तासाभरात तुम्ही किती अंतर चालू शकता?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 05:31 PM2017-11-22T17:31:57+5:302017-11-22T17:32:38+5:30
किती पावलं चालली म्हणजे किती किलोमीटर होतं, हे तुम्हाला माहीत आहे?
- मयूर पठाडे
प्रत्येक सर्वसाधारण माणसानं साधारण रोज दहा हजार पावलं चालली पाहिजेत हे आपण मागच्या लेखात पाहिलं. आपल्या आरोग्यासाठी एवढं चालणं सर्वोत्तम आहे. पण त्यासाठी किती वेळ लागतो, हे तुम्हाला माहीत आहे? किती वेळात आपण किती पावलं चालू शकतो, याचं एक ढोबळ गणीत तुम्हाला माहीत आहे?.. ते माहीत असेल तर त्याप्रमारे तुम्ही आपलं चालण्याचं गणित ठरवू शकता.
सर्वसाधारण व्यक्तीचा चालण्याचा वेग; म्हणजे खूप हळूही नाही आणि खूप जोरातही नाही, असं चाललं तर आपला चालण्याचा वेग असतो सामान्यत: ताशी ५.६ किलोमीटर.
याच हिशोबानं पाहिलं तर सामान्यपणे दोन हजार पावलं चालण्यासाठी, म्हणजेच १.६ किलोमीटर अंतर चालण्यासाठी आपल्याला लागतात १७ मिनिटे.
दहा हजार पावलांसाठी त्यामुळे आपल्याला लागतील ८५ मिनिटं. एवढ्या वेळात तुम्ही आठ किलोमीटर अंतर चालू शकता.
अर्थात प्रत्येकाचा चालण्याचा वेळ वेगवेगळा असू शकतो आणि त्यानुसार त्याला वेगवेगळा वेळ लागणार हे निश्चित..
किती अंतर चालण्यासाठी किती वेळ आपल्याला लागतो ते आता पाहू.
तुमचा चालण्याचा वेग ताशी चार मैल असेल तर आठ किलोमीटर अंतर चालण्यासाठी तुम्हाला साधारणपणे दीड तास लागेल. हाच वेग जर ताशी पाच मैल असेल तर एक तास लागेल.
संशोधकांनी रोज दहा हजार पावलं चालण्याचा सल्ला आपल्याला दिला आहे याचं कारण आपलं आरोग्य. अर्थातच हे अंतर तुम्ही एकाच वेळी चाललं पाहिजे असं नाही. दिवसभरात हे अंतर तुम्ही कसंही चालू शकता. पूर्वी लहानसहान गोष्टींसाठी, बाजारात जाण्यासाठी, किराणा सामान आणण्यासाठी आपण पायीच जात असू. त्यासाठी कोणतीही ‘गाडीघोडा’ आपण वापरत नव्हतो. त्यामुळे साधारणपणे प्रत्येकाचंच एवढं चालणं दिवसभरात अगदी सहजपणे होत असे. आता ते होत नाही, यासाठीच आरोग्यतज्ञांचा हा सल्ला.
आपला चालण्याचा वेग कसा आहे हे तपासा आणि त्याप्रमाणे दिवसभरात हे टार्गेट पूर्ण करा. निदान सुरुवात तर करा.. बघा काय फरक पडतो ते..