वयानुसार मुलांना नेमकी किती तास झोप हवी? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 10:17 AM2024-01-01T10:17:33+5:302024-01-01T10:18:33+5:30
मुलांच्या शाळेच्या वेळेबद्दल सध्या बरीच चर्चा चालू आहे.
मुलांच्या शाळेच्या वेळेबद्दल सध्या बरीच चर्चा चालू आहे. मुलांची झोप अपूर्ण होतेय. शाळा उशिरा म्हणजे नऊनंतर भरवावी, वगैरे वगैरे. त्यानुसार मुलांचे पोषण करावे. मुलांच्या विकासासाठी योग्य आहार आणि शरीराला आरामाची नितांत गरज असते. आरामातून शरीर वाढ होते, मेंदू वाढीसाठी झोपेची गरज असते. झोपेची गरज वयोमानानुसार बदलत असते.
१. जन्म ते ४ महिने: १८ ते २२ तास
२. ४ महिने ते १२ महिने: १२ ते १६ तास
३. एक ते २ वर्षे : ११ ते १४ तास
४. ३ ते ५ वर्षे : १० ते १३ तास
५. ६ ते १२ वर्षे : ९ ते १२ तास
६. १३ ते १८ वर्षे : ८ ते १० तास
वरील वेळ वयोमानानुसार झोपेची गरज असते. सहसा शालेय जीवनात ९ ते १३ तास झोपेची आवश्यकता असते. झोप पूर्ण झाल्याने मुलांची आकलनविषयक शक्ती वाढते आणि भाषाविषयक ज्ञान वाढते. आकलनविषयक म्हणजे वैचारिक आणि काल्पनिक शक्ती, आठवण शक्ती, तर्क-वितर्क हे बुद्धीचे कार्यप्रणाली. बऱ्याच शास्त्रीय संशोधनात असे आढळून आले, की जी मुले कमी झोपतात, ते शाळेत मध्येच डुलकी घेतात. त्यामुळे त्यांची बुद्धी कौशल्य विकसित झालेले नव्हते.
अपुरी झोप झाल्याने मुले शाळेत झोपी जातात, चिडचिडे होतात. त्यांचं अभ्यासात लक्ष नसते. ते मंद होतात. त्यांची निर्णय क्षमता कमी होते, मनातील द्वंद्व सोडविता येत नाही. झोपेची कमतरता बराच काळ चालू राहिला तर मुलांत विशेषतः कुमार वयात डिप्रेशन, चिंतेचा आजार होऊ शकतो. एका संशोधनात आढळले की ९ तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या मुलांत ‘ग्रे मॅटर’ कमतरता असते. हा ‘ग्रे मॅटर’ एकाग्रता, आठवणशक्ती, प्रसन्नता यासाठी आवश्यक असतो. सर्व प्रथम, रात्री उशिरापर्यंत जागरण करणे हे समाजात प्रचलित होत चाललेले आहे. काही घरगुती समारंभ, वाढदिवसाची पार्टी हे रात्री उशिरा चालतात.
दुसरे, दुसऱ्या दिवशी सुटी आहे म्हणून रात्री उशिरापर्यंत काहीतरी प्लॅन बनविणे, दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत झोपणे किंवा प्रत्येक शनिवारी असा रात्री उशिरापर्यंतचा काहीतरी कार्यक्रम करणे, अशी दिनचर्या होत चालली आहे. पालकांचे बघून मुलेही अशी जीवन पद्धती अवलंब करतात.
एकंदरीत, या लहान मुलांचे मेंदू दिवसभर स्पर्धेसाठी, काहीतरी साध्य करण्यासाठी सक्रिय असतात. ते केल्यावर बदललेल्या जीवनमानामुळे त्या मेंदूला विश्रांती घेता येत नाही. मग मेंदने सक्रिय होऊन साध्य केलेले मजबूत आणि घट्ट कौशल्य कसे होणार?-डॉ. शैलेश उमाटे, मानसोपचारतज्ज्ञ