आता मीटरद्वारे समजणार हिमोग्लोबिनो; गर्भवतींच्या स्वास्थ्यासाठी आरोग्य विभागाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 02:21 PM2020-02-19T14:21:10+5:302020-02-19T14:23:40+5:30
मानवी शरीर सुदृढ राखण्यासाठी पुरेशा हिमोग्लोबिनचे प्रमाण असणे आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार महिलांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण २९.४ टक्के आहे.
मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण ६० टक्के आहे. याच बाबीचा विचार करून राज्याच्या आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील गर्भवतींच्या हिमोग्लोबिनची तपासणी करण्यासाठी हिमोग्लोबिनो मीटरची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे, रक्तक्षय आढळलेल्या गर्भवतींवर विशेष उपचार करण्यात येतील. हिमोग्लोबिनो मीटरच्या खरेदीसाठी १ लाख ६ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मानवी शरीर सुदृढ राखण्यासाठी पुरेशा हिमोग्लोबिनचे प्रमाण असणे आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार महिलांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण २९.४ टक्के आहे. आशियात याचे प्रमाण सर्वाधिक ४२ टक्के आहे. देशात रक्तक्षयाचे प्रमाण स्त्रियांमध्ये ४८ टक्के असून, ग्रामीण भागातील महिलांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण ६० टक्के आहे.
लोहाची गरज पुरुषांच्या तुलनेने स्त्रियांना अधिक असते. विशेषत: स्त्रियांच्या आहारातले लोहाचे प्रमाण कमी झाल्यास मासिकपाळीच्या समस्यांमध्ये वाढ होते. आतड्यांच्या, जंताच्या आजारातही वाढ होते. अशक्तपणा, चक्कर येणे, भूक न लागणे ही लोहाचे प्रमाण कमी होण्याची मुख्य लक्षणे आहेत.
बाळंतपणातील सिझेरिअननंतर प्रमाणापेक्षा जास्त रक्तस्राव झाल्याने बाळंतपणानंतर स्त्रियांच्या शरीरात लोहाची कमतरता निर्माण होऊ शकते. अर्भके, लहान मुलांच्या शरीरातील रक्ताल्पतेमुळे त्यांना तोल सांभाळणे किंवा सुसंगत शारीरिक हालचालीत अडथळे येतात. रक्ताल्पतेची समस्या असणाऱ्या लहान मुलांची मानसिक, बौद्धिक वाढ खुंटण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे लहान मुले उत्तरोत्तर एकलकोंडी संकुचित मनोवृत्तीची बनतात.
लोह मिळणे अत्यावश्यक
लहान मुले लोहाचा योग्य साठा घेऊनच जन्माला येतात. मात्र, हा लोहाचा साठा आईचे दूध जोपर्यंत बाळाच्या पोटात जाते, त्यानंतर काही दिवसच पुरतो. त्यामुळे स्तनपानाच्या काळात आईच्या रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होत जाते. साहजिकच बाळंतपणानंतर आईला लोहगुणसंपन्न आहार देणे क्रमप्राप्त ठरते. कित्येकदा आवश्यकतेनुसार बाळंतपणानंतर आईला गोळ्यांद्वारे लोहाचा पुरवठा करणे गरजेचे असते, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.