मृत्यू कारणात हृदयरोग ‘नंबर वन’वरच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 11:55 AM2023-05-23T11:55:04+5:302023-05-23T11:55:28+5:30
मुंबई महापालिकेने गेल्यावर्षी झालेल्या विविध आजराने झालेल्या मृत्यूची कारणे माहितीच्या अधिकारात दिली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्यावर्षी मुंबई महापालिकेच्या हद्दीत एकूण ९४ हजार ५३८ नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये सर्वाधिक ९,४७० मृत्यू हृदयविकाराने, तर त्या खालोखाल ९,१४५ मृत्यू हे कॅन्सरने झाले आहेत. तिसऱ्या क्रमांकाचे मृत्यूचे कारण क्षयरोग असून, ३,२८१ मृत्यू या आजारामुळे झाले आहेत. मृत्यूची माहिती देण्यासाठी २९ कारणे देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक मृत्यूंची नोंद शेवटचे कारण म्हणजे ‘कोणत्या तरी आजाराने’ असे सांगण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेने गेल्यावर्षी झालेल्या विविध आजराने झालेल्या मृत्यूची कारणे माहितीच्या अधिकारात दिली आहेत. विशेष म्हणजे या सर्व मृत्यूची माहिती देण्यासाठी २९ कारणांची निवड करण्यात आली आहे. तसेच मुंबईत अजूनही कॉलराने मृत्यू होत असल्याचे दिसून येत असून एका रुग्णाचा मृत्यू कॉलराने झाल्याचे नमूद केले आहे. आणखी जी काही कारणे आहेत त्यामध्ये विशेष म्हणजे कोणत्या तरी आजाराने ‘ या वर्गवारीत एकूण मृत्यूंपैकी निम्म्यापेक्षा म्हणजे ६० हजार ५५५ नगरिकांचा मृत्यू इतर आजराने झाल्याचे सांगण्यात येते. ही संख्या सर्वाधिक आहे. तर दारूमुळे ३३१, डेंग्यूमुळे २४६, मलेरियामुळे ८९ रुग्ण दगावले आहेत. त्यासोबत स्वाईन फ्लूमुळे ५५, रुग्ण भाजल्यामुळे २१८, तर गोवरमुळे १४ रुग्ण दगावले आहेत. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
आजही मृत्यूचे नंबर वन कारण हे हृदयरोगच आहे. कारण पन्नाशी, साठीतला हृदयरोग आता ३० वयाखालील तरुणांमध्ये दिसत आहे. या सर्वांसाठी प्रमुख कारण म्हणजे बदलती जीवनशैली आहे. शाळेत जीवशैली कशापद्धतीने असावी हे शिकविले गेले पाहिजे. कारण खाण्याची शिस्त लहानपानापासून लागणे गरजेची आहे. आपण काय आणि कशा पद्धतीने खातो, याचा आरोग्यावर चांगला, वाईट परिणाम होतो. गेल्या २७ वर्षाच्या माझ्या करिअरमध्ये यावेळी प्रथमच ३० वर्षांखालील तरुणाची हृदयरोगाची आकडेवारी मागण्यात आली आहे. इतक्या झपाट्याने तरुणांना हृदयरोग होत आहे.
- डॉ. अजय चौरसिया,
हृदयरोग विभागप्रमुख, नायर रुग्णालय