आपला इण्टरव्ह्यू फसला, नोकरी गेली हातची हे कसं ओळखाल?
By Admin | Published: May 31, 2017 04:23 PM2017-05-31T16:23:12+5:302017-05-31T16:23:12+5:30
आपली पात्रता असते तरी नोकरी मिळत नाही, इण्टरव्ह्यू फसतो तेव्हा नक्की काय घडतं?
- पवित्रा कस्तुरे
नोकरीच्या इण्ट्यरव्ह्यूला जाताना छातीत धडधडतंच. आपल्याकडे डिग््रया असतात, नॉलेज असतं, आपण पात्रही असतो, अनुभवही असतो. पण तरी आपल्याला हवी ती किंवा मिळेलच अशी खात्री असलेली चांगली नोकरी अनेकदा मिळत नाही. आपल्याला वाटतं की, आपला इण्टरह्यू तर चांगला झाला, खूप इम्प्रेस झाले मुलाखत घेणारे, पण मग तरी आपल्याला ती नोकरी का मिळाली नाही? असं अनेकदा झालं, वारंवार झालं की आपण निराश व्हायला लागतो. कळत नाही चुकतं काय? कुणाचं? आणि कशानं? पण त्यावरही उपाय आहे, आपली मुलाखत नक्की कशी झाली, हे आपलं आपणच समजून घ्यायचं. म्हणजे मग पुढच्या कॉलची वाट पाहत न बसता, पुढच्या मुलाखतीच्या उत्तम तयारीला आपण मोकळे.
कसं ओळखा नोकरी गेली हातची की नाही ते?
दोन मिण्टात बाहेर?
तुम्ही आत जाता, मुलाखत घेणारा एखादाच प्रश्न विचारतो. तुम्ही उत्तरही तुमच्यामते अचूक देता. पण मग तो म्हणतो या आता. आम्ही कळवतो. तिथंच ओळखायचं की आपली शितावरुन भाताची परीक्षा झाली आहे, त्यांच्यालेखी आपण योग्य उमेदवार नाही. मुलाखत फारच कमीवेळ झाली की आपली विकेट गेली हे समजून घ्यायचं.
तुमचं शिक्षण खूप जास्त आहे..
असं आपली कागदपत्रं पाहून जर मुलाखत घेणारा म्हणाला तर समजा की, आपली दांडी गूल. काहीतरी कारण सांगायचं म्हणून तसं सांगतात किंवा खरंच एवढं जास्त शिक्षण असलेला उमेदवार त्यांना नको असतो त्या पदासाठी. मात्र काहीही झालं तरी अर्थ तोच, नकार.
तुम्ही अमूकतमूक का करत नाही
समजा, प्रश्न विचारण्यापेक्षा मुलाखत घेणारा तुम्हाला सल्ले देवू लागला, हे करा-ते करा, अमूक का करत नाही तर समाजयचं की आपल्याला जा असं सांगता येत नाही म्हणून हे सारं चाललं आहे.
तुम्ही फार टॅलेण्टेड आहात
असं कधी कधी मुलाखत घेणारे सांगतात, आपल्याला बरं वाटतं. पण तसं नसतं. त्यांना खरंतर सांगायचं असतं की तुम्ही ओव्हरस्मार्ट आहात, ही चालाखी इथं नाही चालायची. या आपण.
मुलाखतीला उशीर
म्हणजे अनेकदा होतं काय पहिल्या राऊण्डला सिलेक्शन होतं. पण पुढचा कॉलच येत नाही. मेलला उत्तर येत नाही. समजा आलाच एखादा कॉल तर रिसेप्शनवर बसवून ठेवतात. मुलाखतीला उशीर करतात. आणि मग थातूरमातूर कारण सांगून नकार देतात. असं का करतात? ते चूक की बरोबर हा वेगळ्या चर्चेचा मुद्दा. मात्र त्यातून आपल्याला मेसेज एकच, नोकरी नाही.