हेल्थ टिप्स - पोटाचा कॅन्सर टाळता येऊ शकतो, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 08:29 AM2023-09-10T08:29:42+5:302023-09-10T08:31:52+5:30

ती स्थिती भविष्यात गंभीर होऊन अन्ननलिकेचा कर्करोगही असू शकतो. 

Health Tips - Stomach cancer is preventable, but... | हेल्थ टिप्स - पोटाचा कॅन्सर टाळता येऊ शकतो, पण...

हेल्थ टिप्स - पोटाचा कॅन्सर टाळता येऊ शकतो, पण...

googlenewsNext

डॉ. अमित मायदेव, 

रक्त, फुप्फुस आणि मुखाचा असे कर्करोगाचे प्रकार आापल्याला ज्ञात आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानामुळे या कर्करोगांवर मात करणे सोपेही झाले आहे. वैद्यकीय उपचारात प्रगती झाली तसे कर्करोगाचे प्रकारही वाढू लागले आहेत. पोटाच्या कर्करोगाचे प्रमाण गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या वाढले आहे. आधुनिक जीवनशैली आणि आहारशैली यांचा दुहेरी परिणाम पोटातील अवयवांवर होऊ लागला आहे. 

पोटाच्या कर्करोगात अन्ननलिका, जठर, स्वादुपिंड (पँक्रिया) मोठे आतडे,  यकृत (लिव्हर), पित्ताशय (गॉलब्लॅडर) इत्यादींचा समावेश आहे. त्यातही अन्ननलिकेच्या कर्करोगाचे प्रमाण देशात लक्षणीय आहे. तंबाखू सेवनाचे प्रमाण देशात खूप आहे. त्यामुळे भारतात अन्ननलिकेच्या कर्करोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. या प्रकारात अन्न गिळताना त्रास होतो. तसेच गॅस्ट्रोऑइसोफॅगल रिफ्लक्स डिसीज (जीईआरडी) सारख्या पचनाच्या विकाराने छातीत वारंवार जळजळ होते. या स्थितीत जठरात अन्न गेल्यानंतर आम्ल पुन्हा अन्ननलिकेच्या वरच्या भागात येते. ही समस्या वारंवार होत असेल तर ती स्थिती भविष्यात गंभीर होऊन अन्ननलिकेचा कर्करोगही असू शकतो. 

 स्वादुपिंडाचा कर्करोग 
स्वादुपिंडाचा कर्करोग होण्यामागचे निश्चित  कारण माहीत नाही. धूम्रपान आणि मद्यपान एकत्रित केल्यामुळे हा कर्करोग होण्याचा धोका आहे. लठ्ठपणा असलेल्या व्यक्तीना हा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. कोणतेही व्यसन न करणाऱ्या व्यक्तींमध्येही हा कर्करोग आढळतो. 

 जठराचा कर्करोग
आपण खात असलेले अन्न अन्ननलिकेतून पोटाच्या एका भागात साठवले जाते,  त्यालाच जठर म्हणतात. तिथल्या रसांमुळे अन्न पचवण्यास मदत होते. जठराच्या कर्करोगाचे प्रमाणही आपल्याकडे वाढत आहे. हा कर्करोग पोटात  एच पायलोरी बॅक्टेरिया या जंतूच्या दीर्घ संसर्गाने होतो. यामध्ये पोटाचे लायनिंग खराब होते. तसेच यामुळे जठराला सूज येते. त्यामुळे पोटात कळा मारून येतात. या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालत नाही, वेळीच यावर उपचार करणे अगत्याचे ठरते. अधिक मसालेदार आणि तिखट खाणे टाळायला हवे. 

अनेकवेळा पोटाचा कर्करोग आनुवांशिकतेमुळेही होतो. हे सर्व प्रकार टाळायचे असतील तर उत्तम आहारशैली विशेषत: शाकाहार, फळे आणि भाज्यांचा नियमित आहार, व्यायाम, प्राणायाम, पुरेशी झोप घेणे आणि सर्व व्यसनांपासून दूर राहणे ही निरोगी जीवनशैली उपयुक्त ठरते.

जंकफूड टाळा  
मोठ्या आतड्याचा कर्करोग होण्यामागे जंकफूड, प्रोसेस फूड कारणीभूत आहे. यामध्ये आतड्याच्या आतील बाजूस गाठी येतात. कालांतराने या गाठीचे रूपांतर कर्करोगाच्या गाठींमध्ये होत असते. अतिमासांहाराने हा आजार होतो. तसेच वारंवार होणारी बद्धकोष्टता हेही कर्करोगाचे लक्षण असू शकते. 

यकृताचा कर्करोग
यकृताचा कर्करोग प्रमाणाच्या बाहेर दारूचे सेवन केल्यामुळे होतोच. त्याशिवाय कावीळ हा महत्त्वाचा घटक या आजारामध्ये असतो. काविळीचे बी आणि सी प्रकारमुळे यकृताचा कर्करोग नागरिकांना होत असतो. पित्ताशयात खडे झाल्यामुळे पित्ताशयाचा कर्करोग होतोच असे नाही. त्याचे ठोस असे  कारण नाही. मात्र पित्ताशयात खडे झाल्यास ते मोठे असतील तर अनेकवेळा पित्ताशय काढण्याचा सल्ला दिला जातो. 

(लेखक  सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल, पोटविकार विभागात चेअरमन आहेत) 

 

Web Title: Health Tips - Stomach cancer is preventable, but...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.