Holi 2018 : होळीत केस व त्वचेची काळजी कशी घ्याल?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2018 11:19 AM2018-03-01T11:19:29+5:302018-03-01T11:19:29+5:30
जवळपास प्रत्येक जण होळीच्या उत्सवात सहभागी होत असतो.
- अमित सारडा, वेलनेस अँड ब्युटी एक्स्पर्ट
जवळपास प्रत्येक जण होळीच्या उत्सवात सहभागी होत असतो. मात्र, अनेकदा होळीच्या दुस-या दिवशी त्वचा फुटते, चेह-यावर पुरळ येतात आणि आनंदावर विरजण पडते. या वर्षी होळी खेळताना अशा प्रकारची समस्या उद्भवू नये, यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी याचा हा ऊहापोह...
होळीच्या आधी काय कराल
- होळीत त्वचा आणि केसांवर परिणाम करणारा घटक म्हणजे, होळी खेळताना वापरले जाणारे हानिकारक रासायनिक रंग. ही रसायने तुमच्या त्वचेत प्रवेश करू नयेत, यासाठी काळजी घेणे खूप गरजेचे आहे.
- त्यासाठी उत्तम उपाय म्हणजे, होळी खेळण्याआधी संपूर्ण शरीराला कॅस्टर आॅइल लावावे. त्यामुळे तुमची त्वचा कोरडी पडणार नाही आणि धोकादायक रंगांचा त्वचेवर परिणाम होणार नाही.
- प्रामुख्याने कानाच्या मागील बाजूला, कानाच्या पाळीजवळ आणि नखांवर तेल लावण्यास विसरू नका. कारण या ठिकाणी रंग सहजपणे टिकून राहण्याची सर्वाधिक शक्यता असते.
- होळीच्या आदल्या रात्री तुमचे केस तेल लावून तयार करावेत. डोक्याची त्वचा आणि केसांना कॅस्टर ऑइलने मसाज करावा.
- असे केल्याने केसांना तेलामुळे अतिरिक्त पोषण तर मिळेल आणि रंगांमुळे केस कोरडेही पडणार नाहीत. त्याशिवाय असे केल्याने त्वचेवरचा रंग लवकर आणि सहजपणे निघून जातो.
- तुमच्या डोक्याची त्वचा संवेदनशील असल्यास, कॅस्टर आॅइलमध्ये लेमन इसेंशियल ऑइलचे काही थेंब टाका. त्यामुळे रंगांतील रसायनांमुळे होणारी बाधा ही टाळता येतो.
होळीनंतर काय कराल
- रंग काढण्यासाठी साबणाने तुमची त्वचा जोरजोरात चोळू नका. पपई-काकडीपासून अथवा चंदनापासून तयार केलेल्या सौम्य साबणाचा वापर करा. त्यात त्वचेला आर्द्रता देण्याचे आणि त्वचा स्वच्छ करण्याचे गुणधर्म असतात.
- त्यानंतर त्वचेवर आॅलिव्ह आॅइल लावा. हे तेल हलके असल्याने ते त्वचेमध्ये त्वरित मुरते, शिवाय यात असलेल्या ‘ई’ जीवनसत्त्व आणि अँटी आॅक्सिडंट्समुळे ते त्वचेचे कंडिशनिंग उत्तम प्रकारे करते आणि त्वचा कोरडी पडत नाही.
- सर्वप्रथम तुमचे केस कोरडे रंग आणि मायकाचे लहान कण काढून टाकण्यासाठी भरपूर पाण्याने धुऊन घ्या. त्यानंतर, एसएलएस मुक्त रोझमेरी लॅव्हेंडर साबणाने केस धुऊन घ्या.
- तरीही केसांवर काही रंग मागे राहिला असेल, तर त्याच दिवशी केस धुऊ नका. त्यामुळे केस अधिक कोरडे होऊन विस्कटल्यासारखे दिसतील. केस वाळले की, त्यानंतर आॅलिव्ह ऑइलनी केसांना मसाज करा. दुसºया दिवशी केस धुऊन घ्या. या तेलामुळे केस निरोगी, मजबूत आणि चमकदार होतात.
- केस गळणे नियंत्रणात येते. डोक्याच्या कोरड्या झालेल्या त्वचेचे पोषण होते आणि केसांचा गुंता कमी होतो.
- केसांना अधिक हायड्रेटेड ठेवायचे असेल, तर तुम्ही सिट्रोनेला इसेंशियल आॅइल तुमच्या आफ्टर वॉश हेअर सिरममध्ये मिसळून ते लावावे. या इसेंशियल आॅइलमुळे केसांचे कंडिशनिंग उत्तम होते. ते घनदाट, गुंतामुक्त तर होतातच, शिवाय अधिक मऊ आणि निरोगी दिसू लागतात.