एक डोस घेतला की एड्सपासून मुक्ती मिळणार; लस बनविण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 07:05 PM2022-06-15T19:05:37+5:302022-06-15T19:07:56+5:30
शास्त्रज्ञांनी जीन एडिटिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने ही लस बनवली आहे. सध्या त्याची चाचणी उंदरांवर करण्यात आली आहे.
कॅन्सरनंतर आता संशोधकांना HIV/AIDS सारख्या जिवघेण्या आजारावर लस शोधण्यात मोठे यश आले आहे. इस्त्रायलच्या तेल अवीव विद्यापीठाच्या संशोधकांनी ही लस बनविली आहे. या लशीचा एक डोस घेतला की शरीरातील एड्सचे व्हायरस संपणार आहेत.
एक्वायर्ड इम्यूनो डेफिशिएंसी सिंड्रोम (AIDS) ह्यूमन इम्यूनो डेफिशिएंसी व्हायरसमुळे होणारा आजार आहे. हा व्हायरस चिम्पांझींपासून मनुष्याला झाला होता. हा एक लैंगिक आजार आहे. रुग्णाच्या वीर्य, रक्ताच्या संपर्कात आल्यावर दुसरा व्यक्ती संक्रमित होऊ शकतो. असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यास हा आजार पसरण्याची शक्यता आहे. सध्या या आजारावर कायमस्वरुपी उपचार उपलब्ध नाहीत.
शास्त्रज्ञांनी जीन एडिटिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने ही लस बनवली आहे. सध्या त्याची चाचणी उंदरांवर करण्यात आली आहे. लसीमध्ये टाइप बी पांढऱ्या रक्त पेशी (पांढऱ्या रक्त पेशी) वापरण्यात आल्या. यामध्ये उंदरांमध्ये या व्हायरसशी लढण्यासाठी अँटीबॉडीज विकसित झाल्याचे आढळले. या आजाराने ग्रस्त रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमकुवत होते आणि ते स्वतः व्हायरसशी लढण्यास सक्षम नसतात.
या औषधापासून बनवलेले अँटीबॉडी सुरक्षित आणि शक्तिशाली असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. संसर्गजन्य रोगांव्यतिरिक्त, कर्करोग आणि इतर रोगांपासून बरे होण्यासाठी ही लस उपयुक्त ठरू शकते. टाईप बी पांढऱ्या रक्त पेशी आपल्या शरीरातील विषाणू आणि बॅक्टेरियाविरूद्ध प्रतिकारशक्ती वाढवतात. रक्तवाहिन्यांद्वारे वेगवेगळ्या अवयवांमध्ये पोहोचतात. शास्त्रज्ञांनी सीआरआयएसपीआर या जीन एडिटिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यात बदल करण्यास सुरुवात केली आहे.