उन्हाळ्यात त्वचेवर येणारी खाज रोखण्याचे खास अन् सोपे घरगुती उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 04:49 PM2023-02-28T16:49:50+5:302023-02-28T16:59:51+5:30
Summer Tips : तुम्हालाही या त्रासाला सामोरे जावे लागत आहे आणि त्रस्त झाला आहात तर त्यावर उपाय म्हणून आम्ही काही टिप्स तुम्हाला देणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुम्ही या त्रासावर मात करु शकाल.
Summer Tips : नुकतीच उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. त्यामुळे लोक या दिवसांमध्ये काय काय काळजी घ्यावी हे जाणून घेत आहेत. उन्हाला सुरू होताच गरम होणे, खूप घाम येणे आणि त्यासोबतच अंगाला खाज येणे अशा वेगवेगळ्या समस्या होत असतात. उन्हाळ्यात अंगाला खाज येणं ही समस्या फार चिडचिड वाढवणारी असते. काही लोकांना तर खाजेसोबत अंगावर घामोळ्याही येतात. अशात चिडचिड अधिक वाढते.
त्वचेला येणारी खाज आणि घामोळ्यांकडे दुर्लक्ष केल्यास संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच उन्हाळ्यात शरीर थंड ठेवणे अत्यंत गरजेचे असते. तुम्हालाही या त्रासाला सामोरे जावे लागत आहे आणि त्रस्त झाला आहात तर त्यावर उपाय म्हणून आम्ही काही टिप्स तुम्हाला देणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुम्ही या त्रासावर मात करु शकाल. चला तर मग पाहूयात काय आहेत हे उपाय…
- उन्हाळ्यात येणारा घामाचा वास, अंगाला खाज येणे तसेच जळजळ होण्यासारखे प्रकार रोखण्यासाठी दररोज स्वच्छ आणि ताज्या पाण्यात आंघोळ करावी. पाण्यात काही कडूलिंबाची पाने टाकल्यास फार उत्तम.
- उन्हाळ्यात त्वचेवर मुलतानी माती त्वचेसाठी खुपच फायदेशीर ठरते. जर तुमच्या अंगावर घामोळ्या झाल्या असतील तर मुलतानी मातीचा लेप लावावा त्यामुळे नक्कीच आराम मिळतो.
- त्वचेला येत असलेल्या खाजमुळे अनेकजण त्रस्त असतात यावर घरगुती उपाय म्हणजे बर्फाचे तुकडे खाज येणा-या जागेवर लावावेत. यामुळे काही प्रमाणात आराम मिळतो. तसेच बर्फाचे तुकडे एका कपड्यात गुंडाळुन पाच ते दहा मिनिटांपर्यंत खाज येत असलेल्या जागेवर लावावे. चार ते सहा तासांच्या अंतरामध्ये अशा प्रकारे तुम्ही बर्फाचे तुकडे खाज येत असलेल्या जागेवर लावू शकता.
- शरीराला येत असलेली खाज थांबविण्यासाठी मीठ, हळद आणि मेथी यांचे मिश्रण करा. तसेच हे मिश्रण आंघोळीपूर्वी अंगावर पाच मिनिटांपर्यंत लावावे. त्यानंतर पाच मिनिटांनी आंघोळ करावी. आठवड्यातून एकदा अशा प्रकारे उपाय केल्यास त्वचेला होणारी जळजळ आणि खाज रोखण्यास मदत होते.
- उन्हापासून वाचण्यासाठी त्वचेचा रुक्षपणा कमी करण्यासाठी कोरफड फायदेशीर ठरू शकते. त्वचेवर कोरफड जेलसुद्धा लावता येऊ शकते.