कसं लक्षात येईल, पण तुम्ही नक्कीच तणावात आहात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 04:00 PM2017-09-14T16:00:36+5:302017-09-14T16:02:09+5:30
धावायचं सगळ्यांनाच आहे, पण ही लक्षणं दिसत असतील तर थांबा थोडं..
- मयूर पठाडे
एकामागे एक कामांचा रगाडाच आजकाल इतका असतो.. एक संपलं की दुसरं, दुसरं संपलं कि तिसरं.. ना कामांची यादी संपत, ना काम.. एकट्या माणसानं पळायचं तरी किती आणि कसं? त्याचीही क्षमता कधीतरी संपतेच.. पण तरीही पळत राहाणं त्याच्या नशिबातून काही सुटत नाही.. आता तर ही धावाधाव, पळापळ इतकी वाढली आहे की, या पळापळीमुळे आणि रोजच्या कामाच्या टेन्शनमुळे आपल्या शरीरावर काही परिणाम होतोय, याकडे पाहायलाही आपल्याला वेळ नसतो. या टेन्शनची लक्षणंही आपल्याला दिसेनाशी होतात. कारण आपल्या मागे लागलेला असतो वाघ आणि हा वाघ आपल्या पाठी लागलेला असल्यावर इतर गोष्टींकडे आपलं लक्ष जाणार तरी कसं?
पण शास्त्रज्ञांनी याबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. आपण जर टेन्शनमध्ये असू, तर त्याची लक्षणं आपल्याला दिसतातच. त्याकडे आपण लक्ष ठेवायला हवं आणि त्यापासून वेळीच योग्य ती काळजीही घेतली पाहिजे.. ही लक्षणं खरं तर आपल्याशी बोलत असतात, आता थांबा थोडं, लक्ष द्या इकडे.. नाहीतर तुम्ही गोत्यात याल..
टेन्शनची कोणती लक्षणं आपल्याला दिसतात?
१- ज्यांना सततचा तणाव असतो, त्यांना डोकेदुखीची समस्या हमखास जडते. अनेकदा ही डोकेदुखीही विचित्र असते, सुटीच्या दिवशी, विकेण्डला ती नक्की डोकं वर काढते. या काळात डोकं जास्त दुखतं.
२- सतत धावाधाव आणि शंभर गोष्टी उरकण्याच्या मागे असलेल्या महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान जास्त त्रास होणं, क्रॅम्प्स येणं या समस्या इतर महिलांच्या तुलनेत नेहमीच जास्त प्रमाणात जाणवतात. शारीरिक नव्हे, तर मानसिक ताणामुळे आलेलं हे दुखणं आहे, हे आपण वेळीच समजून घेतलं पाहिजे.
३- अनेकदा काही जणांचा जबडा दुखतो. दातदुखी वगैरे कारणापेक्षाही टेन्शनमुळे आलेलं हे दुखणं असू शकतं. त्याचबरोबर काही जणांची दातखीळ बसते किंवा दातांना हुडहुडी भरून ते वाजायला लागतात, त्याचंही कारण थंडी नव्हे, तर चिंता हेच असू शकतं.
४- आपल्या आयुष्यात स्वप्नांना खूप महत्त्व आहे. भविष्यात काही करायचं तर स्वप्न पाहावीत असंही म्हटलं जातं. त्यासाठी डॉ. कलामांचाही दाखला दिला जातो. ही स्वप्नं जर सकारात्मक असली तर दुसºया दिवशी सकाळी उठल्यावर तुम्हाला खरोखरच फ्रेश वाटतं, पण तुम्हाला जर चित्रविचित्र स्वप्नं पडत असतील किंवा रात्री मध्येच केव्हाही अचानक जाग येत असेल, रात्री एकापेक्षा जास्त वेळा तुम्ही उठत असाल, तर लक्षात घ्या, ही स्वप्नं त्रासदायक आहेत आणि तुमचं टेन्शन तुम्हाला झोपू देत नाहीए.
शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, ही लक्षणं जर तुमच्यात दिसत असतील, तर त्यापासून वेळीच सावध व्हा. आपला वेग थोडा कमी करा. थोडे शांत व्हा. धावायचं तर सगळ्यांनाच आहे, पण थकलेले असताना, जर तुम्ही धावलात, तर फार पुढे तर तुम्ही जाणार नाहीतच, पण फार काही तुम्हाला करताही येणार नाही.