Health Tips: शरीरात सात चक्र कुठे असतात आणि ती कार्यन्वित कशी करतात, ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 01:13 PM2024-10-19T13:13:52+5:302024-10-19T13:14:10+5:30

Health Tips: दिवसभर आपल्या पायाला चक्र लागलेले असते, त्यामुळे शरीरात स्थित असलेल्या चक्रांची ओळख आधी करून घेतली नसेल तर आता करून घ्या. 

Health Tips: Know where the seven chakras are in the body and how they work! | Health Tips: शरीरात सात चक्र कुठे असतात आणि ती कार्यन्वित कशी करतात, ते जाणून घ्या!

Health Tips: शरीरात सात चक्र कुठे असतात आणि ती कार्यन्वित कशी करतात, ते जाणून घ्या!

>> अस्मिता दीक्षित

मंडळी ,आजचा आपला विषय “ध्यान ,योगाभ्यास " हा सर्वपरिचित आणि बहुचर्चित असला तरीही त्याचा गाभा खूपच खोल आहे. ह्या लेखाद्वारे त्यातील काही भाग जाणून घ्यायचा हा लहानसा प्रयत्न.

आज आपले आयुष्य घड्याळ्याशी बांधले गेले आहे .रोजची कामे करतानाच जीव मेटाकुटीला येतो मग व्यायाम ,योगासने करायला वेळ आणायचं तरी कुठून असा प्रश्न आपल्याला नवीन नाही.आज मनःशांती, अनेक व्याधींवर योगाचा उपयोग होताना दिसून येतो आहे. त्यामुळे योगाचा प्रसारही तितक्याच जोमाने भारतातच नाही तर अखंड विश्वात होतो आहे. भारताबाहेरील अनेक देशातून विद्यार्थी “योग” ह्या विषयाचा भारतात येवून अभ्यास करत आहेत मग आपणही ह्यास वंचित का राहायचे?

मंडळी ,योगमहर्षी पातंजली ह्यांनी २२०० वर्षापूर्वी ह्या विषयावरील सर्वात पहिला ग्रंथ लिहिला. ह्या विषयावरील सखोल माहिती जाणून घेऊया .योगासनाचे जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे.  व्यायामाचा संबंध हा केवळ शरीराशी आहे पण योगाचा संबंध हा शरीर आणि मन ह्या दोघांशीही आहे. योगामुळे मनाचे शुद्धीकरण होते ,मनाची एक बैठक तयार होवून वारंवार विचलित होणारे मन एकाग्र होण्यास मदत होते.

योगाभ्यासाने मन स्थिर होते आणि व्यसनांवर हि मात करता येते.योगासनाचे बीज जनमानसात रोवण्यासाठी अनेक व्यक्ती आणि संस्था कार्यरत आहेत . Meditation आणि योगातील फरक नक्की काय ??  ह्या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे म्हणूनच दिवसाची सुरवात सर्वांगसुंदर व्यायामाने म्हणजेच “सूर्य नमस्काराने “ करावी .

योगाभ्यास करताना शरीरातील Anatomy चे ज्ञान असणे तितकेच गरजेचे आहे. आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचे काय तर पाठीचा कणा आणि तो सुधृढ ठेवण्यासाठी हस्तपादासन , धनुरासन,परिवर्तीत चक्रासन ,वक्रासन ,ताडासन आणि सर्वांगासन हि आसने नित्य करावीत..कपालभाती ह्या आसनाने पचनक्रिया सुधारते त्यामुळे तेही रोज केले पाहिजे. आपल्या शरीरात ७२००० नाड्या आहेत आणि त्यातील मुख्य ३ म्हणजे इडा, पिंगला आणि सुषुम्ना ह्या होत. नाडी म्हणजे काय ते आधी समजून घेवूया .नाडी म्हणजेच नलिका जी आपल्या शरीरातील प्राणशक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेते .ह्या नाड्या जेव्हा आतून ब्लॉक होतात तेव्हा आपण आजारी पडतो ,त्या आतून मोकळ्या राहण्यासाठी प्राणवायू योग्य प्रकारे फिरता राहण्यासाठी अनुलोम विलोम हे प्राणायाम अतिशय प्रभावशाली आहे मानले गेले आहे . नियमित योगाभ्यासाने आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. 

“शरीरातील चक्रे” महत्वाची आहेत . ह्या चक्रांना “Power Centers ” म्हणूनही संबोधले जाते. मेंदूमध्ये ज्या पेशी असतात त्याच ह्या चक्रांमधेही असतात. ह्यातील ५ चक्रे हि पाठीच्या कण्यात ६ वे दोन्ही भुवयांमध्ये आणि ७ वे टाळूच्या ठिकाणी असते. कमळाचे फुल हे ह्या चक्रांचे बोधचिन्ह असून प्रत्येक चक्राला विशिष्ठ पाकळ्या दिल्या आहेत.

"मूलाधार चक्र" पाठीच्या कण्याच्या टोकाशी असते . हे शक्तिस्थान समजले जाते आणि  तांबडा रंगाच्या कमळाच्या ४ पाकळ्या डोळ्यासमोर आणल्या तर ते जागृत होते. त्याच्यावर २ इंचावर sex organs च्या मागे पाठीच्या कण्यात असते ते "स्वाधिष्ठान चक्र" ज्याकडे मलमूत्र विसर्जनाचा कंट्रोल असतो .नारिंगी रंगाच्या ६ पाकळ्या डोळ्यासमोर आणल्या कि हे चक्र जागृत होते. बेंबीच्या मागील बाजूस कण्यात "मणिपूर चक्र" आहे . ह्या चक्राचा पोटातील स्वादुपिंड, लिव्हर,लहान आणि मोठे आतडे ह्यावर कंट्रोल असतो .पिवळ्या रंगाच्या १० पाकळ्या डोळ्यासमोर आणल्या तर हे चक्र जागृत होते.

आपल्या हृदयाच्या मागे असते ते अनाहत चक्र. दोन वस्तू एकमेकांवर आपटल्यावर जो ध्वनी निर्माण होतो त्यास संस्कृत मध्ये “आहत” म्हणतात .पण इथे दोन वस्तू एकमेकांवर आपटत नसूनही “ ठक ठक ” असा आवाज ऐकू येतो म्हणून त्यात “अनाहत चक्र " म्हणून संबोधले जाते. हिरव्या रंगाच्या १२ पाकळ्या डोळ्यासमोर आणल्या कि हे चक्र जागृत होते. आणि म्हणूनच Operation करताना सर्वत्र हिरव्या रंगाचा उपयोग करतात जसे डॉक्टरांचा मास्क ,तेथील पडदे ई. त्यानंतर येते ते “विशुद्धी चक्र” जे आपल्या घश्याच्या मागील बाजूस असते आणि त्याचा कंट्रोल “Endocrine , Thyroid , Parathyroid glands ” वरती असतो ज्याच्यामुळे शरीरातील चयापचय क्रिया ज्याला आपण Metabolism  म्हणतो व्यवस्थित पार पडतात .आकाशी निळ्या रंगाच्या १६ पाकळ्या डोळ्यासमोर आणल्या कि हे चक्र जागृत होते. वरील उल्लेखलेली ५ चक्रे पाठीच्या कण्यात असतात. ६ वे चक्र “ आज्ञा चक्र " हे दोन भुवयांच्या मध्ये म्हणजेच शंकराचा तिसरा डोळा म्हणतो त्या जागेवर असते. पारवा म्हणजे Ash रंगाच्या २ पाकळ्या डोळ्यासमोर आणल्या कि हे चक्र जागृत होते, ह्याचा थेट संबंध आपल्या मनाशी आहे.

मंडळी ,वर उल्लेखलेल्या इडा, पिंगला आणि सुषुम्ना ह्या नाड्या मूलाधार चक्रापासून सुरु होवून प्रत्येक चक्राशी एकत्र येतात..इडा हि नाडी शरीराच्या डाव्या भागातून, पिंगला हि उजव्या आणि सुषुम्ना हि पाठीच्या कण्यातून वरती येते. ह्या सर्व नाड्या आज्ञा चक्राशी येवून थांबतात आणि फक्त सुषुम्ना हि नाडी पुढे टाळूपर्यंत जाते जिथे असते “सहस्रार चक्र”. जांभळ्या रंगाच्या हजार पाकळ्या डोळ्यासमोर आणल्या कि हे चक्र जागृत होते. हे चक्र हा मेंदूचाच एक भाग असून ते आपले संपूर्ण शरीर कंट्रोल करते. आपल्याला जे अतिंद्रिय ज्ञान मिळते ते ह्याच चक्रातून. मंडळी हि चक्रे रोजच्या नित्य सरावाने ध्यानाने जागृत होतात. योगासनामध्ये गरज असते ती संयमाची आणि एकाग्रतेची.              

बरेचदा गल्लत होते ती प्राणधारणा आणि ध्यानधारणा ह्यात. आपल्या शरीरात ५ प्राण आहेत. प्राण, अपान ,व्यान, समान, उदान. हे ५ प्राण ज्याला आपण पंचप्राण म्हणतो . ते आहेत तोवर आपण जिवंत आहोत. हे शरीरात वायुरूप अवस्थेत असतात. हे शरीरात राहण्यासाठी ३ गोष्टींची प्रामुख्याने गरज असते ती म्हणजे पाणी ,अन्न आणि Oxygen. काही क्षण जरी आपल्या शरीरास श्वास बंद झाला तर Oxygen मिळत नाही. ह्या Oxygen मधेच प्राण आहे म्हणून त्यावर मन एकाग्र करणे म्हणजेच “प्राणधारण “.

कुठल्यातरी Object किंवा आपल्या आराध्याच्या चित्रावर संपूर्ण लक्ष्य केंद्रित करणे म्हणजे ध्यान करणे. ध्यानाने आपल्या शरीरातील ७ चक्रे जागृत होत जातात  आणि आपल्याला अंतर्बाह्य अनुभूती प्राप्त होते. मूलाधार चक्राशी निर्दिस्त अवस्थेत असलेली कुंडलिनी शक्ती हि प्रयत्नांतीच जागृत होते आणि त्याला नित्य साधनेची गरज असते .ध्यानधारणा करताना काही दिवस पहिल्या चक्रावर संपूर्ण लक्ष्य केंद्रित करावे .कालांतराने ते जागृत होते आहे हे जाणवले कि मग पुढील चक्राकडे वळावे . ध्यानधारणा ,योगासने हि आपल्या मनाने किंवा पुस्तके वाचून न करता योग्य शिक्षकाकडून शिकून घेणे चांगले. योगासने ,ध्यान करताना शरीरावर आणि मनावर कुठलाही ताण असू नये ,मन शांत असले पाहिजे. योगासने हि उरकून टाकण्याची गोष्ट नाही. ती शांतपणे ,संथ ,लयबद्ध असली पाहिजेत ,हालचालीत सुसूत्रता आणि मोहकता असली पाहिजे तरच त्याचा योग्य परिणाम अपेक्षित आहे.

मंडळी, प्रातः समयी उठून योगासानासाठी काही वेळ दिला तर आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य संतुलित राहील ह्यात वादच नाही .आजकाल आपल्या बिघडलेल्या जीवनपद्धतीमुळे सर्व वयाच्या लोकांमध्ये प्रामुख्याने दिसून येणारा आजार म्हणजे “ मधुमेह”. आपल्या शरीरातील स्वादुपिंडातील बीटासेल इन्शुलीन ची निर्मिती करतात आणि ते पुरेसे तयार झाले नाही तर “मधुमेह” होतो. कपालभाती च्या नियमित सरावाने बीटासेल ची निर्मिती होवून मधुमेह टाळता येवू शकतो ,तसेच आपल्या शरीरातील Joints मधेही काही प्रमाणत इन्शुलीन तयार होते त्यामुळे नियमित व्यायाम , चालणे ह्यामुळे हे सर्व आजार आटोक्यात आणता येतात.

शास्त्रात आरोग्याची पंचसूत्री सांगितलेली आहे ती म्हणजे आनुवंशिकता , आहार, विहार ,विश्रांती , वातावरण. अनुवांशिकता आणि वातावरण हे आपल्या सर्वार्थाने हातात नाहीत पण आहार ,विहार आणि विश्रांती आपल्या नक्कीच हातात आहे. अत्यंत सात्विक ,परिपूर्ण पोषक असा आहार घेणे, दिवसभरातील सर्व क्रिया करताना निदान काही वेळ व्यायामास आणि स्वतःसाठी देणे म्हणजेच विहार आणि निदान ६ ते ८ तास पुरेशी झोप घेणे हे केले तर आपले आरोग्य उत्तम राहायला नक्कीच मदत होते. योगसाधनेच्या रोजच्या सरावामुळे बुद्धी एकाग्र होते ,प्रत्येक काम कुशलतेने होते प्रत्येकाने अगदी लहानपणापासून योगाला आपल्या जीवनात महत्व दिले पाहिजे.ह्यामुळे आपले आयुष्य संतुलित राहते.

शरीरातील अनेक आजारांचे मूळ हे आपल्या विचारात असते. डोक्यात वर्षानुवर्षाचे  केलेल्या फालतू निरर्थक विचारांचे थर जमा होतात आणि मग पुढे जावून ते अनेकविध व्याधिना जन्माला घालतात . त्या विचाराना आपल्या मनाबाहेर अक्षरश फेकून देवून मन शांत केले तर आजार सुद्धा आपली साथ सोडून पळून जातील हे नक्की आणि ह्याला एकच साधा सोपा पर्याय म्हणजे योगाभ्यास .

तर सारांश असा की आपल्याला विधात्याने दिलेले हे सुंदर आयुष्य जर अखेरपर्यंत आनंदात जगायचे असेल तर आपली तब्येत उत्तम असणेही तितकेच गरजेचे आहे, आयुष्याची सुरवात जितकी आनंदात तितकीच आयुष्याची संध्याकाळ सुद्धा त्याहीपेक्षा आनंदात, शांततेत जावी ह्यासाठी आपल्याला योगाभ्यास नक्कीच उपयुक्त ठरतो. चलातर मग आजपासूनच साधनेस सुरवात करुया ..शुभस्य शीघ्रम.

संपर्क : 8104639230

Web Title: Health Tips: Know where the seven chakras are in the body and how they work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.