विड्याचे पान खा, सर्दी-खोकला पळवा; आरोग्य, सौंदर्य वाढवण्यासाठी उपयुक्त, जाणून घ्या फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 03:45 PM2024-07-31T15:45:38+5:302024-07-31T15:50:13+5:30
विड्याचे पान जेवणानंतर खाण्याची प्राचीन काळापासूनची परंपरा आहे.
Benefits Of Betal Leaves : नागवेलीची पाने म्हणजे खाण्याचे पान किंवा विड्याचे पान. जेवणानंतर पान खाण्याची प्राचीन काळापासूनची परंपरा आहे. आजीबाईच्या बटव्यातही विड्याच्या पानाचा आवर्जून समावेश असतो. विड्याच्या पानात अनेक गुणधर्म असल्याने ते आरोग्यासाठी आणि सौंदर्य वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.
विड्याच्या पानाने तोंडाची चव वाढते, दुर्गंधी निघून जाते, सर्दी व खोकल्यावर विड्याचे पान गुणकारी आहे. विड्याचे किंवा नुसते पान चावून खाल्याने आतडे निरोगी राहतात. विड्याचे पान उष्ण असल्याने ते वात आणि कफ विकारांवर गुणकारी ठरते.
सणासुदीच्या काळात विड्याच्या पानांना अधिक मागणी असते. चातुर्मास सुरू झाल्यावर दिवाळीपर्यंत अनेक सणवार असतात. पाने घरी पूजेसाठी आणि खाण्यासाठी सुद्धा आणतात. सध्या बाजारात नागवेलची पाने १०० रुपयांना ५० पाने असा दर आहे.
विड्याची पाने गुणकारी-
१) विड्याची पाने पोटांच्या विकारांवर गुणकारी असून, त्यांच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते. तोंडाची दुर्गंधी दूर होते. शरीरातील हनिकारक बॅक्टेरिया या पानाच्या सेवनाने कमी होतात.
२) विड्याच्या पानाचे आयुर्वेदात महत्त्व सांगितले आहे. वात व कफ विकारांवर विड्याचे पान सेवन केल्याने चांगला लाभ होतो. मात्र, ज्यांना ऍसिडीटीचा त्रास आहे किंवा ज्यांचा रक्तदाब कमी आहे त्यांनी या पानांचे सेवन करू नये. उन्हाळ्यातही विड्याची पाने कमी खावी. आपल्या प्रकृतीला विड्याचे पान योग्य की अयोग्य आहे याची खात्री करून विड्यांच्या पानांचे सेवन करावे. - डॉ. महेश अभ्यंकर, वैद्यकीय सल्लागार, औषध तज्ज्ञ
३) काही जणांच्या तोंडात बॅक्टेरिया संसर्ग झाल्यामुळे त्यांच्या तोंडाला दूर्गंधी येते. त्यासाठी तोंडाची दूर्गंधी कायमस्वरुपी घालवण्यासाठी विड्याचे पान खावे असे तज्ज्ञ सांगतात. शिवाय नागवेलीच्या पानाचा विडा तयार करताना त्यामध्ये कात, चुना, बडीशेप आणि इलायची यांसारख्या घटकांचा समावेश असावा.
४) मायग्रेन किंवा डोकेदुखीचा त्रास होत असल्यास विड्याचे पान खावे. किंवा विड्याच्या पानांचा रस करून तो डोक्यावर चोळावा. लगेचच आराम मिळतो.