श्रावणात कसे ठेवाल डाएटवर नियंत्रण?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2016 01:17 PM2016-08-21T13:17:32+5:302016-08-21T18:47:32+5:30
वेळी-अवेळी उपवासाचे पदार्थ खाल्ल्याने अॅसिडिटी आणि अपचन यासारखे आजार जडतात आणि मग कसला उपवास आणि कसलं काय?
सुंदर साजरा, श्रावण आला ’ असे म्हणत प्रत्येक गृहिणी श्रावण महिन्याचे स्वागत करते. श्रावण महिन्यात असलेल्या सणावारांमुळे या महिन्याला एक आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मंगळागौरी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, श्रावणी सोमवार, नागपंचमी, तीज हे सण श्रावणात असतात. या दिवसांत महिलांमध्ये खमंग चर्चा सुरू होते ती या महिन्यात कराव्या लागणाºया उपवासांची. खरं पाहिलं तर उपवासाच्या दिवशी एवढे पदार्थ खाल्ले जातात की, जेवढे पदार्थ आपण उपवास नसताना कधीच खात नाही. वेळी-अवेळी उपवासाचे पदार्थ खाल्ल्याने अॅसिडिटी आणि अपचन यासारखे आजार जडतात आणि मग कसला उपवास आणि कसलं काय? संपूर्ण दिवस गोळ्या औषधी घेण्यातच जातो. आपल्याला उपवासाच्या दिवसांत कु ठलाच त्रास होऊ नये आणि निरोगी स्वास्थ्यासह देवाची आराधना करावी असे वाटत असेल तर मग डाएटवर नियंत्रण कसे ठेवता येईल यासाठीच्या काही टिप्सचा आढावा आज घेऊयात...
* उपवासाचा ‘फील’ नको :
‘मला आज उपवास आहे, उपवास आहे’ असे म्हणत आपण साबुदाणा खिचडी, वडे, भगर, चीप्स, रताळ्याची खीर, साबुदाणा खीर असे एक ना अनेक पदार्थ दिवसभर खात असतो. अतिप्रमाणात पदार्थ खाल्ल्याने पचनशक्ती मंदावते आणि मग सुरू होतो अपचन आणि अॅसिडिटीचा त्रास. उपवास म्हणजे हसत-खेळत करायला हवा. सकाळी एकदा उपवासाचा पदार्थ खाल्ल्यानंतर दुपारी वाटले तर खावे अन्यथा एखादे फळ खावे. त्यानंतर संध्याकाळीही फळ किंवा ज्यूस सेवन करावा. कारण, रात्रीच्या वेळी थोडंसं ‘लाईट’ खाद्यपदार्थाचे सेवन केले पाहिजे. उपवासाच्या दिवशी असे समजावे की, आपण आज डाएटवर आहोत.
* पुरेशी झोप असते आवश्यक :
केवळ उपवासाचे पदार्थ कमी खाल्ले म्हणजे आपली तब्येत चांगली राहील असे मुळीच नाही. जसे पोटासाठी काहीतरी खाणं आवश्यक असतं तसंच निरोगी स्वास्थ्यासाठी पुरेशी झोप घेणेही तेवढेच आवश्यक असते. त्याशिवाय दिवसभर फ्रेश वाटत नाही आणि उगीचच असे वाटत राहते की, आपल्याला उपवास आहे, अशक्तपणा जाणवतोय. पुरेशी झोप घेतली म्हणजे मनही शांत राहते आणि जास्त खाण्याकडे लक्ष जात नाही. कमीत कमी दोन-तीन तास तरी झोप उपवास असलेल्या दिवसांमध्ये घ्यायला हवी. त्यामुळे खूप अॅक्टिव्ह राहण्यास मदत होते आणि शरीर हलके झाल्याचा ‘फील’ येतो.
* फळे, ज्यूस, सुका मेवा यावर असावा भर :
उपवास म्हटला की, साबुदाण्याचे विविध पदार्थ करून आपण खातो. पण साबुदाणा हा पचायला फारच जड असतो. या दिवसात जेवढे पचायला हलके पदार्थ खाता येईल तेवढे खायला हवेत. उदा. फळे, ज्यूस, सुकामेवा या पदार्थांमुळे शरीराला शक्तीही मिळते आणि सुस्त, आळशी फिलिंग जाऊन शरीर हलके झाल्यासारखे वाटते. श्रावण महिना म्हणजे पावसाळा ऋतू. या दिवसातील थंड वातावरणामुळे सुका मेवा, फळे पचण्यास लवकर मदत होते. असे पदार्थ थोडे जरी खाल्ले तरी पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे साबुदाणा खाण्यापेक्षा सुका मेव्याचे सेवन वाढवावे.
* नियमित व्यायाम :
श्रावणात उपवास म्हणत म्हणत आपण एवढे खातो की, वजन वाढते. मग वजन वाढले की, स्वत:ला आरशात पाहण्याचीही आपली इच्छा होत नाही. उपवासाच्या दिवशी तुम्ही कुठलाही आहार घ्या; पण नियमित व्यायाम करा. म्हणजे तुम्ही जेवढे खाल तेवढे तुम्ही जिरवता. त्यामुळे तुम्हाला रात्रीच्या वेळीही साबुदाण्याचे पदार्थ खाता येऊ शकतील. व्यायाम प्रकारात मयुरासन, भुजंगासन, प्राणायाम, योगा, हाता-पायाचे व्यायाम करावेत. त्यामुळे तुमचा घाम गेल्यानंतर काहीतरी खाण्याची इच्छा नक्कीच होईल, यात काही शंका नाही.