का होते डोकेदुखी आणि किती प्रकारची असते डोकेदुखी? करा हे उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 11:50 AM2018-08-24T11:50:29+5:302018-08-24T11:50:58+5:30
सुरुवातीला हळूहळू होणारी डोकेदुखी नंतर वाढत जाते. काहींना तर असह्य वेदना होतात. कधी कधी तर वेदना इतक्या होतात की, औषध घेतल्यावरही डोकेदुखी कमी होत नाही.
(Image Credit : parade.com)
डोकेदुखी ही अलिकडे सामान्य समस्या झाली आहे. सुरुवातीला हळूहळू होणारी डोकेदुखी नंतर वाढत जाते. काहींना तर असह्य वेदना होतात. कधी कधी तर वेदना इतक्या होतात की, औषध घेतल्यावरही डोकेदुखी कमी होत नाही.
का होते डोकेदुखी?
डोकेदुखी प्रामुख्याने तणाव, जास्त शारीरिक आणि मानसिक परिश्रम, कमी झोप, भूक, जास्त आवाजामुळे, इलेक्ट्रिक उपकरणांच्या अधिक प्रयोगामुळे होते. कधी कधी जास्त विचार करणे, कमी पाणी पिणे यानेही डोकेदुखी होते.
डोकेदुखीची प्रमुख कारणे -
तणाव
जेव्हा शरीर आणि मनाला तणाव सांभाळणे कठिण होऊन बसते तेव्हा डोकेदुखी होऊ लागते. विपश्यना किंना ध्यान डोकेदुखी कमी करण्यास मदत करतं. जितकं जास्तवेळ तुम्ही ध्यान लावून बसाल तितका तुमचा तणाव दूर होतो.
मन आणि शरीराचा थकवा
दिवसभर घर आणि ऑफिसच्या कामासाठी धावपळ करावी लागते. जेव्हा थकवा शरीरासोबत मनावर वाढतो तेव्हा दोन्हीमुळे डोकेदुखी होते.
असंतुलित शारीरिक तंत्र
तुमच्या कधी लक्षात आलं असेल की, जेव्हा तुमचं पोट खराब असतं तेव्हा तुम्हाला डोकेदुखी होत असेल. आपल्या शरीराचे वेगवेगळे अंग एकमेकांशी चांगल्याप्रकारे जुळलेले आहेत. त्यामुळे एका भागात कोणत्याही प्रकारचं असंतुलन दुसऱ्या भागाला प्रभावित करतं.
लो ब्लड सर्कुलेशन
डोक्यामध्ये कमी रक्त पुरवठा झाल्यावरही डोकेदुखी होऊ लागते. त्यामुळे दिवसातून केवळ १० ते १५ मिनिटे ध्यान लावून बसाल तर याने शरीराला शांतता मिळेल आणि रक्तप्रवाह सुद्धा नीट होईल.
कमी झोप घेणे
खूप जास्त वेळ काम करणे, जास्त काम करण्याची सवय किंवा टीव्ही आणि इंटरनेटची सवय यामुळे रात्री उशीरा झोपणे होते. पण या सवयी आरोग्यासाठी चांगल्या नाहीयेत. याने तुमची झोप पूर्ण होत नाही आणि हेच डोकेदुखीचं कारण ठरु शकतं.
अत्याधिक गोंधळ
आपण अनेकदा अत्याधिक आवाज, कर्णकर्कश आवाज अनुभवला असेल. काहींना अजिबातच हा आवाज सहन होत नाही. अशांना लवकरच डोकेदुखी होऊ लागते.
फोनवर जास्तवेळ बोलणे
फोनवर जास्तवेळ बोलणे टाळायला हवे. याने तुमचा त्रास वाढू शकतो. दिवसभर क्लाईंटसोबत बोलणे, नंतर मित्रांशी बोलणे हे अनेकदा होतं. पम फोनवर जास्तवेळ बोलल्याने डोकेदुखी होऊ शकते.
प्रमाणापेक्षा जास्त विचार करणे
जास्त विचार करणेही तुमची डोकेदुखी वाढवू शकतं. रोजची धावपळ, तणाव, कामाचा ताण, परिवाराचं टेन्शन, संबंधातील तणाव हे सगळं असतंच. पण दिवसातून थोडा वेळ शांत डोळे लावून ध्यान केल्यास हा त्रास कमी होऊ शकतो.