मध शुद्ध आहे की भेसळयुक्त?; घरबसल्या "या" सोप्या पद्धतीने असं करा चेक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 06:14 PM2020-12-03T18:14:38+5:302020-12-03T18:20:48+5:30
Honey Real or Fake How to Identify : मध तयार करणाऱ्या सर्वाधिक कंपन्या मधामध्ये साखर मिसळत असल्याची माहिती या तपासातून मिळत आहे.
नवी दिल्ली - देशातील अनेक मोठ्या कंपन्यांच्या मधामध्ये भेसळ असल्याची माहिती समोर आली आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरमेंटनं (CSE) केलेल्या तपासातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. मध तयार करणाऱ्या सर्वाधिक कंपन्या मधामध्ये साखर मिसळत असल्याची माहिती या तपासातून मिळत आहे. सीएसईने 13 छोट्या मोठ्या कंपन्यांच्या मधाचे नमूने तपासले. या कंपन्यांच्या मधात 77 टक्क्यांपर्यंत भेसळ असल्याचं दिसून आलं. मधाचे एकूण 22 सँपल्सपैकी फक्त पाच सँपल्स चाचणीत यशस्वी ठरले आहेत.
सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरमेंटनं (CSE) केलेल्या तपासातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. सीएसईच्या महासंचालक सुनीता नारायण यांनी "2003 आणि 2006 मध्ये सॉफ्ट ड्रिंकच्या केलेल्या तपासणीत त्यात जी भेसळ दिसून आली त्यापेक्षा भयानक भेसळ ही मधात केली जात आहे. ही भेसळ आपल्या शरीराला अपायकारक आहे. ज्या 13 मोठ्या कंपन्यांच्या मधाचे नमूने तपासले गेले त्यापैकी 10 एनएमआर चाचणीत अयोग्य ठरले. या 10 पैकी 3 नमूने भारतीय मापदंडानुसारही नव्हते" अशी माहिती दिली आहे.
तुम्ही ब्रँडेड मध खाताय, मग वेळीच व्हा सावध! देशातील "या" मोठ्या ब्रँडच्या मधात 77 टक्क्यांपर्यंत भेसळhttps://t.co/Tt0Q8XuRTy#India#Honey#CSE
— Lokmat (@MiLOKMAT) December 3, 2020
मध शुद्ध आहे की भेसळयुक्त?; असं करा चेक
- मध शुद्ध आहे की भेसळयुक्त हे तपासण्यासाठी पाण्यामध्ये मधाचे काही थेंब टाका. जर मध खाली पाण्यात जमा झाले तर ते शुद्ध आहे हे सिद्ध होते. मात्र जर मध पाण्यात मिसळले गेले तर ते भेसळयुक्त आहे हे सिद्ध होतं.
- मध भेसळयुक्त आहे की नाही हे तपासण्यासाठी आयोडीनची गरज आहे. यासाठी मध पाण्यामध्ये मिसळावे लागणार आहे. त्यानंतर या पाण्यात थोडे आयोडीन टाकावे.
- जर या मिश्रणाचा रंग निळा झाला तर यामध्ये स्टार्च किंवा पीठ मिसळले आहे हे समोर येतं. यामुळे या मधामध्ये भेसळ असल्याचं सिद्ध होतं. आयोडीनच्या मदतीने हे तपासता येतं.
- तिसऱ्या पद्धतीमध्ये ब्लोटिंग पेपरवर थोडं मध घ्या. जर मध पेपरने शोषूण घेतलं तर या मधामध्ये भेसळ आहे.
- चौथ्या पद्धतीमध्ये एका लाकडाला कापूस गुंडाळावा. त्यानंतर तो मधामध्ये हे बुडवा आणि त्यानंतर त्याला आग लावा. जर मध जळू लागले तर ते शुद्ध आहे.
डाबर, पतंजलीसह अनेक ब्रँडच्या मधात भेसळ, CSE चा मोठा खुलासा
सीएसईने केलेल्या अभ्यासात पतंजली, डाबर, बैद्यनाथ, झंडू, हितकारी आणि एपिस हिमालयसारख्या कंपन्यांचं मध शुद्धतेचं प्रमाण तपासणाऱ्या न्युक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स (NMR) या चाचणीत अयशस्वी ठरलं आहे. मात्र डाबर आणि पतंजलीने या चाचणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. दरम्यान कंपनीची प्रतीमा मलिन करण्याचा या चाचणीमागील प्रयत्न असल्याचं या कंपन्यांचं म्हणणं आहे. आम्ही भारतात नैसर्गिक रित्या मिळणारा मधच एकत्र करतो आणि त्याची विक्री करतो, असा दावाही या कंपन्यांकडून करण्यात आला आहे.
जाणून घ्या मधाचे आरोग्यदायी फायदे :
शरीराला मिळते ऊर्जा
मधातील ग्लुकोज शरीर लगेचच शोषून घेते. ज्यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा कायम टिकून राहते. शिवाय,व्यायाम करण्यापूर्वीही अर्धा चमचा मधाचे सेवन करावे, यामुळे थकवा जाणवत नाही. चहा-कॉफीमध्ये साखरऐवजी मधाचा वापर करावा.
खोकल्यावर फायदेशीर
नियमित दोन चमचे मध खाल्ल्याने सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो. मधामध्ये अँटी मायक्रोव्हियल गुण असल्यानं यामुळे संसर्ग पसरवणाऱ्या जिवाणूंचाही खात्मा होतो.
हृदयविकारांचा धोका होतो कमी
आरोग्य तज्ञ्जांनुसार मधाचे सेवन केल्यास रक्तामध्ये पॉलिफोनिक अँटी-ऑक्सिडेंट्सचा स्तर वाढवतो, यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो.
चांगली झोप मिळते
मधातून सेरोटोनिन रसायन निघते, यामुळे आपली मनःस्थिती चांगली राहण्यास मदत मिळते. मधातील सेरोटोनिन रसायन शरीर मेलाटोनिन रसायनात बदलते, यामुळे झोप चांगली मिळते. अपुऱ्या झोपेचा त्रास सतावत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात मध मिसळून प्यावे. यामुळे चांगली झोप येईल.
रक्तदाब नियंत्रणात राहतो
नियमित एक चमचा मध किंवा गरम पाण्यामध्ये मध मिसळून प्यायल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.)