अंबानी हॉस्पिटलमध्ये हेरेडिटरी कॅन्सर क्लिनिक; १० टक्के कॅन्सरमागे जेनेटिक कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 05:38 AM2023-05-01T05:38:42+5:302023-05-01T05:38:58+5:30
हॉस्पिटलमध्ये यावेळी आयोजित ‘प्रिसिजन ऑन्कोलॉजी ॲण्ड पर्सनलाइज्ड मेडिसिन’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत कर्करोगाच्या नवीन प्रकारांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मुंबई - अद्ययावत वैद्यकीय उपचार पद्धती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सेवा देणाऱ्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने हेरेडिटरी कॅन्सर क्लिनिक सुरू केले आहे. येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत रविवारी या क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले. या क्लिनिकमुळे कर्करोग होण्याचा धोका असलेल्या कुटुंबीयांच्या प्रोॲक्टिव्ह जेनेटिक स्क्रिनिंगमुळे कर्करोगाचे निदान होण्यास व प्रतिबंध करण्यास मदत होणार आहे.
हॉस्पिटलमध्ये यावेळी आयोजित ‘प्रिसिजन ऑन्कोलॉजी ॲण्ड पर्सनलाइज्ड मेडिसिन’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत कर्करोगाच्या नवीन प्रकारांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या परिषदेत कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या अध्यक्ष टीना अनिल अंबानी यांनी भारत आणि जगभरातील ऑन्कोलॉजी क्षेत्रातील नामवंत डॉक्टर व संशोधकांचा सत्कार केला.
प्रिसिजन ऑन्कोलॉजी आणि वैयक्तिक वैद्यकीय उपचार हे कॅन्सरमधील देखभालीतील नवे दृष्टिकोन आहेत. आनुवंशिक कॅन्सर क्लिनिक सुरू करून आम्ही अचूक ऑन्कोलॉजी आणि वैयक्तिक औषधांवर लक्ष केंद्रित करत आहोत. ज्यामुळे कर्करोगाच्या कौटुंबिक जोखमीचा अंदाज लावण्यात आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात मदत होणार असल्याचे टीना अंबानी म्हणाल्या. यावेळी सीईओ आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. संतोष शेट्टी उपस्थित होते. भारतात दरवर्षी कॅन्सरच्या जवळपास १.४ दशलक्ष रुग्णांचे निदान होते. आनुवंशिक चाचणी हा प्रिसिजन ऑन्कोलॉजीचा एक महत्त्वाचा घटक आहे. याच्या साहाय्याने व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबातील जीन म्युटेशन्स ओळखता येतात. जनुकीय तपासणी अधिक किफायतशीर बनवण्यासाठी अंबानी हॉस्पिटलने त्याच्या खर्चामध्ये सवलत देखील दिली आहे.
जेनेटिक टेस्टिंग महत्त्वाचे का?
जेनेटिक टेस्टिंगमुळे जनुकामधील विशिष्ट बदल ओळखता येतात. संबंधित व्यक्तीला कॅन्सर होईल की नाही, याचे अनुमान लावण्यात मदत होते. आजाराचे पूर्वनिदान केले जाऊ शकते. जोखीम कमी करता येते. यासाठी टार्गेटेड थेरपी वापरता येते आणि कुटुंबातील इतर सदस्यांना किती धोका आहे, हे देखील समजून घेता येते, अशी माहिती अंबानी हॉस्पिटलच्या ऑन्कोलॉजी विभागाचे संचालक डॉ. राजेश मिस्त्री यांनी दिली.