थायरॉइड आहे; पण कोणता?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 07:54 AM2018-04-05T07:54:40+5:302018-04-05T07:54:40+5:30
थायरॉइड असं सरसकट म्हणताना त्यातला हा भेदही लक्षात घ्या...
थायरॉइड हार्मोनचे प्रमाण अधिक झालं तर त्यातून उद्भवणाऱ्या आजाराला म्हणतात हायपरथायरॉइडीझम. थायरॉइड असं सरसकट म्हणताना त्यातला हा भेदही लक्षात घ्या...
आपल्या शरीरात थायरॉइड हार्मोनचा समतोल राहणं गरजेचं असतं हे आत्तापर्यंतच्या लेखांमधून स्पष्ट झालंच. थायरॉइड हार्मोनच्या कमतरतेमुळे होणाºया आजाराला हायपोथायरॉइडीझम असे म्हणतात, या उलट थायरॉइड हार्मोनचे प्रमाण अधिक झाले तर त्यातून उद्भवणाºया आजाराला थायरोटॉक्सिकोसिस-हायपरथायरॉइडीझम असे म्हणतात.
थायरोटॉक्सिकोसिस व हायपरथायरॉइडीझम या दोहोंमध्ये फरक करणं गरजेचं आहे. या दोन्ही आजारांची लक्षणे साधारणत: सारखी असली तरीही लागणारे उपाय मात्र वेगवेगळे असतात. थायरो-टॉक्सिको-सिसमध्ये रक्तांमधील थायरॉइड हार्मोन प्रचंड प्रमाणात वाढतं. हे अतिरिक्त वाढलेलं प्रमाणच या आजारातील लक्षणांना जबाबदार असतं. थायरोटॉक्सिकोसिस अनेक कारणांमुळे होऊ शकतो. पण ज्यावेळेस थायरॉइड ग्रंथी अधिक सक्रिय होऊन हा आजार होतो त्याला हायपरथायरॉइडीझम असे म्हणतात.
लक्षणं काय?
आपल्या शरीरामध्ये थायरॉइड हार्मोन्स चयापचय, वाढ व विकास आणि हृदयाचं स्पंदन नियमित ठेवणं ही कार्ये करत असतात. शरीरातील प्रत्येक पेशींवर आपला प्रभाव पाडून तेथील कार्य हे हार्मोन्स नियंत्रणात ठेवतात. पण रक्तात ज्या वेळेस या हार्मोन्सचं प्रमाण अव्वाच्या-सव्वा वाढते तेव्हा अधिक सक्रियतेमुळे या सर्व क्रि या अतिवेगाने घडत असतात. जणू काही शरीरातील क्रि यांवर कोणीतरी फास्ट-फॉर्वर्डचं बटण दाबलं असावं.
या अवस्थेत विनाकारण वजन कमी होणं, हाताला कंप सुटणं, जुलाब होणं, ऊन /गर्मी सहन न होणं, दरदरून घाम येणं, छातीत धडधडणं इ. लक्षणं प्रामुख्याने दिसून येतात. ही लक्षणीय लक्षणं बघितल्यावर बरेच वेळा इतर गंभीर आजारांशी याचा संबंध जोडला जातो. त्यामुळे बरेच वेळा निदान करण्यात दिरंगाई होते. म्हणून या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता थायरॉइडची तपासणी करून घेतल्यास आजाराचं निदान होतं.
फरक ओळखा
थायरोटॉक्सिकोसिस व हायपरथायरॉइडीझम या दोन्हींमध्ये फरक करणं गरजेचं असते. थायरोटॉक्सिकोसिस हा बरेच वेळा थायरॉइडायटीसमुळे होत असतो व थायरॉइडायटीस हा छोट्या मुदतीचा आजार असून, त्याकरता तात्पुरती औषधयोजना करावी लागते. हायपरथायरॉइडीझम हा मुख्यत: ग्रेव्हज या आजारामुळे होत असतो व त्यात थायरॉइड ग्रंथी अधिक सक्रिय असते. ग्रेव्हज या आजारात डोळे, त्वचा व नखांवरदेखील परिणाम होत असतो. डोळ्यांना सूज येणं, लाल होणं व बाहेर येणं यासारखी बाह्य लक्षणं दिसू शकतात.
या आजाराचं निदान रक्तातील टी ३, टी ४, टीसीएच या तपासणीने होऊ शकते. पण फक्त रक्त तपासणीने थायरोटॉक्सिकोसिस व हायपरथायरॉइडीझम या दोन्हींमध्ये फरक करणे अवघड जाते. रु ग्णाची बाह्य लक्षणं, थायरॉइड स्कॅन व विशेष रक्त तपासणी यातून तज्ज्ञ डॉक्टरांना योग्य निष्कर्षापर्यंत पोहचण्यास मदत मिळते. योग्य निदान झाल्यावर उपचाराला योग्य दिशा मिळते व हे आजार आटोक्यात येण्यास मदत होते.
हायपरथायरॉइडीझम हा दीर्घ मुदतीचा आजार असून, नियमित औषधे घेतल्यास आजार बहुअंशी बरा होतो. रेडिओ आयोडीन थेरपी व सर्जरीसारख्या उपचारांचीदेखील काही वेळेस गरज पडू शकते.
‘ना जास्त ना कमी, आरोग्याची देतो हमी’ अशा या छोट्या; परंतु अतिशय महत्त्वाच्या थायरॉइड ग्रंथी व त्याच्या विकारांबद्दल मागील काही लेखांमध्ये आपण जाणून घेतले. आता पुढच्या लेखांमध्ये सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय- वजन ! त्याविषयी बोलू..
डॉ. यशपाल गोगटे
(लेखक एण्डोक्रिनॉलॉजिस्ट अर्थात हार्मोन तज्ज्ञ आहेत.)
dryashpal@findrightdoctor.com