तज्ज्ञांनीच सांगितल्या दीर्घकालीन कोविडमधून बरे होण्यासाठीच्या 'या' टिप्स, घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 03:37 PM2021-09-21T15:37:50+5:302021-09-21T15:38:23+5:30

लोकांना सध्या त्रस्त करत असलेल्या या समस्येचे नाव दीर्घकालीन कोविड असे आहे. या समस्या दूर करता याव्यात यासाठी अनेक वेगवेगळ्या उपाययोजना आणि पद्धतींचा अवलंब केला जात आहे. यासाठी नेमके काय करावे याच्या टिप्स जाणून घेऊया तज्ज्ञांकडूनच...

Here are some tips to help you get rid of chronic covid by experts | तज्ज्ञांनीच सांगितल्या दीर्घकालीन कोविडमधून बरे होण्यासाठीच्या 'या' टिप्स, घ्या जाणून

तज्ज्ञांनीच सांगितल्या दीर्घकालीन कोविडमधून बरे होण्यासाठीच्या 'या' टिप्स, घ्या जाणून

Next

कोविड-१९ च्या प्रसारापासून पूर्णपणे मुक्त होण्याचे प्रयत्न देशभरात सुरु आहेत, या आजारातून बरे होण्याचा सरासरी दर ९७% पेक्षा जास्त आहे पण संसर्गातून बरे झाल्यानंतर देखील आरोग्याच्या गंभीर समस्या भेडसावत असलेल्या लोकांची संख्या खूप जास्त आहे.  लोकांना सध्या त्रस्त करत असलेल्या या समस्येचे नाव दीर्घकालीन कोविड असे आहे.

संपूर्ण जगभरात २० कोटींपेक्षा जास्त लोकांना कोविड-१९ चा संसर्ग झाला, त्यांच्यापैकी अनेक लोक आज दीर्घकालीन कोविडमुळे आजारी आहेत, जागतिक आरोग्य संघटनेने याविषयी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.  भारतात करण्यात आलेल्या संशोधनात असे आढळून आले की, महामारीच्या दुसऱ्या लाटेमध्ये दीर्घकालीन कोविडच्या केसेसमध्ये चार पटींनी वाढ झाली.  थकवा येणे, श्वास घेण्यात त्रास होणे, सतत खोकला येत राहणे, छातीत दुखणे, पचनसंस्थेशी संबंधित समस्या, स्मरणशक्ती आणि एकाग्रतेमध्ये समस्या उद्भवणे इत्यादी त्रास कोविड संसर्गातून बरे झाल्यानंतर देखील पुढे बराच काळ होत राहतात.  असे का होते, त्याचे निश्चित स्वरूप समजून घेऊन निदान करता यावे यासाठी संपूर्ण जगभरात अभ्यास केला जात आहे.  त्याचप्रमाणे या समस्या दूर करता याव्यात यासाठी अनेक वेगवेगळ्या उपाययोजना आणि पद्धतींचा अवलंब केला जात आहे.

आयुर्वेद आणि आधुनिक औषधशास्त्रातील संशोधन तंत्रे यांचा मिलाप असलेल्या आधुनिक आयुर्वेदानुसार अनेक असे उपाय उपलब्ध आहेत ज्यामुळे कोरोना विषाणूच्या गंभीर संसर्गानंतर शरीर व मनाचे आरोग्य पुन्हा मिळवता येऊ शकते.  आधुनिक आयुर्वेदाच्या सिद्धांतांनुसार विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती जास्तीत जास्त उत्तम राखली जाणे महत्त्वाचे असते जेणेकरून पुन्हा संसर्ग होणार नाही.  त्यासाठी वेगवेगळ्या उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो. 

कोविडचा संसर्ग होऊन गेल्यानंतर त्या व्यक्तीची कोविड टेस्ट निगेटिव्ह आली याचा अर्थ कोविड-१९ संसर्ग होऊन गेल्यानंतर शरीर बरे होऊ लागण्याचा काळ सुरु झाला आहे आणि या काळात नेहमीपेक्षा जास्त वेळ आराम करणे आवश्यक आहे. कोविड संसर्ग होऊन गेला आणि टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर दोन आठवड्यांनंतरच सर्वसामान्य कामे करण्याची परवानगी दिली जाते. या कालावधीत दिवसभर भरपूर कोमट पाणी पीत राहून शरीर हायड्रेटेड राखणे महत्त्वाचे असते. तसेच आहारामध्ये पुरेशा प्रमाणात झिंक, क व ब जीवनसत्त्वे अशी खनिजे व जीवनसत्त्वे असली पाहिजेत, जेणेकरून शरीरामध्ये रोगप्रतिकार शक्ती निर्माण होत राहील. या कालावधीत आजारी व्यक्तीने पचनाला हलके, शिजवलेले अन्नपदार्थ खावेत, हिरव्या पालेभाज्या, सूप्स, भात, गहू किंवा ज्वारी, आले, लसूण, काळी मिरी, हळद, टोमॅटो इत्यादींचा समावेश नेहमीच्या जेवणामध्ये केला जावा.  याठिकाणी एक गोष्ट नक्की ध्यानात ठेवा की कोविड होऊन गेल्यानंतर डाळिंब आणि द्राक्षे यासारखी फळे खाल्ली जाऊ शकतात पण सॅलड्स मात्र खाऊ नयेत.

व्यक्तीची तब्येत सुधारू लागली की बरे होण्याचा वेग वाढवण्यासाठी प्राणायाम व योगा यांचा समावेश दिनचर्येमध्ये करण्याचा सल्ला दिला जातो.  फुफ्फुसांचे आरोग्य लवकरात लवकर पूर्णपणे सुधारावे यासाठी प्राणायाम करणे खूप उपयोगी ठरते.  संसर्ग झालेला असताना आणि संसर्गातून बरे झाल्यानंतर शरीर पूर्वस्थितीत येण्याच्या काळात डिजिटल डिटॉक्स करून अर्थात डिजिटल साधनांपासून पूर्णपणे दूर राहून स्मरणशक्ती वाढवणारे खेळ, शब्दकोडी, सुडोकू इत्यादींमध्ये मन रमवावे.

कोविड-१९ संसर्गामधून बरे झाल्यानंतर उद्भवणाऱ्या आरोग्याशी संबंधित गुंतागुंतींवर उपाययोजना करताना प्रत्येक व्यक्तीने आपली ऑक्सिजन पातळी योग्य आहे की नाही हे नियमितपणे तपासावे तसेच मधुमेह, रक्तदाब इत्यादी त्रास असल्यास त्यावरील औषधे सुरु ठेवावीत.

कोविड-१९चा प्रभाव फुफ्फुसांवर पडतो. जेव्हा आपले शरीर विषाणूच्या संसर्गातून बरे होण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा आपली श्वसनसंस्था सर्वाधिक प्रभावित झालेली असते.  त्यामुळे अस्थमा, शिंका येणे, साइनसाइटिस आणि वारंवार सर्दी होणे असे त्रास होऊ शकतात.  काळी मिरी, पिंपळी, सुंठ आणि वेलची यांचा समावेश असलेल्या आयुर्वेदिक मिश्रणाच्या साहाय्याने या सर्वांवर नियंत्रण ठेवले जाऊ शकते.  सिरप, वड्या आणि गोळी स्वरूपात हे मिश्रण उपलब्ध असून श्वसनमार्ग रुंद करून आणि फुफ्फुसातून कफ साफ करून फुफ्फुसांचे आरोग्य पुन्हा सुयोग्य स्थितीत आणण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो.  असे आढळून आले आहे की या घटक पदार्थांचे कोणत्याही स्वरूपात सेवन केल्याने फुफ्फुसे आणि एकंदरीत शरीर पुन्हा निरोगी बनते. 

आले:  दाहशामक मसाला असलेले आले शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकते, फुफ्फुसांमधून प्रदूषके हटवते, रक्ताभिसरणात सुधारणा घडवून आणते. फुफ्फुसांवरील आजारांसाठीच्या अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये आले हा प्रमुख घटक असतो.  आयुर्वेदानुसार रोज ५ ग्रॅमपेक्षा कमी कच्चे आले खाल्ल्याने शरीराला अनेक लाभ मिळतात. 

काळी मिरी:  भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्सचा साठा ही काळी मिरीची ओळख आहे.  वैज्ञानिक संशोधनातून सिद्ध झाले आहे की काळी मिरी अनेक रोगांवर गुणकारी ठरते, यामध्ये कर्करोग, हृदय विकार, फुफ्फुसांचे आजार आणि अशा अनेक आजारांचा समावेश आहे.  श्वसनाचे विकार दूर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांमध्ये काळ्या मिरीचा वापर आवर्जून केला जातो.

वेलची:  स्वयंपाकामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या हिरव्या वेलचीमुळे छातीमध्ये साठलेला कफ नैसर्गिकरित्या पडून जातो, फुफ्फुसे मोकळी होतात आणि दाहशामकता असल्यामुळे संसर्गांना प्रतिबंध केला जातो.  फुफ्फुसांशी संबंधित आजारांनी त्रस्त रुग्णांसाठी हिरवी वेलची खूप लाभदायक आहे. 

पिंपळी:  ही एक औषधी वनस्पती असून त्याची फळे व मुळे अस्थमा व दम्यावरील वनौषधी तयार करण्यासाठी वापरतात.  यामध्ये देखील दाहशामक गुण असतात. 

कोविड-१९ संसर्गामुळे येणारे आजारपण दीर्घकाळपर्यंत टिकून राहू शकते आणि याची लक्षणे सतत त्रास देत राहतात.  या लक्षणांपासून आराम मिळण्यासाठी आणि उत्तम आरोग्यप्राप्तीसाठी आयुर्वेदाचा उपयोग कशा प्रकारे होत आहे याबाबत सखोल संशोधन करण्यात आले असून ते पब्लिक डोमेन्सवर उपलब्ध आहे.

-डॉ. जे. हरिन्द्रन नायर 
संस्थापक व एमडी, पंकजाकस्तुरी हर्बल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

Web Title: Here are some tips to help you get rid of chronic covid by experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.