Herpes Zoster: दोन टोकं एकमेकांना भेटली तर...; जाणून घ्या 'नागीण' आजाराविषयीचे ५ गैरसमज आणि तथ्यं!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 10:10 AM2023-03-16T10:10:42+5:302023-03-16T10:11:56+5:30
एखाद्या आजाराविषयी पुरेशी माहिती नसेल तर इतरांकडून ऐकून किंवा इंटरनेटवर माहिती वाचून आणखी गैरसमज होतात.
>> डॉ. हेमंत ठाकर
लोकांना एखाद्या आजाराबद्दल पुरेशी माहिती नसते आणि समोर आलेली कोणीही व्यक्ती त्या आजाराबद्दल जे सांगते त्यावर किंवा इंटरनेटवर वाचलेल्या माहितीवर विश्वास टाकण्याची त्यांची तयारी असते, तेव्हा त्या आजाराबद्दल गैरसमज निर्माण होतात. विषाणूजन्य आजार शिंगल्सबद्दलही अनेक गैरसमज आहेत. याला हर्पिस झोस्टर किंवा स्थानिक भाषेत 'नागीण' ही म्हटले जाते. या आजाराचे स्वरूप आणि त्यात होणाऱ्या डंखासारख्या, तीव्र वेदना यांमुळे त्याला नागीण असे म्हटले जात असावे. या आजाराचे कारण 'दैवी' असून हा एक शाप आहे असा समज लोकांमध्ये आढळतो. प्रत्यक्षात मात्र हा आजार विषाणूमुळे होत असल्याचे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे. तेव्हा, शिंगल्सशी निगडित काही गैरसमज आणि तथ्य या लेखात जाणून घेऊया.
१. गैरसमज: शिंगल्स हा एक शाप असून, तो काही जणांना होतो.
तथ्य: शिंगल्स हा कोणत्याही प्रकारचा शाप नाही, तर विषाणूचा प्रादुर्भाव आहे. वॅरिसेला झोस्टर विषाणूमुळे हा आजार होतो. याच विषाणूमुळे कांजिण्या हा आजारही होतो. जर कोणाला कांजिण्या झाल्या असतील, तर तो विषाणू मज्जातंतूंच्या मुळाशी सुप्तावस्थेत राहू शकतो. नंतरच्या आयुष्यात, एखाद्या टप्प्यावर व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यास, विषाणू पुन्हा सक्रिय होतो आणि त्या व्यक्तीला शिंगल्स हा आजार होतो. याचे पहिले लक्षण म्हणजे त्वचेवर उठणारे वेदनादायी पुरळ होय. त्यापाठोपाठ मज्जातंतूंमध्ये वेदना होऊ लागतात. मात्र, अनेक रुग्णांमध्ये पुरळ येण्यापूर्वीच वेदना सुरू होऊ शकतात. त्यांना पूर्वलक्षणी वेदना असे म्हणतात. या वेदना पुरळ नाहीसे झाल्यानंतर काही महिने किंवा वर्षेही सुरू राहू शकतात. या जटील लक्षणाला पोस्ट-हर्पेटिक न्युराल्जिया असे म्हणतात.
२. गैरसमज: शिंगल्स ही केवळ त्वचेची एक अवस्था आहे आणि मॉस्च्युरायजर किंवा तेल लावून ती दूर होते.
तथ्य: शिंगल्स ही त्वचेची नेहमीची अवस्था नाही; हा एक विषाणूजन्य आजार आहे आणि याचा परिणाम शरीरातील मज्जातंतूंवर होतो. व्हॅरिसेला झोस्टर विषाणूमुळे हा आजार होतो. याच विषाणूमुळे कांजिण्या हा आजारही होतो. शिंगल्समध्ये त्वचेवर उठणारे पुरळ हे सामान्य लक्षण असले तरी यात मज्जातंतूंना होणाऱ्या वेदना अधिक त्रासदायक असतात. या वेदना अनेकदा असह्य असतात. त्यांचे वर्णन 'डंखाप्रमाणे' आणि 'दाहक' असे केले जाते. बाळंतपणात येणाऱ्या कळांहूनही या वेदना अधिक तीव्र असतात असे वर्णन अनेक रुग्णांनी केले आहे. बहुतेकदा औषधांमुळे या वेदना पूर्णपणे शमवल्या जाऊ शकत नाहीत. रुग्ण या वेदना शमवण्यासाठी सुमारे ५ वेगवेगळी औषधे घेतात आणि तरीही मज्जातंतूंना होणाऱ्या वेदना सुरूच राहतात, असे जागतिक आकडेवारीतून दिसून येते. मात्र, केवळ लसीकरणामुळे या वेदनांचा प्रतिबंध होऊ शकतो आणि त्यामुळे यातील जटीलताही किमान स्तरावर राखल्या जाऊ शकतात, असेही आकडेवारीतून समजते.
जर या विषाणूचा परिणाम डोळ्याच्या मज्जातंतूंवर झाला, तर अंधत्व येऊ शकते. जर वरच्या पापणीला विषाणूचा संसर्ग झाला, तर डोळ्यांतून सतत पाणी येत राहते. जर चेहऱ्याच्या मज्जातंतूंना संसर्ग झाला आणि कपाळावर शिंगल्सचे पुरळ आले, तर त्यामुळे वाईट दिसण्याजोगे पिगमेंटेशन (रंगद्रव्य) राहू शकते. वयोवृद्ध रुग्णांमध्ये शिंगल्समुळे खूपच अशक्तपणा येऊ शकतो. यामुळे त्यांच्या भुकेवर व झोपेवर परिणाम होतो. यातून न्युमोनियासारखे प्राणघातक विकारही होऊ शकतात. लसीकरणामुळे हर्पीस झोस्टरला प्रतिबंध केला जातो आणि या सर्व जटीलतांपासून संरक्षण पुरवले जाऊ शकते.
३. गैरसमज: शिंगल्स हा आजार फार लोकांना होत नाही. हा संसर्ग होण्याची शक्यता खूपच कमी असते.
तथ्य: दर ३ जणांपैकी एकाला शिंगल्स होण्याची शक्यता असते आणि वयोवृद्धांना हा धोका अधिक असतो, असे जागतिक स्तरावरील आकडेवारीवरून दिसून येते. भारतात आपल्यापैकी बहुतेक प्रत्येक जण व्हॅरिसेला झोस्टर विषाणूच्या संपर्कात आलेला असतो हे वास्तव आहे. स्पष्ट लक्षणे दिसली नाहीत, तरी आपल्यापैकी बहुतेकांना कांजिण्या झालेल्या असतात किंवा कांजिण्या झालेल्यांच्या संपर्कात आपण आलेलो असतो. ५० वर्षांहून अधिक वयाच्या प्रौढांपैकी ९० टक्क्यांमध्ये कांजण्यांचा विषाणू असतो, असे अभ्यासांती लक्षात आले आहे. त्यामुळे ५० वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यास शिंगल्स होण्याची शक्यता असते. म्हणूनच वयोवृद्धांना हा धोका सर्वाधिक असतो. कारण, ‘इन्युनोसेनेसन्स’ या प्रकाराच्या वेगवेगळ्या टप्प्यांमधून ते जात असतात. याचा अर्थ शरीराची रोगप्रतिकार यंत्रणा आतून जुनी होत जाते आणि तिचे कार्य कमी होते. अर्थात लसीकरणामुळे व्यक्तीच्या रोगप्रतिकारशक्तीला शिंगल्सचा प्रतिकार करण्यासाठी बळ मिळू शकते.
४. गैरसमज: जर एखाद्याला एकदा शिंगल्स होऊन गेला असेल, तर त्याला पुन्हा शिंगल्स होत नाही.
तथ्य: एखाद्याला एकदा शिंगल्स झाला असला, तरी तो पुन्हा होऊ शकतो. असे होण्याची शक्यता कमी असली, तरी असे निश्चितपणे होऊ शकते. एकदा शिंगल्स होऊन गेला म्हणजे आयुष्यभर या विषाणूपासून संरक्षण मिळते असे नाही. मात्र, लसीकरणामुळे शिंगल्स पुन्हा होण्यापासूनही संरक्षण मिळू शकते. लसीकरण झाले असल्यास त्या व्यक्तीला शिंगल्स झाला, तरी सौम्य स्वरूपाचा होतो. ५० वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीसाठी लसीकरणाचे संरक्षण विशेषत्वाने महत्त्वाचे आहे. पूर्वी शिंगल्स होऊन गेलेल्यांसाठीही हे आवश्यक आहे.
५. गैरसमज: शिंगल्सचे पुरळ वाढत वाढत शरीराच्या मध्यरेषेला ओलांडून गेले आणि त्याची दोन्ही टोके एकमेकांना भेटली, तर त्या व्यक्तीचा मृत्यू होतो.
तथ्य: पुरळ सहसा शरीराची मध्यरेषा ओलांडत नाही. रोगप्रतिकारशक्ती खूपच क्षीण असलेल्या व्यक्तींमध्ये हे घडू शकते पण त्यामुळे मृत्यू होत नाही! शिंगल्सचे पुरळ शरीराच्या केवळ एका भागावर येते, कारण, विषाणू मज्जातंतूंच्या मुळाशी असतो आणि तो शरीराच्या केवळ एका भागातील विशिष्ट मज्जातंतूंमध्ये पसरतो. जेव्हा व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती खूपच कमकुवत असते, तेव्हा विषाणू मज्जातंतूंच्या अधिक व्यापक भागात पसरू शकतो आणि अशा परिस्थितीत शरीराच्या दोन्ही बाजूंवर पुरळ येते.
(लेखक मुंबईतील ब्रीच कॅण्डी, जसलोक, भाटिया व रिलायन्स या रुग्णालयांमध्ये कन्सल्टण्ट इंटर्निस्ट आणि कार्डिओ मेटाबोलिक फिजिशिअन आहेत.)