बाहेरच्या तुलनेत घरात असतं १० ते ३० टक्के अधिक प्रदूषण - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 11:04 AM2018-10-08T11:04:23+5:302018-10-08T11:05:14+5:30
दिवसा दरम्यान घराच्या आतील वायू प्रदूषण बाहेरच्या प्रदूषणापेक्षा जास्त असू शकतं. हे प्रदूषण व्हॅक्यूमिंग, जेवण तयार करणे, धुळ झाडणे किंवा ड्रायर वापरण्यासारख्या कामांमुळे होऊ शकतं.
(Image Credit : www.independent.co.uk)
दिवसा दरम्यान घराच्या आतील वायू प्रदूषण बाहेरच्या प्रदूषणापेक्षा जास्त असू शकतं. हे प्रदूषण व्हॅक्यूमिंग, जेवण तयार करणे, धुळ झाडणे किंवा ड्रायर वापरण्यासारख्या कामांमुळे होऊ शकतं. एका अभ्यासातून याचा खुलासा झाला आहे. या अभ्यासानुसार, घरातील प्रदूषणाचं प्रमाण हे बाहेरच्या तुलनेत १० ते ३० टक्के अधिक असू शकतं. त्यामुळे याने आरोग्यासंबंधी अनेक समस्या होऊ शकतात, खासकरुन अस्थमाने पीडित तरुणांना आणि वयोवृद्धांना अधिक समस्या होऊ शकते.
हार्ट केअर फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. के.के. अग्रवाल म्हणाले की, 'वायू प्रदूषण एक अदृश्य हत्यारा आहे. काही घरांमध्ये प्रदूषणाचं प्रमाण हे बाहेरच्या तुलनेत १० ते ३० टक्के अधिक असू शकतं. रोजच्या वापरातील वस्तू, घरातील वस्तू जसे की, पेंट, पाळीव प्राण्यांपासून अॅलर्जी आणि कुकिंग गॅस या कारणाने प्रदूषण अधिक होतं.
ते म्हणाले की, 'पर्यावरणात असलेल्या कणांचा संबंध थेट फुफ्फुसांशी येतो. याकारणाने सीओपीडी, अस्थमा आणि फुफ्फुसाचा कॅन्सर तसेच काही प्रकारच्या श्वसनासंबंधी समस्या होऊ शकतात. धुळीचे कण हे फुफ्फुसावर सूज, ऑक्सिडेटिव स्ट्रेस आणि सेल सायकल डेथला प्रभावित करतात. प्रदूषणामुळे अस्थमा आणि सीओपीडी असलेल्या लोकांना समस्या अधिक होऊ शकते.
डॉक्टरांनी सांगितले की, 'इनडोर वायू प्रदूषणाची समस्या सोडवणे इतकं सोपही नाहीये. सर्वसामान्यपणे यावर सोपा उपाय म्हणजे घराच्या खिडक्या उघडा आणि घरातील प्रदूषण बाहेर जाऊ द्यावे. पण प्रदूषित शहरांमध्ये प्रदूषण आत येऊ शकतं.
अशात घर आणि ऑफिसची वातावरण निंयत्रित ठेवा. बाथरुम आणि किचनमध्ये एक्झॉस्ट फॅन लावा. घरगुती उपकरणांना योग्यप्रकारे स्वच्छ करा, गालीचे स्वच्छ आणि कोरडे ठेवा, चादरी स्वच्छ ठेवा आणि त्यांना कडक उन्हात वाळत घाला.