त्वचेच्या कर्करोगापासून बचाव करायचाय?; मग 'हे' व्हिटॅमिन ठरतं फायदेशीर!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 11:55 AM2019-08-02T11:55:28+5:302019-08-02T11:57:37+5:30
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, शरीराच्या विकासासाठी अनेक व्हिटॅमिन्सची आवश्यकता असते. प्रत्येक व्हिटॅमिन शरीराचं कार्य सुरळीत चालवण्यासाठी हातभार लावतं.
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, शरीराच्या विकासासाठी अनेक व्हिटॅमिन्सची आवश्यकता असते. प्रत्येक व्हिटॅमिन शरीराचं कार्य सुरळीत चालवण्यासाठी हातभार लावतं. त्यातल्यात्यात शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आणि डोळ्यांसाठी व्हिटॅमिन ए अत्यंत आवश्यक ठरतं. पण काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की, जर तुम्ही अशा पदार्थांचं सेवन करत असाल, ज्यामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असतं, तर त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका कमी असतो.
त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका 15 टक्क्यांनी कमी
जवळपास 1 लाख 25 हजार अमेरिकी नागरिकांवर करण्यात आलेल्या या संशोधनामध्ये असं आढळून आलं की, जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ए चं सेवन करणाऱ्या लोकांमध्ये squamous cell स्किन कॅन्सरचा धोका जवळपास 15 टक्क्यांनी कमी होतो. जामा डर्मेटोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनानुसार, लोकांनी जास्ती जास्त व्हिटॅमिन एचा स्त्रोत असणाऱ्या पदार्थांचे सेवन केलं होतं.
फळं आणि भाज्यांपासून मिळणारं व्हिटॅमिन ए सुरक्षित
अमेरिकेतील ब्राउन यूनिवर्सिटीचे असोशिएट प्रोफेसर यूनुंग चो यांनी सांगितले की, ' संशोधनामधून समोर आलेल्या निष्कर्षांमधून आहारामध्ये फळं आणि भाज्यांचा समावेश करणं कितपत आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. फळं आणि भाज्यांमध्ये मिळणारं व्हिटॅमिन ए सुरक्षित असतं. 'यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) यांनी सांगितल्यानुसार, व्हिटॅमिन ए असलेल्या पदार्थांमध्ये रताळी, गाजर, लोबिया, लाल शिमला मिरची, ब्रोकली, पालक, डेअरी प्रोडक्ट, मासे यांचा समावेश होतो.
जास्त उन्हामध्ये राहिल्याने स्किन कॅन्सरचा धोका
स्क्वॅमस सेल कार्सिनोमा स्किन कॅन्सरचा एक सामान्य प्रकार आहे. संशोधकांनी असं सांगितलं आहे की, 11 टक्के अमेरिकी नागरिक स्क्वॅमस सेल स्किन कॅन्सरने ग्रस्त आहेत. हा कॅन्सर प्रामुख्याने जास्तीत जास्त वेळ उन्हाच्या संपर्कात राहिल्याने होतो. खासकरून चेहरा आणि कपाळ जास्तवेळ उन्हाच्या संपर्कात येतात. या संशोधनामध्ये सरासरी 50 वर्षांच्या व्यक्तींमध्ये 75 हजार पेक्षा जास्त अधिक महिला आणि जवळपास 50 हजार पुरूषांचा डेटा समाविष्ट आहे. संशोधनामध्ये सर्वांना त्यांचं सरासरी आहार आणि सप्लिमेंट्सबाबत विचारण्यात आलं. यांमध्ये 4 हजार लोकांमध्ये स्किन कॅन्सर आढळून आला आणि या सर्व व्यक्ती व्हिटॅमिन ए असलेल्या पदार्थांचे सेवन कमी करत असल्याचे समोर आले.
जास्त 'व्हिटॅमिन ए'च्या सेवनाने हाडांवर होतो परिणाम
व्हिटॅमिन ए एक फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन आहे, याचा अर्थ असा आहे की, हे फॅट सेल्समध्ये जमा होतं. परंतु, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार, जेव्हा जास्त प्रमाणात व्हिटॅमिन एचं सेवन केलं जातं. तेव्हा हे असुरक्षित स्तरापर्यंत पोहोचलं जातं. दरम्यान, व्हिटॅमिन एचं जास्त सेवन केल्याने ऑस्टियोपोरोसिस आणि हिप फ्रैक्चर चा धोका वाढतो.
टिप : वरील सर्व बाबी या संशोधनातून सिद्ध झालेल्या आहेत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक ठरतं.