पॅरालिसिसच्या रुग्णांसाठी 'मदतीचा हात', विशेष ग्लोव्हजची बंगळुरूतील विज्ञान संस्थेकडून निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 07:35 AM2022-05-06T07:35:52+5:302022-05-06T07:36:46+5:30
या ग्लोव्हजमुळे पॅरालिसिसच्या रुग्णांना आधार मिळेल, तज्ज्ञांचा दावा.
बंगळुरू : पॅरालिसिस झाला की रुग्ण हतबल आणि परावलंबी होतो. अशा रुग्णांना मदतीचा हात देण्यासाठी बंगळुरूची भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी) पुढे आली आहे. या संस्थेने पॅरालिसिसच्या रुग्णांसाठी थ्रीडी प्रिंटिंग तंत्राद्वारे विशेष ग्लोव्हजची निर्मिती केली आहे. हे ग्लोव्हज वजनाला हलके असून त्यामुळे पॅरालिसिस झालेल्या रुग्णांना हात व बोटांची हालचाल करताना आधार मिळणार आहे. पक्षाघाताच्या रुग्णांसाठी हे ग्लोव्हज वरदान ठरण्याची शक्यता आहे.
काय असेल किंमत?
या ग्लोव्हजची किंमत प्रत्येकी एक हजार रुपयांपेक्षा कमी ठेवण्याचा आयआयएससीचा विचार आहे. ग्लोव्हजचे पेटंट मिळविण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे अर्ज दाखल करण्यात आला आहे.
- पक्षाघाताच्या रुग्णाने हे विशेष ग्लोव्हज हातात घातल्यानंतर त्याच्या हालचाली फिजिओथेरपिस्ट इंटरनेटच्या माध्यमातून नियंत्रित करतात.
- रुग्णाकडून हाताचा, पंजाचा व्यायाम करून घेतला जाऊ शकतो. रुग्णाच्या बोटांची हालचाल नीट होत नसल्यास त्यांना या ग्लोव्हजमुळे आधार मिळतो.
पक्षाघाताच्या रुग्णांची शारीरिक हालचाल नीट व्हावी यासाठी सध्या असलेल्या उपचारांमध्ये फिजिओथेरपी प्रमुख आहे. त्या उपचारांमध्ये आयआयएससीने तयार केलेले विशेष ग्लोव्हज मोलाची कामगिरी बजावतील. या ग्लोव्हजची किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी असावी, असा आमचा प्रयत्न आहे.
आआयएससी