टूथपेस्ट जास्त वापरल्याने लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही होऊ शकतात हे गंभीर आजार, वेळीच व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 06:13 PM2022-08-20T18:13:58+5:302022-08-20T18:25:00+5:30
Toothpest Side effects : तीन ते सहा वयोगटातील ३८ टक्क्यांपेक्षा जास्त लहान मुलं सीडीसी आणि इतर संस्थांकडून देण्यात आलेल्या सूचनांपेक्षा अधिक प्रमाणात टूथपेस्टचा वापर करतात'.
Toothpest Side effects : सर्वांनाच वाटत असतं की, त्यांचे दात स्वच्छ आणि चमकदार दिसावेत. त्यासाठी बरेचजण सकाळी ब्रश करताना जास्त टूशपेस्टचा वापर करतात. पण खरंच जास्त टूथपेस्ट घेतल्याने जास्त फायदा होतो का? हा प्रश्नच आहे. अशात याबाबत काही रिसर्चही समोर आले आहेत. सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रीव्हेंशन (सीडीसी) च्या रिपोर्टनुसार, अमेरिकेतील अनेक लहान मुलं-मुली अधिकृतपणे ठरवून देण्यात आलेल्या प्रमाणापेक्षा जास्त टूथपेस्टचा वापर करतात.
हा रिपोर्ट शुक्रवारी प्रकाशित करण्यात आला होता. रिपोर्टनुसार, '२०१३-१६ मधील माहितीच्या विश्लेषणातून असं आढळलं की, तीन ते सहा वयोगटातील ३८ टक्क्यांपेक्षा जास्त लहान मुलं सीडीसी आणि इतर संस्थांकडून देण्यात आलेल्या सूचनांपेक्षा अधिक प्रमाणात टूथपेस्टचा वापर करतात'.
रिपोर्टनुसार, तीन ते सहा वयोगटातील मुलांसाठी मटरच्या आकाराइतक्या टूथपेस्टचा वापर करण्याची सूचना केली गेली आहे आणि ज्या मुलांचं वय तीनपेक्षा कमी असेल त्यांनी तांदळाच्या दाण्या इतक्या आकारा एवढं टूथपेस्ट वापरण्यास सांगण्यात आलं आहे.
सीडीसीला असं आढळलं की, तीन ते १५ वयोगटातील साधारण ८० टक्के लहान मुलं फार उशीर ब्रश करणे सुरू करतात. तर त्यांना जन्माच्या सहा महिन्यानंतरच ब्रश करण्याचा सल्ला दिला जातो. फ्लोराइडचा वापर दातांचं सडणं रोखण्यासाठी केला जाऊ शकतो. पण
सीडीसीने लहान मुलांच्या दातांना होणारा संभावित धोका रोखण्यासाठी दोन वर्षांच्या मुलांना फ्लोराइड टूथपेस्टचा वापर करण्याची सूचना केली आहे. अधिक टूथपेस्टचा वापर केल्याने केवळ लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही वेगवेगळ्या शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
टूथपेस्टच्या अधिक वापराने आजार
आपण दररोज वापरत असलेली टूथपेस्ट आणि हात धुण्यासाठी वापरत असलेला साबण कॅन्सरचं कारण बनू शकतात. एका रिसर्चमधून असं सिद्ध झालं आहे की, या दोघांमध्ये असलेलं अॅन्टी बक्टेरिअल आणि अॅन्टी फंगल तत्व ट्रायक्लोसनच्या वापरामुळे मोठ्या आतड्यांना सूज येते आणि त्यामुळे कॅन्सरसारख्या रोगांनाही आमंत्रण मिळतं.
संशोधनादरम्यान, ट्रायक्लोसनचा प्रयोग उंदरांवर करण्यात आला. संशोधनात असं सिद्ध झालं की, थोड्या वेळासाठी ट्रायक्लोसनच्या फार कमी प्रमाणामुळेही त्यांच्या आतड्यांना सूज येऊ लागली आणि आतड्यांशी संबंधित आजार वाढू लागला. कालांतराने आतड्यांशी संबंधित कॅन्सरही उंदरांमध्ये दिसून आला.
अमेरिकेच्या मॅसाच्युएट्स-एमहेस्र्ट युनिवर्सिटीतील गुओडोंग झांग यांनी सांगितले की, 'या परिणामांमुळे पहिल्यांदा समजलं की, ट्रायक्लोसनचा आतड्यांवर परिणाम होतो.' मागील शोधातून असं सिद्ध झालं होतं की, ट्रायक्लोसनचे प्रमाण अधिक असेल तर त्यामुळे विषबाधाही होऊ शकते. परंतु शरीरावर याच्या कमी प्रमाणामुळे होणाऱ्या परिणामांबाबत काहीही माहिती हाती लागली नव्हती.'
किती वापरावं टूथपेस्ट?
दात स्वच्छ करण्यासाठी भरपूर प्रमाणात टूथपेस्टचा वापर करण्याचा गैरसमज पसरवण्यात फक्त टूथपेस्टच्या जाहिराती जबाबदार आहेत. सत्य हे आहे की, दात योग्य पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी केवळ मटरच्या आकाराएवढं टूथपेस्ट वापरणं पुरेसं आहे. ६ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांबाबत सांगायचं तर टूथपेस्टचं प्रमाण हे तांदळाच्या दाण्याएवढं असायला हवं.
लहान मुलांना होऊ शकतो हा आजार
टूथपेस्टचं प्रमाण कमी यासाठी वापरावं कारण अनेक मुले काही प्रमाणात टूथपेस्ट गिळतात. ज्यामुळे त्यांना फ्लोरोसिस हा आजार होऊ शकतो. हा एक असा आजार आहे ज्यात फ्लोराइडचं अधिक प्रमाण असल्याने दातांवर भुरकट रंगांचे डाग तयार होतात. तेच प्रौढांनी फ्लोराइडचा अधिक वापर केला तरी त्यांना त्यातून कोणताही आजार होत नाही. पण टूथपेस्टचा अधिक वापर टूथपेस्ट वाया घालवण्यासारखे आहे. कारण दात योग्यप्रकारे स्वच्छ होण्यासाठी ब्रशचे ब्रिसल्स (ब्रशचे दाते) योग्य असणे गरजेचे आहे.