स्नॅक्स घेताना त्यावरचं लेबल चेक करता का?; हेल्दी स्नॅकिंग रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 03:43 PM2024-07-09T15:43:56+5:302024-07-09T15:44:50+5:30
स्नॅक्सची खरेदी करण्यापूर्वी त्यातील घटकांची यादी आणि पोषणमूल्य पाहण्याचा ट्रेंड भारतात वाढत आहे.
स्नॅक्सची खरेदी करण्यापूर्वी त्यातील घटकांची यादी आणि पोषणमूल्य पाहण्याचा ट्रेंड भारतात वाढत आहे. रविवारी जाहीर झालेल्या 'हेल्दी स्नॅकिंग रिपोर्ट २०२४' नुसार, सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ७३ टक्के लोकांनी स्नॅक्स खरेदी करण्यापूर्वी उत्पादनातील घटकांची यादी आणि पोषणमूल्य याबाबत वाचल्याचं सांगितलं.
या रिपोर्टवरून हे स्पष्ट झालं आहे की भारतीय ग्राहक आता त्यांच्या आरोग्याबाबत जागरूक होत आहेत आणि त्यांना त्यांच्या खाद्यपदार्थांच्या पौष्टिक स्तराबाबत अधिक माहितीची आवश्यकता आहे.
रिपोर्टमध्ये असंही नमूद केलं आहे की ९३ टक्के लोकांना पारदर्शकतेवर भर दिला आहे आणि त्यांना त्यांच्या खाद्यपदार्थांवरचं लेबल वाचण्यात रस आहे. आरोग्यदायी पर्याय स्वीकारण्यासही ते तयार आहेत.
रिपोर्टनुसार, स्नॅकिंग ब्रँड्सना आता ग्राहकांची पसंती लक्षात घेऊन त्यांच्या उत्पादनांच्या पोषणमूल्यांचा प्रचार करावा लागणार आहे. भारतीय बाजारपेठेत मखाणा आणि सुका मेवा यासारख्या नैसर्गिक आणि पौष्टिकतेने समृद्ध उत्पादनांची प्रतिष्ठा वाढली आहे. सुमारे ६७ टक्के भारतीय ग्राहकांनी हे नैसर्गिक पदार्थ हेल्दी स्नॅकिंग म्हणून निवडले आहेत
भेसळीच्या प्रकरणांबाबत वाढती चिंता पाहता, ग्राहक आता त्यांच्या खाद्यपदार्थांची पाकिटे तपासण्यासाठी अधिक सतर्क झाले आहेत. यावरून हे स्पष्ट होतं की ग्राहक त्यांच्या आरोग्याबाबत अधिक सतर्क राहत आहेत.