कसं जगायचं आयुष्य? त्यासाठीचं काही सूत्र आहे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 05:03 PM2017-11-29T17:03:28+5:302017-11-29T17:05:57+5:30
प्रत्येक क्षणाची अनुभुती आणि तरुण विचार ठेवतील तुम्हाला आनंदी, उत्साही..
- मयूर पठाडे
आयुष्य कसं जगायचं? मोठा अवघड प्रश्न आहे, पण प्रत्येकानं त्यासाठीच आपापलं उत्तर शोधलेलं असतं आणि त्यापद्धतीनं ते जगत असतात.
पण खरं तर आयुष्य जगण्याचं एकच सूत्र आहे आणि ते लहानापासून मोठ्यांपर्यंत साºयांना लागू आहे.
काय आहे हे सूत्र?
तुमचं वय काहीही असू द्या, पण तुमचे विचार तरुण असले पाहिजेत, तारुण्याचा अनुभव तुम्ही घेत असला पाहिजेत आणि जणू उद्याचा दिवस, उद्याचा क्षण पुन्हा येणारच नाही, या पद्धतीनं प्रत्येक क्षणाची अनुभुती घेतली पाहिजे. अर्थातच तो क्षण आनंदाचाच असेल असं नाही, पण त्या क्षणात तुम्हाला जगता आलं पाहिजे.
बस्स, एवढंच आहे जगण्याचं सूत्र..
या सूत्राच्या जोडीला आणखी एक कृती मात्र पाहिजे.
शरीर आणि मन आनंदी, तरुण ठेवायचं तर तुमच्या शरीरालाही तशी सवय लावली पाहिजे. त्यासाठी काही जण व्यायाम करतात, कोणी कुठल्या तरी छंदाला वाहून घेतात.
अर्थातच त्यासाठी व्यायामाला पर्याय नाही, पण काही जणांना वाटतं, आपलं शरीर जणू काही तासलेलं असावं, इतकं परफेक्ट असावं. सिक्स पॅक्स असावेत. शरीरावर थोडीही चरबी दिसायला नको. त्यासाठी ते जिवाचं रान करतात, पण संशोधकांचं आणि अभ्यासकांचं म्हणणं आहे, त्यासाठी इतका अतिरेक करायची आणि शरीराला नको इतकं छळण्याचीही काहीच गरज नाही. तुमच्या वयाला झेपेल असा खेळ मात्र प्रत्येकानं अवश्य खेळला पाहिजे. तो तुम्हाला नुसतं तंदुरुस्तच राखणार नाही, तर तुम्हाला तारुण्यही बहाल करील. तुम्ही ज्या वयाचे आहेत, त्यापेक्षा तो तुम्हाला नक्कीच तरुण बनवील.
व्हायचंय तुम्हालाही तरुण?.. मग चला खेळायला..