मीठ, साखरेतील मायक्रो प्लास्टिक किती धोकादायक?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2024 11:19 AM2024-10-06T11:19:13+5:302024-10-06T11:19:44+5:30
ऑगस्ट महिन्यात अनेक वृत्तपत्रे आणि केबल वाहिन्यांवर टॉक्सिक्स लिंक या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या संशोधनांवर आधारित बातम्या प्रसिद्ध झाल्या.
डॉ.जगन्नाथ दीक्षित सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ
ऑगस्ट महिन्यात अनेक वृत्तपत्रे आणि केबल वाहिन्यांवर टॉक्सिक्स लिंक या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या संशोधनांवर आधारित बातम्या प्रसिद्ध झाल्या. या संस्थेने भारतात विकल्या जाणाऱ्या मिठाचे १० आणि साखरेचे ५ असे एकूण १५ नमुने तपासले. त्यातील काही नमुने त्यांनी बाजारात जाऊन प्रत्यक्ष विकत घेतले तर काही ऑनलाइन पद्धतीने मिळवले. मिठाच्या १० नमुन्यांपैकी ८ आणि साखरेच्या नमुन्यांपैकी ४ हे ब्रँडेड होते. मिठाच्या नमुन्यांमध्ये प्रति किलोग्रॅमला ०.१ मिमी ते ५ मिमी आकाराचे ६.७१ ते ८९.१५ मायक्रो प्लास्टिकचे तुकडे सापडले.
ते धागे, गोळ्या, पातळ आवरण आणि फ्रेग्मेनटच्या स्वरुपात होते. साखरेच्या नमुन्यांमध्येही असेच आढळून आले. मिठात आणि साखरेत आढळलेले मायक्रो प्लास्टिक हे आठ वेगवेगळ्या रंगांचे होते. आपण सेवन करत असलेले अन्न आणि पाणी तसेच हवा या विविध माध्यमातून आपल्या शरीरात मायक्रो प्लास्टिकचे हजारो तुकडे प्रवेश करतात आणि त्यांचा आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो.
टॉक्सिक्स लिंकने केलेल्या या अभ्यासामुळे या समस्येकडे लक्ष वेधले गेले आहे. मीठ आणि साखर यांचे सेवन प्रत्येक व्यक्ती दररोज करत असल्याने त्यापासून शरीरात मायक्रो प्लास्टिक शिरण्याचा धोका जास्त आहे. यासंदर्भात मे, २०१९ मध्ये एन्व्हायर्नमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी या नियतकालिकात “ह्युमन कन्झम्प्शन ऑफ मायक्रो प्लास्टिक्स” हा शोधनिबंध प्रकाशित झाला.
कॅनडा येथील कॉक्स, कोवर्तन, डेव्हीस आणि इतरांनी केलेल्या या अभ्यासात अमेरिकन जेवणात सामान्यतः सेवन केले जाणारे अन्नपदार्थ, त्यांचे आहारातील शिफारस केलेले प्रमाण यानुसार त्यात मायक्रो प्लास्टिकचे किती कण असतात हे तपासण्यात आले. श्वसनाद्वारे आणि पाणी पिण्यामुळे किती मायक्रो प्लास्टिक कण शरीरात जातील याचाही अभ्यास करण्यात आला. यात २६ अभ्यासातील ३६०० प्रक्रियान्वित नमुन्यांचा समावेश होता.
या अभ्यासातून असे लक्षात आले की वय आणि लिंगानुसार अमेरिकन व्यक्तीच्या शरीरात मायक्रो प्लास्टिकचे वर्षाला ३९००० ते ५२००० कण प्रवेश करतात. श्वसनाद्वारे प्रवेश करणाऱ्या मायक्रो प्लास्टिक कणांचा विचार केल्यास ही संख्या ७४००० ते १२१००० इतकी वाढली.
बाटलीबंद पाणीच कायम
पिणाऱ्या लोकांमध्ये मायक्रो प्लास्टिक कणांची संख्या वर्षाला ९०००० ने वाढली. या अभ्यासातून असे लक्षात आले की मायक्रो प्लास्टिक शरीरात प्रवेश करण्याचे प्रमाण किती जास्त आहे ! हे सर्व घडण्याचे कारण म्हणजे प्लास्टिकचा वाढलेला वापर. यातील ९०६ प्लास्टिक पॅकेजिंगशी संबंधित असण्याची दाट शक्यता आहे तर उर्वरित ३३७७ संबंधित असण्याची काही प्रमाणात शक्यता आहे. त्यामुळे मायक्रो प्लास्टिकमुळे होणारे दुष्परिणाम फक्त त्या कणांचे नसून त्यासोबत येणाऱ्या हानिकारक रसायनांचे देखील असू शकतील.
जगात २०२१ मध्ये ३९० मेट्रिक टन प्लास्टिकचे उत्पादन झाले. त्यापैकी ४० टक्के पॅकेजिंगसाठी वापरण्यात आले. प्लास्टिक वापरणे सोपे, स्वस्त आणि सोयीचे आहे यात शंका नाही. विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे प्लास्टिक पॅकेजिंगशी संबंधित सुमारे ४२८३ रासायनिक पदार्थ आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन २०१९ मध्ये “पिण्याच्या पाण्यातील मायक्रो प्लास्टिक” हा अहवाल प्रसिद्ध केला. याचाच पाठपुरावा म्हणून तज्ज्ञ समिती स्थापन करून, डिसेंबर २०२१ पर्यंतच्या सर्व अभ्यासाचा विचार करून “मानवी शरीराला मायक्रो प्लास्टिकचा होणारा उपसर्ग आणि त्याचे आरोग्यावर होणारे संभावित परिणाम” हा अहवाल ३० ऑगस्ट २०२२ मध्ये प्रकाशित केला.
या अहवालात खालील निष्कर्ष काढण्यात आले
मानवाला होणारा मायक्रो आणि नॅनो प्लास्टिक कणांचा उपसर्ग हा सार्वत्रिक असून तो अनेक मार्गांनी होतो. या उपसर्गाबाबत आणि तो हवा, अन्न, पेयजल या सर्व मार्गांनी किती प्रमाणात होतो याविषयी मर्यादित माहिती उपलब्ध आहे. या विविध मायक्रो आणि नॅनो प्लास्टिक घटकांचे गुणधर्म आणि त्यांचे प्रमाण याविषयी अधिक अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.
उपलब्ध साथरोग शास्त्रीय पुराव्यानुसार श्वसनाद्वारे किंवा सेवनाद्वारे शरीरात प्रवेश करणाऱ्या मायक्रो किंवा नानो प्लास्टिक कणांमुळे फुफ्फुस तसेच जठर आणि आतडे यावर काय परिणाम होतो याबाबतची माहिती अपुरी आहे आणि गुणवत्तापूर्ण नाही.
मानवी शरीरातील मायक्रो प्लास्टिक कणांचा प्रवेश, त्यांचे वितरण आणि उत्सर्जन यांच्याशी संबंधित शरीर क्रिया यंत्रणांमुळे उतींना होणारा उपसर्ग कमी होतो.
रक्तात प्रवेश केल्यानंतर किंवा विविध पेशी आवरणामध्ये शिरकाव केल्यानंतर या कणांचे जैविक वितरण कसे होते आणि ते जैविक तटबंदी पार करू शकतात का याविषयी पुरेशी माहिती उपलब्ध नाही.