हृदय प्रत्यारोपणाचे रुग्ण जगतायत ‘नॉर्मल’ आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 08:46 AM2024-09-29T08:46:14+5:302024-09-29T08:46:23+5:30
जागतिक हृदय दिन : पालकांनी मानले अवयवदात्या कुटुंबाचे आभार
- संतोष आंधळे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वैद्यकीय विश्वात अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी होत असल्यामुळे आता अवयव निकामी झालेल्या रुग्णांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांत राज्यात ८ रुग्णांवर हृदय प्रत्यारोपणाची (हार्ट ट्रान्स्प्लांट) शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मुंबईतील रुग्णांवर काही वर्षांपूर्वी हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, ते सर्वसाधारण आयुष्य जगत आहेत. त्यांच्या पालकांनी अवयवदात्या कुटुंबीयांचे आभार मानले आहेत.
हृदयविकारामुळे हृदय निकामी झालेल्या रुग्णावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे हाच एकमेव उपाय असतो. याकरिता त्यांना मेंदुमृत दात्याचे हृदय मिळणे अपेक्षित असते. काही प्रमाणात मेंदुमृत अवयदानास सुरुवात झाली असली तरी हृदय निकामी झालेल्या रुग्णांची प्रतीक्षा यादी खूप मोठी आहे.
राज्य अवयव आणि ऊती पेशी प्रत्यारोपण संस्थेच्या माहितीनुसार, २०२३ या वर्षात राज्यात मेंदुमृत अवयवदात्यांकडून ३३ हृदयांचे दान करण्यात आले, तसेच ३० हृदय निकामी झालेल्या रुग्णांवर हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. काही वेळा राज्यात हृदय उपलब्ध असते. मात्र, घेणारा रुग्ण त्यावेळी नसतो त्यावेळी ते अन्य राज्यात पाठविले जाते.
वांद्रेतील हवोवी होमजीचे आयुष्य आनंदात...
वांद्रे येथील हवोवी होमजी या मुलीला हृदयविकार होता. दहा वर्षांपूर्वी तिच्यावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तिचे आयुष्य सुरळीत सुरू आहे. हावोवीची आई अर्नायटी म्हणाल्या, ‘आज हावोवी चांगले आयुष्य जगत आहे. मात्र, त्याचे सर्व श्रेय ज्या कुटुंबीयांनी अवयवदानास संमती दिली त्यांना आहे. त्यांच्यामुळे माझ्या मुलीला आज सर्वसाधारण आयुष्य जगता येत आहे. शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर आणि नियमित उपचारांमुळे आज ती दैनंदिन कामे करत आहे.’
नवी मुंबईची आराध्या शिक्षणात रमलीय...
नवी मुंबईतील आराध्यावर सात वर्षांपूर्वी हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ती आता शाळेत शिक्षण घेत आहे. तिचे वडील योगेश म्हणाले, ‘हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हृदय निकामी झालेल्या रुग्णांसाठी वरदान आहे. त्या शस्त्रक्रियेमुळे माझ्या मुलीचा दुसरा जन्म झाला आहे. त्या कुटुंबीयांनी अवयदानाचा निर्णय त्यांच्या दुःखाच्या काळात घेतला. मी त्यांचा मनापासून आभारी आहे.’
हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेले रुग्ण चांगले आयुष्य जगत आहेत. सरकारी रुग्णालयांत मेंदुमृत अवयदान वाढणे गरजेचे आहे. अधिक अवयव मिळाले, तर प्रतीक्षा यादीवरील रुग्णांना अवयव लवकर मिळू शकतील. अवयदानाचा निर्णय घेणाऱ्या कुटुंबांचा शासनाने सन्मान केला पाहिजे. कारण त्यांच्यामुळे चार ते पाच रुग्णांना जीवदान मिळते.
- डॉ. के.आर. बालकृष्णन (७०० पेक्षा अधिक हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणारे तज्ज्ञ)