‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’... ‘त्या’ दोन बहिणींसाठी टाटा रुग्णालय झाले पालक! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 08:24 AM2022-05-08T08:24:17+5:302022-05-08T08:25:04+5:30

टाटा मेमोरिअल रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या इम्पॅक्ट फाउंडेशन गेली अनेक वर्षे कर्करोगाशी झुंज देणाऱ्या लहानग्यांचा आधार झालेली आहे.

‘HIV Positive’ ... Tata Hospital became parents for ‘those’ two sisters! | ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’... ‘त्या’ दोन बहिणींसाठी टाटा रुग्णालय झाले पालक! 

‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’... ‘त्या’ दोन बहिणींसाठी टाटा रुग्णालय झाले पालक! 

googlenewsNext

- स्नेहा मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’... या शब्दाने जगण्याचा अर्थच बदलून जातो. या असाध्य आजाराला धैर्याने सामोरे जाताना मायेच्या माणसांनी त्यांची कायमची साथ सोडली. दुर्दैवाचा फेरा म्हणजे आधीच एचआयव्हीसह जगणाऱ्या बीडच्या दोघी बहिणींना आपल्या धाकट्या बहिणीच्या रक्ताचा कर्करोगाच्या उपचारासाठी झगडावे लागत आहे. एप्रिल महिन्यात या बहिणींचा मामा त्यांना उपचारासाठी टाटा रुग्णालयाला सोडून गेला, तो मागे फिरकलाच नाही. मात्र, अशा वेळी माणुसकीच्या मायेचा पाझर असलेल्या टाटा मेमोरिअल रुग्णालयाने निराधार बहिणींचे ‘पालकत्व’ स्वीकारत त्यांना जगण्याची नवी उमेद दिली आहे.

टाटा मेमोरिअल रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या इम्पॅक्ट फाउंडेशन गेली अनेक वर्षे कर्करोगाशी झुंज देणाऱ्या लहानग्यांचा आधार झालेली आहे. प्रतिकूल परिस्थितीशी झगडणाऱ्या या दोन बहिणींविषयी अधिक माहिती देताना इम्पॅक्ट फाउंडेशनच्या शालिनी जठिया यांनी सांगितले, मूळच्या बीड जिल्ह्यातील असणाऱ्या या दोन बहिणींना एप्रिलच्या महिन्यात त्यांचा मामा घेऊन आला होता. दोघींपैकी धाकट्या १३ वर्षांच्या मुलीला रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाल्याचे डॉक्टरांना समजले, तर १९ वर्षांची मोठी बहीणही एचआयव्हीशी संघर्ष करते आहे. या दोघींना रुग्णालयात उपचाराकरिता घेऊन आलेला मामा अचानक गायब झाल्याचे प्रशासनाला लक्षात आले, त्यावेळेस शोधाशोध केली. फाउंडेशनशी संलग्न असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनाही यासंबंधी विचारपूस करण्यास सांगितली. मात्र, पदरी निराशा आली. अखेर परिस्थितीचे भान राखून या दोघींचे पालक होण्याचा निर्णय फाउंडेशनने घेतला.

टाटा रुग्णालयाशी संलग्न असणाऱ्या धर्मशाळेत दोघी बहिणींची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. या दोघींनाही एचआयव्हीची लागण झाल्याने, त्याचे उपचार सायन रुग्णालयात सुरू आहेत, याखेरीज सध्या दोघींनाही अगदी आई-वडिलांसारखेच जपण्यात येत आहे. त्यांच्या आहारापासून उपचार 
खर्च, औषधे, कपडे, खाऊ, आहार, वाहतूक खर्च, सुरक्षा व अन्य सर्व प्रकारची मदत टाटाकडून करण्यात येत आहे. नुकतेच ४ मे रोजी या बहिणींपैकी रक्ताचा कर्करोग झालेल्या लहान बहिणीला उपचाराकरिता टाटा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे जठिया यांनी सांगितले.

...तर निघून गेल्या असत्या
बालकर्करोग रुग्णांपैकी बऱ्याचदा काही रुग्ण उपचार अर्धवट सोडतात. त्यामुळे ठरावीक प्रकरणे अगदी संवेदनशीलपणे हाताळावी लागतात, त्यातलीच हे विशेष प्रकरण आहे. दोन बहिणींचा मामा निघून गेल्यानंतर, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. या दोघींकडे अधिकृत कागदपत्रेही नाहीत, अशात या बहिणी उपचार सोडून निघून जाण्याची शक्यता होती, परंतु त्यांचे समुपदेशन करून, संपूर्ण जबाबदारी टाटाने स्वीकारली आहे.

कुटुंबाने नाकारले 
टाटा रुग्णालय प्रशासनाने काही कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कुटुंबाने या दोन बहिणींची जबाबदारी घेण्यास नकार दिल्याची माहिती रुग्णालयातील सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे.

१३ वर्षीय मुलीची केमो थेरपी सुरू
रक्ताचा कर्करोग झालेल्या मुलीला टाटा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची केमो थेरपी सुरू आहे, तर त्या दोघींचे एचआयव्हीवरील एआरटी उपचार सायन रुग्णालयात सुरू असल्याची माहिती टाटा रुग्णालयाचे पीडियाट्रिक ऑन्कोलाॅजी विभागाचे प्रा.डॉ.माया प्रसाद यांनी दिली आहे.

Web Title: ‘HIV Positive’ ... Tata Hospital became parents for ‘those’ two sisters!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.