Health Tips: दिवाळी झाली आता साखर कमी करण्याची सुरुवात करा चहाचे 'हे' पर्याय वापरून!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 07:00 AM2023-11-17T07:00:00+5:302023-11-17T16:05:34+5:30
Health Care tips: साखर कमी करायची म्हटली की आपल्याला दिवसभरात प्यायला जाणारा चहा आठवतो, त्याला पर्यायी हे प्रयोग करून बघा!
वजन कमी करणे असो किंवा मधुमेह, रक्तदाबावर नियंत्रण आणायचे असो, डॉक्टर त्याची सुरुवात चहा सोडा हे सांगण्यापासून करतात. एकतर दुधाने पित्ताशयाचा अर्थात ऍसिडिटीचा त्रास होतो आणि दुसरी बाब म्हणजे साखरेने वजन वाढते. काही जण कोरा चहा पितात. तरी त्यातून साखर पोटात जातेच. त्यावर पर्यायी व्यवस्था म्हणून चहाचा हा प्रकार!
नित्याची सवय बनलेला चहा एकएक सोडणे शक्य होत नाही. त्याची सुरुवात करायची, तर आधी चहापानाच्या वेळेची संख्या कमी करावी. दिवसातून चार वेळा चहा घेत असाल तर सुरुवातीला, तीन, मग दोन, मग एक असे करत संख्येत घट करावी. नंतर नंतर चहाच्या ऐवजी पर्यायी व्यवस्था म्हणून आले लिंबूचे पाचक जसे पाण्यातून घेतो, तसाच आल्याचा अर्क आणि लिंबाचा रस वापरून त्यात पुढील घटकांचा समावेश करावा.
साहित्य:
अडीच कप पाणी
२ टी बॅग्स/ चहा पावडर
२ ते ३ चमचे मध
लिंबाच्या २ चकत्या
१/२ इंच आलं
कृती:
१) आल्याच्या पातळ चकत्या कराव्यात.
२) पातेल्यात पाणी घेउन त्यात आल्याच्या चकत्या घालाव्यात. उकळून घ्यावे.
३) कपमध्ये ओतून त्यात मध मिक्स करावा. कपात प्रत्येकी एक लिंबाची चकती आणि टी बॅग घालावी किंवा चहा पावडर टाकून एक उकळी काढावी आणि चहा गाळून घ्यावा.
४) चमच्याने ढवळून कोमटसर चहा प्यावा.
५) यामध्ये पुदिन्याची किंवा तुळशीची पाने पाण्यात उकळताना घालू शकता. त्याची चव छान लागते आणि औषधी गुणधर्म शरीराला लाभदायक ठरतात.
त्यामुळे आता चहा कसा सोडू ही सबब देणे बंद करा आणि आलं लिंबाचा चहा सुरू करा!