वयानुसार नेमकं किती तास झोपावं?; निद्रानाशाचा आरोग्यावर होतो वाईट परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 04:52 PM2024-07-22T16:52:30+5:302024-07-22T16:58:29+5:30
झोपेत व्यत्यय आल्याने अनेक प्रकारच्या समस्यांचा धोका वाढतो. त्यामुळे डॉक्टर पुरेशी झोप घेण्याचा सल्ला देतात.
निरोगी राहण्यासाठी जशी अन्न आणि पाण्याची गरज असते, तशीच पुरेशी झोपही महत्त्वाची असते. पण, आजच्या धावपळीने लोकांची शांतता हिरावून घेतली आहे. दिवसभराच्या कामाच्या ताणाचा थेट परिणाम त्यांच्या रात्रीच्या झोपेवर होत आहे. झोपेत व्यत्यय आल्याने अनेक प्रकारच्या समस्यांचा धोका वाढतो. त्यामुळे डॉक्टर पुरेशी झोप घेण्याचा सल्ला देतात.
असे केल्याने केवळ शारीरिकच फायदा होणार नाही, तर मानसिक आरोग्यही सुधारेल. तथापि, एखाद्याला दररोज किती झोपेची आवश्यकता असते हे त्या व्यक्तीच्या वयावर अवलंबून असते. वयानुसार कोणी किती झोपावं? याविषयी जाणून घेऊया...
पुरेशी झोप घेणं महत्त्वाचं का आहे?
तणाव दूर ठेवण्यासाठी अनेकजण रात्रभर टीव्ही किंवा मोबाईलवर चित्रपट पाहतात. ज्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या अहवालानुसार, निरोगी राहण्यासाठी रात्री किमान सात तासांची झोप आवश्यक आहे. उत्तम आरोग्य आणि वाढीसाठी, सर्व वयोगटातील लोकांची झोपण्याची वेळ बदलत राहते. रिपोर्टनुसार, प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी झोपेचे वेगळं गणित असतं.
४ ते १२ महिन्यांची मुलं - १२ ते १६ तास
१ ते २ वर्षे वयोगटातील मुलं - ११ ते १४ तास
३ ते ५ वर्षे वयोगटातील मुलं - ११ ते १४ तास
६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलं - ९ ते १२ तास
१३ ते १८ वर्षे वयोगटातील मुलं - ८ ते १० तास
१८ वर्षांनंतर - किमान ७ तास
६० वर्षांनंतर - ८ तास
पुरेशी झोप न मिळाल्याने होणाऱ्या समस्या
महत्त्वाच्या कामांप्रमाणेच पुरेशी झोप घेणेही महत्त्वाचे आहे. असे न केल्यास अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. डॉक्टरांच्या मते, पुरेशी झोप न घेतल्याने महिलांमध्ये मधुमेह, हृदयविकार आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढू शकतो. याशिवाय कमी झोपेचा परिणाम शरीरातील पेशींवरही होतो. त्याच वेळी, पुरेशी झोप न मिळाल्याने शरीरातील मिनरल्सचं प्रमाण बिघडू शकतं ज्यामुळे हाडं देखील कमकुवत होऊ शकतात.