श्वासाचं बोट धरून वर्तमानात या, तुमचं जगणं तो समृद्ध करील..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 03:12 PM2017-10-25T15:12:45+5:302017-10-25T15:14:00+5:30
भूतकाळ आणि भविष्यकाळातील आभासी जगण्यानं आयुष्याचा होतो कोंडमारा
- मयूर पठाडे
अनेक जण असतात, ज्यांना एकतर भूतकाळानं पछाडलेलं असतं किंवा भविष्यकाळानं चिंतीत केलेलं असतं. वर्तमानकाळ जणू त्यांच्यासाठी नसतोच. एकतर ते भूतकाळात जगतात नाहीतर भविष्यकाळात..
अर्थातच अशा लोकांच्या आयुष्यात त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. कारण ‘वास्तवाशी’ संबंध नसलेल्या या गोष्टींचा त्यांना नुसता मनस्तापच होत नाही, तर वास्तविक काही करण्यातही अशा व्यक्ती बºयाचदा अपयशी ठरतात.
आयुष्याचा सामना करायचा, ते जसं आहे तसं स्वीकारत पुढे जायचं, आपली प्रगती साधायची तर त्यासाठी वर्तमानाचा हात धरण्याशिवाय गत्यंतर नाही. कारण वर्तमानात ज्या काही गोष्टी तुम्ही करतात, त्या आणि त्याच गोष्टींचा प्रभाव तुमच्या संपूर्ण आयुष्यावर पडत असतो. तुम्ही कोण आहात किंवा भावी आयुष्यात तुम्ही कोण असणार आहात, हे तुमच्या वर्तमानावरच ठरत असतं. त्यामुळे भूतकाळात किंवा भविष्यकाळात रमण्यापेक्षा वर्तमानात जगणं केव्हाही महत्त्वाचं.
पण वर्तमानात राहायचं तरी कसं?
आपल्या मनाला आवरायचं तरी कसं?
आता आपण वर्तमानातच जगायचं, असं नुसतं म्हणून तसं जगता येत नाही. त्यसाठी काही प्रयत्नही जाणीवपूर्वक करावे लागतात.
त्यातला सर्वात महत्त्वाचा उपाय तज्ञांनी सांगितला आहे, तो म्हणजे आपल्या श्वासाबरोबर जगायचं. अर्थात तेही सोपं नाहीच, पण थोड्या प्रयत्नांनी ते जमू शकतं. निदान दिवसातला काही काळ, काही मिनिटं जरी तुम्ही तुमच्या श्वासाबरोबर म्हणजे वर्तमानात जगला, तरी त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.
जी वेळ आपल्या सोयीची असेल, दिवसाच्या त्या वेळी आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. श्वास कसा येतो, कसा जातो ते अनुभवा. श्वासाचा तो उबदार अनुभव घ्या. आपल्या पोटाकडे लक्ष द्या. प्रत्येक श्वास आणि उच्छवासाबरोबर आपल्या पोटाचीही हालचाल होते. पोटाची ती हालचाल कशी होते ते अनुभवा. श्वास घेताना शरीरात हवा भरली जाते. त्यामुळे श्वास घेताना आपलं पोट थोडं फुगलं पाहिजे आणि श्वास सोडताना हवा बाहेर पडते. अशावेळी आपलं पोट खाली गेलं पाहिजे. श्वासाची आणि पोटाची ही हालचाल आपल्याला वर्तमानात राहायला शिकवेल. त्यामुळे श्वासाचं, आपल्या जगण्याचं बोट धरा आणि भूतकाळ, भविष्यकाळातून वर्तमानात या. तो तुमचं जगणं अधिक आश्वस्त करील..