थंडीमध्ये हार्टअटॅकचा धोका सर्वाधिक, तज्ज्ञच सांगतायत यामागची कारण अन् उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 05:45 PM2021-11-29T17:45:41+5:302021-11-29T17:50:43+5:30
जसजसं तापमान कमी होऊ लागतं तसतसं शरीर आवश्यक अवयवांचं तापमान संतुलित ठेवण्यासाठी आपत्कालीन प्रतिसाद दल सक्रिय करतं. त्यातून हृदय विकाराचा (Heart Disease) धोका सुरू होतो.
जणांसाठी हिवाळा (Winter) आनंददायी असतो. बर्फाच्छादित डोंगर पाहून त्यांना नक्कीच भुरळ पडते; पण त्याचे धोकेही काही कमी नाहीत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तापमानात घट होताच शरीरात अनेक बदल सुरू होतात. कारण आपलं शरीर एका ठराविक तापमानात (Temperature) संतुलित राहतं. जसजसं तापमान कमी होऊ लागतं तसतसं शरीर आवश्यक अवयवांचं तापमान संतुलित ठेवण्यासाठी आपत्कालीन प्रतिसाद दल सक्रिय करतं. त्यातून हृदय विकाराचा (Heart Disease) धोका सुरू होतो.
हिवाळ्यात शरीरात अनेक प्रकारचे बदल होत असतात. याबाबत शालीमार बाग इथल्या फोर्टिस रुग्णालयातले प्रसिद्ध इंटरव्हेन्शल कार्डिऑलॉजिस्ट डॉ. नित्यानंद त्रिपाठी यांनी सांगितलं, की `हिवाळ्यात विशिष्ट तापमान कायम राहावं यासाठी संरक्षणात्मक व्यवस्थापन म्हणून शरीरात कॅटेकोलामाइन्सची (Catecholamines) पातळी वाढते. यामुळे ब्लड प्रेशर वेगानं वाढतं. यामुळे हार्ट अटॅक (Heart Attack) किंवा स्ट्रोकची (Stroke) जोखीम अनेक पटींनी वाढते. ही जोखीम प्रामुख्यानं हृदयाशी संबंधित समस्या असणाऱ्या लोकांमध्ये अधिक असते.`
हिवाळ्यात हार्ट अटॅकचं प्रमाण का वाढतं?
डॉ. नित्यानंद त्रिपाठी यांनी सांगितलं, की `हिवाळ्यात तापमानात घट झाल्यानं शरीर संतुलन बिघडतं. यामुळे शरीरावरचा अनावश्यक ताण वाढतो. जेव्हा शरीरावरचा अनावश्यक ताण वाढतो आणि भीती निर्माण होते तेव्हा कॅटेकोलामाइन्स शरीराला अशा परिस्थितीशी लढण्यासाठी तयार करतात. अड्रिनल ग्रंथी तणावाच्या स्थितीला तोंड देण्यासाठी पुरेशा प्रमाणात कॅटेकोलामाइन्स तयार करतात. कॅटेकोलामाइन्सचे प्रामुख्यानं तीन प्रकार असतात. यात इपीनेफ्राइन किंवा अॅड्रिनलिन (Epinephrine-Adrenaline), नोरेपीनेफ्राइन (Norepinephrine) आणि डोपामाइन (Dopamine) यांचा समावेश होतो. जेव्हा शरीरात कॅटेकोलामाइन्सचं प्रमाण वाढतं तेव्हा हार्ट रेट (Heart Rate), ब्लड प्रेशर (Blood Pressure) आणि श्वासाची गती वाढते. त्यामुळे हिवाळ्यात हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकची जोखीम वाढते.
आहार आणि शिथिलता ही प्रमुख कारणं
हिवाळ्यात अनेकांचा आहार (Diet) अचानक वाढतो. दिवस लहान असल्यानं लोक फिरणं टाळतात. व्यायामाचं प्रमाण कमी होतं. एकूणच शारीरिक हालचाली कमी होतात. यामुळे कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशर वाढू लागतं. काही जणांचं वजनदेखील वाढू लागतं. उन्हाळ्यात शारीरिक हालचालींमुळे घाम येतो आणि घामाद्वारे सोडियम, तसंच पाणी बाहेर पडतं. हिवाळ्यात शारीरिक हालचाली पुरेशा प्रमाणात न झाल्यानं सोडियम बाहेर टाकलं जात नाही. त्यामुळे पेरिफेरल रक्तवाहिन्या आकुंचन पावू लागतात. परिणामी हृदयावरचा दबाव वाढतो आणि त्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकची जोखीमदेखील वाढते, असं डॉ. त्रिपाठी यांनी सांगितलं.
हिवाळ्यात या व्यक्तींना असतो हार्ट अटॅकचा धोका
ज्यांना हृदयविकार आहे, म्हणजेच पूर्वी हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक आला आहे त्यांना हिवाळ्यात हार्ट अटॅक येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी हिवाळ्यात अधिक सतर्क राहिलं पाहिजे. ज्या व्यक्तींना मधुमेह आहे, त्यांनादेखील हिवाळ्यात हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. याशिवाय हायपरटेन्शनचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनीदेखील हिवाळ्यात काळजी घेणं आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही हिवाळ्यात हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांनीदेखील पुरेशी काळजी घ्यावी, असं डॉ. त्रिपाठी यांनी सांगितलं.
यापासून बचावासाठी काय काळजी घ्यावी?
सर्वप्रथम थंडीपासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. आहारावर नियंत्रण ठेवावं. हिवाळ्यात भूक अधिक लागते. त्यामुळे खाण्यावर स्वयंनियंत्रण आवश्यक आहे. खासकरून ज्यांना हार्ट अटॅक येण्याची जास्त शक्यता असते, त्यांनी विशेष काळजी घ्यावी आणि आहार मर्यादित ठेवावा. थोड्या थोड्या वेळानं थोडं खावं. थंडी असताना घराबाहेर पडणं टाळावं. अत्यावश्यक असेल तर उबदार कपडे परिधान करून घराबाहेर पडावं. हिवाळा आहे, दिवस लहान आहे म्हणून शारीरिक हालचाली (Physical Activity) मर्यादित ठेवू नयेत. नियमित पुरेसा व्यायाम करावा, असं डॉ. त्रिपाठी यांनी स्पष्ट केलं.
जो आहार घ्याल, त्यात कोलेस्टेरॉल वाढवणारे पदार्थ नसावेत. तूप, तेलाचा कमी वापर करावा. तूप शरीरातलं तापमान कायम राखण्यास मदत करतं, असं सांगितलं जातं. परंतु, तुपामुळे कोलेस्टेरॉल वाढतं. त्यामुळे तुपाचं सेवन टाळावं. हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या भरपूर खाव्यात. हंगामी भाजीपाला आणि फळं खावीत. ड्रायफ्रूट्सचं सेवनही मर्यादित प्रमाणात करावं, असं डॉ. त्रिपाठी यांनी सांगितलं.