heart attack: कमी वयात या कारणांमुळे येतो हार्ट अटॅक, तज्ज्ञांनी सांगितले यावरील सोपे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 05:42 PM2022-02-20T17:42:00+5:302022-02-20T17:45:02+5:30

आपल्या देशात हृदयविकाराच्या झटक्यानं मरण पावणाऱ्यांमध्ये जवळपास २५ टक्के रुग्ण ४५ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. ५५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका ६७ टक्के आहे.

heart attack causes symptoms and remedies | heart attack: कमी वयात या कारणांमुळे येतो हार्ट अटॅक, तज्ज्ञांनी सांगितले यावरील सोपे उपाय

heart attack: कमी वयात या कारणांमुळे येतो हार्ट अटॅक, तज्ज्ञांनी सांगितले यावरील सोपे उपाय

googlenewsNext

आजकाल अगदी तरुण वयातही हृदयविकाराच्या झटक्यानं (Heart Attack) मृत्यू होण्याचं, तसंच हृदयाशी संबधित आजारांचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे. अगदी ३० ते ४० वर्षं वयोगटातल्या व्यक्तींनाही हृदयविकारांवरची औषधं घ्यावी लागत असून, त्यांच्यामध्येदेखील हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढला आहे. ज्येष्ठ नागरिक म्हणजे ६०ते ६५ वर्षं वयोगटातल्या बहुतांश नागरिकांना हृदयाशी संबंधित आजारांमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागण्याचं प्रमाण अधिक आहे.

आपल्या देशात हृदयविकाराच्या झटक्यानं मरण पावणाऱ्यांमध्ये जवळपास २५ टक्के रुग्ण ४५ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. ५५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका ६७ टक्के आहे. हृदयविकाराचा धोका वाढण्यामागे बदललेली जीवनशैली (Lifestyle), अयोग्य आहार पद्धती (Diet), अंमली पदार्थांचं व्यसन, ताणतणाव (Stress) ही महत्त्वाची कारणं आहेत. तसंच या आजाराची कारणं, लक्षणं आणि उपाय यांबाबत लोकांमध्ये जागरूकताही कमी आहे. त्यामुळे जनजागृती निर्माण केल्यास आणि योग्य वेळी योग्य औषधोपचार, जीवनशैलीत बदल आदी उपाययोजना केल्यास हा धोका टाळता येणं शक्य आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

हृदय हा आपल्या शरीरातला अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. संपूर्ण शरीराला शुद्ध रक्तपुरवठा (Blood Circulation) करण्यासाठी हृदय एखाद्या पंपाप्रमाणे काम करतं. जेव्हा हृदय शरीराच्या आवश्यकतेनुसार रक्तपुरवठा करू शकत नाही, तेव्हा हृदय बंद पडतं. अनेक कारणांमुळे हृदयाच्या कार्यावर परिणाम होतो. हळूहळू त्याची कार्यक्षमता कमी होते, हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यानं हृदय बंद पडण्याचा धोका वाढतो.

आपल्या देशात हृदय बंद पडण्याच्या घटना घडण्याचं प्रमाण सर्वाधिक असून, आनुवंशिकपणे धमन्यांमध्ये अडथळे निर्माण होण्याचा आजार जडण्याचं प्रमाणही अधिक आहे. देशातली मोठी लोकसंख्या रक्तदाब आणि मधुमेहाने ग्रस्त आहे. यामागे अयोग्य जीवनशैली हे अत्यंत महत्त्वाचं कारण आहे, असं मोहाली इथल्या फोर्टिस हॉस्पिटलचे (Fortis Hospital) इंटरव्हेंशनल कार्डिऑलॉजिस्ट डॉ. आर. के. जसवाल यांनी सांगितलं. आज तकने याविषयी वृत्त दिले आहे.

मीडिया अहवालानुसार काही सोप्या उपायांनी या आजारांना दूर ठेवणं शक्य आहे असं जसवाल म्हणाले. ३० वर्षं किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींनी नियमितपणे आपली आरोग्य तपासणी (Health Check-up) केली पाहिजे. यामुळे वेळीच आजाराचं निदान होतं आणि वेळीच उपचार करता येतात. योग्य आहार घेणं हेदेखील अत्यंत आवश्यक आहे. साखर, कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ अतिशय घातक आहेत. असे पदार्थ खाणं बंद करणं गरजेचं आहे. धूम्रपान (Smoking), दारू पिणंदेखील (Alcohol) अतिशय घातक असून त्यापासूनही दूर राहिलं पाहिजे.

भारतीयांच्या आहारात मिठाचं प्रमाणही अधिक असतं. प्रत्येक व्यक्तीनं दररोज पाच ग्रॅमपेक्षा अधिक मीठ खाणं टाळलं पाहिजे. काही व्यक्तींच्या आहारात हे प्रमाण 15 ग्रॅम इतकं खूप जास्त असतं. हृदयाच्या आरोग्यावर याचे दुष्परिणाम होतात. नियमित व्यायाम करणं, आरोग्य तपासणी करणंदेखील आवश्यक आहे. तरच हृदयविकाराच्या धोक्यापासून स्वत:चा बचाव करणं शक्य होईल, असं डॉ. आर.के. जसवाल यांनी म्हटलं आहे.

 

Web Title: heart attack causes symptoms and remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.