तुमच्या घरातील चहा भेसळयुक्त नाही ना? ओळखा चहामधील भेसळ, FSSAI ने सांगितली युक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 04:01 PM2021-10-24T16:01:33+5:302021-10-24T16:04:37+5:30
तुम्ही पिताय त्या चहामध्ये भेसळसुद्धा असू शकते. रंगीत पदार्थ आणि खराब झालेली पाने मिसळून चहामध्ये भेसळ करतात. यामुळे तुमच्या तोंडाची चव तर खराब होतेच पण असा चहा रोज प्यायल्याने आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. चला तर मग जाणून घेऊयात तुम्ही घरच्या घरी चहा पावडरमधील भेसळ कशी ओळखाल.
आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरूवात एक कप चहाने होते. आपल्यापैकी बहुतेकांना त्याची चव आवडते. चहा प्यायल्यानंतर आपल्याला ताजेतवाने वाटते. ते आपली ऊर्जा वाढवण्यास मदत करते. ऑफिसमध्ये कामाचा थकवा दूर करण्यासाठी अनेकदा चहा प्यायला जातो. पण तुम्हाला माहित आहे का? तुम्ही पिताय त्या चहामध्ये भेसळसुद्धा असू शकते. रंगीत पदार्थ आणि खराब झालेली पाने मिसळून चहामध्ये भेसळ करतात. यामुळे तुमच्या तोंडाची चव तर खराब होतेच पण असा चहा रोज प्यायल्याने आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. चला तर मग जाणून घेऊयात तुम्ही घरच्या घरी चहा पावडरमधील भेसळ कशी ओळखाल.
चहातील भेसळीचा वाईट परिणाम
चहाच्या पानांमध्ये खराब पाने आणि रंगाची भेसळ करताता. त्याचबरोबर प्रक्रिया केलेल्या आणि रंगीत चहाची भेसळही चहाच्या पानांमध्ये केली जाते. यामुळे यकृताचे विकार आणि आरोग्याशी संबंधित इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.
खरी आणि बनावट कशी ओळखावी
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने ट्विट केले आहे की तुम्ही चहामध्ये खराब झालेल्या पानांची भेसळ कशी ओळखू शकता.
सर्व प्रथम एक फिल्टर पेपर घ्या. आता चहाची पाने फिल्टर पेपरवर पसरवून ठेवा. थोडे पाणी शिंपडा जेणेकरून फिल्टर पेपर ओले होईल.जर चहामध्ये भेसळ असेल तर तुम्हाला फिल्टर पेपरवर डाग दिसतील.जर चहा शुद्ध असेल तर फिल्टर पेपरवर कोणताही डाग दिसणार नाही.
चहा पिण्याचे फायदे
अनेक अभ्यासानुसार, ठराविक प्रमाणात चहा प्यायल्याने तुमच्या आरोग्याला फायदा होतो. चहामध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. चहा पिणे कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारण्यासाठी देखील उपयुक्त आहे, परंतु जर तुमच्या चहामध्ये भेसळ असेल तर तुम्हाला हे फायदे मिळणार नाहीत, त्यामुळे चहामधील भेसळ तपासणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.