Health Asthama Attack : कायम रात्रीच का येतो दम्याचा अटॅक? जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 04:19 PM2023-04-05T16:19:54+5:302023-04-05T16:20:53+5:30
दमा (Asthama) हा श्वसनाचा आजार आहे. यामध्ये श्वसननलिकेला सूज येते. त्यामुळे श्वास घेताना अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतं.
दमा (Asthama) हा श्वसनाचा आजार आहे. यामध्ये श्वसननलिकेला सूज येते. त्यामुळे श्वास घेण्यात अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतं. श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे त्याला दमा असंही म्हटलं जातं. जगभरातील मोठ्या संख्येने लोक दम्याच्या आजारानं त्रस्त आहेत. असे बरेच लोक आहेत ज्यांना मध्यरात्री दम्याचा अटॅक येतो. रात्री दम्याचा अटॅक येण्यास कारणीभूत घटकांपैकी एक म्हणजे सर्कॅडियन रिदम. हे रात्रीच्या वेळी हार्मोन्सच्या पातळीत कमी झाल्यामुळे होते.
दम्याचा त्रास अचानक कधीही होऊ शकतो. काही लक्षणांसह दीर्घकाळापर्यंत अनेकदा या आजाराचे संकेतही मिळतात. परंतु त्याच्या मुख्य लक्षणांमध्ये दीर्घकाळ खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होतो. बोलण्यात अडचण येणे आणि नीट झोप न येणे हा देखील दम्याच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये समाविष्ट आहे. अशी लक्षणे दिसू लागल्यावर, आपण आपल्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगणे सुरू केलं पाहिजे.
यापासून कसा बचाव केला पाहिजे?
तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार ज्यांना याचा त्रास होतो त्यांनी आपली औषधं वेळेवर घेतली पाहिजेत. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी असे काही उपाय करावेत, ज्यामुळे दम्याचा अटॅक टाळता येतो. रात्रीच्या वेळी दम्याचा अटॅक येऊ नये म्हणून सर्वप्रथम तुम्ही तुमची खोली स्वच्छ ठेवावी. पंख्यांची पाती आणि कपाटांचा वरचा भाग देखील स्वच्छ ठेवा. बेडरुममधील धुळीचे कण कमी करण्यासाठी गादी आणि उशांवर कव्हर घालणे हा एक उत्तम आणि प्रभावी मार्ग आहे. डॉक्टर म्हणतात की जर तुम्हाला सायनसचा त्रास होत असेल तर कधीही सरळ स्थितीत झोपू नका. यामुळे पोस्टनेसल ड्रिप वाढू शकते. ज्यामुळे दम्याचा झटका येऊ शकतो. झोपताना मऊ उशी डोक्याखाली घेऊन डोके थोडे वर ठेवा.
उपाय
दम्याचा त्रास टाळण्यासाठी घरगुती उपायही करता येतात. यासाठी लेमनग्रास खूप फायदेशीर मानले गेले आहे. त्यात अँटी फंगल, अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. त्यात व्हिटॅमिन सी असते. हे पोषक तत्त्व वायुमार्गाची जळजळ कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. लेमनग्रासचे सेवन दम्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले गेले आहे.
ओवा - ओव्याचा वापर भजी सारख्या डिशेस बनवण्यासाठी मोठ्या प्रामाणात केला जातो. ओवा हा दम्यासाठी फायदेशीर मानला जातो. ओवा भाजून खाल्ल्यानं श्वसननलिकेची सूज कमी होते.
आलं - आल्यातही अनेक औषधी गुणधर्म सापडतात. यामध्ये असलेले अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी फंगल गुणधर्म दम्याच्या त्रासासाठी उपयुक्त आहेत. आल्याचा काढा किंवा चहासारख्या गोष्टींनी दम्याचा त्रास कमी होऊ शकतो.
लसूण - लसणात असलेले गुणधर्म फुफ्फुस मजबूत करण्यासाठी वापरले जातात. लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्तीही वाढते. लसणाच्या कच्च्या पाकळ्या खाल्ल्याने दम्यामध्ये आराम मिळतो.
(यामध्ये केवळ माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास सर्वप्रथम डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे.)