या खास उपायांनी दूर करा घोरण्याची समस्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 05:06 PM2018-07-02T17:06:48+5:302018-07-02T17:08:28+5:30
झोपेत घोरण्याची सवय ही त्या व्यक्तीसोबत इतरांसाठीही त्रासदायक असते. ही सवय असणारा व्यक्ती तर शांत झोपतो पण आजूबाजूच्यांना मात्र रात्रभर झोप लागत नाही.
(Image Credit: www.dcourier.com)
झोपेत घोरण्याची सवय ही त्या व्यक्तीसोबत इतरांसाठीही त्रासदायक असते. ही सवय असणारा व्यक्ती तर शांत झोपतो पण आजूबाजूच्यांना मात्र रात्रभर झोप लागत नाही. म्हणूनच जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी व्यक्ती घोरत असेल तर या काही जीभेच्या व तोंडाच्या व्यायामाने त्यावर वेळीच मात करा. एका संशोधनानुसार या व्यायामामुळे घोरण्याचे प्रमाण 36% कमी होते तर 59 % घोरण्याचा आवाज कमी होतो.
कसा कराल व्यायाम –
1. घोरणार्या व्यक्तीने, टाळूच्या विरुद्ध दिशेला जीभेचे टोक मागे वळवण्याचा प्रयत्न करावा.
2. जीभ टाळूवर घासून खालच्या बाजूला आणण्याचा प्रयत्न करा.
3.घोरण्याच्या समस्येनी पीडित लोकांनी जीभेच्या पुढच्या टोकाला टाळूच्या दिशेनं दाबावं त्यानंतर जीभेला पुन्हा खेचून घ्यावं. आता जीभेच्या पुढच्या बाजूने दातांना स्पर्श करत जीभेच्या मागील भागास टाळूच्या दिशेला दाबावे आणि ‘ए’ उच्चार करावा.
अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ केंटुकी कॉलेज ऑफ मेडिसिनचे मेडीकल डिरेक्टर बारबार फिलीप्स यांच्यानुसार, घोरण्याच्या समस्येसंबंधी अनेक लोकांना दिलासा देण्यासाठी हे संशोधन उपायकारक आणि विना शस्त्रक्रिया आहे.
काही घरगुती उपाय
1) एक कप कोमट पाण्यात एक चमचा हळद आणि एक चमचा मध मिश्रित करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण प्यावे.
2) रोज झोपण्याआधी कोमट पाण्यात वेलची पावडर मिश्रित करून प्यावे. यानेही घोरण्याची समस्या कमी होते.
3) हळद ही अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे. रोज झोपण्याच्या अर्धातासआधी हळद घातलेलं दूघ प्यावे. यानेही घोरण्याची समस्या कमी होईल.
4) झोपण्यापूर्वी पाण्यात पुदीन्याच्या तेलाचे काही थेंब टाकून गुरळा करा. याने नाकाच्या छिद्रांवरील सूज कमी होईल आणि श्वास घेण्यास सोपं होईल.
झोपण्याची स्थिती बदला
पाठीवर झोपणे चांगले मानले जाते. मात्र खूप कमी लोकांना माहित आहे की, पाठीवर झोपल्याने घोरण्याची शक्यता वाढते. कारण पाठीवर झोपल्याने तुमचा टाळू आणि जीभ गळ्यातील वरच्या भागात येतात. त्यामुळे मोठ्या आवाजात ध्वनी उत्पन्न होतो आणि तोच आवाज घोरण्यात बदलतो. यामुळेच सरळ पाठीवर झोपण्याऐवजी कुशीवर झोपा. कुशीवर झोपल्याने घोरण्याची शक्यता कमी होते.
वजन कमी करा
घोरणारे अनेक लोक स्थूल असतात. स्थुलतेमुळे गळ्याजवळ खूप अधिक फॅट्स जमा होतात. त्यामुळे गळ्याजवळील पेशी आकूंचन पावतात आणि हेच घोरण्याचे मोठे कारण ठरते. यापासून वाचण्यासाठी नियमित व्यायाम करा आणि संतुलित आहार वजन घ्या.
ऑलिव्ह ऑईल
ऑलिव्ह ऑईलमुळे श्वास घेताना होणारा त्रास दूर होतो. रात्री झोपण्यापूर्वी मधासोबत ऑलिव्ह ऑईल घेतल्याने फायदा होतो.
उशी
उशी घोरण्याचे कारण होऊ शकते. नियमित उशीचे कव्हर न बदलल्यास त्यामुळे घोरण्याला उत्तेजना मिळते. अनेकदा डोक्यातील कोंडा, केस उशीवर पडतात. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तसंच यामुळे एलर्जी होऊ शकते. श्वास घेण्याची क्षमतेला नुकसान पोहचते. त्यामुळे उशीचे कव्हर नियमित बदला आणि स्वच्छ कव्हरचा वापर करा.
(टिप - हे उपाय करुनही तुमची घोरण्याची समस्या बंद झाली नाहीतर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या)