाठी लोकांनी सजग राहणं गरजेचं आहे.