हृदयविकार असलेल्यांनी दिवसाला किती पाणी प्यायला हवे? तज्ज्ञ डॉक्टर म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 07:49 PM2024-01-04T19:49:40+5:302024-01-04T19:51:00+5:30
हृदय संबंधीचे रोग असलेल्या लोकांना कमी पाणी पिण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात
Drinking Water For Heart Patients: शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे असे सतत सांगितले जाते. काही लोक दिवसांतून ६ ते ८ ग्लास पाणी पिण्याबद्दल सांगतात, तर काही लोक दररोज दोन ते तीन लिटर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पाणी हेच जीवन आहे. पण हृदय संबंधीचे रोग असलेल्या लोकांना कमी पाणी पिण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. अशा वेळी हृदयरुग्णांसाठी दिवसाला किती पाणी पिणे फायदेशीर ठरेल याबद्दल जाणकार काय म्हणतात, जाणून घेऊया.
आरोग्याच्या दृष्टीने काही हृदयरुग्णांना पाण्यासह काही द्रवपदार्थांच्या सेवनाबाबत काळजी घ्यावी लागते, असे इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल, नवी दिल्ली येथील हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपणाचे तज्ज्ञ डॉ. मुकेश गोयल सांगतात. तर मणिपाल हॉस्पिटल, बेंगळुरू येथील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी कन्सल्टंट डॉ. प्रदीप हरनहल्ली यांच्या मते, काही परिस्थितींमध्ये हृदयाच्या रुग्णांना कमी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. यामागचे कारण काय.. समजून घ्या.
मूत्रपिंडावर वाढलेला ताण
डॉ. मुकेश गोयल म्हणतात की हृदयरोग्यांना अनेकदा सोडियम आणि पोटॅशियमसह इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्याची आवश्यकता असते. कधी कधी जास्त पाणी प्यायल्याने इलेक्ट्रोलाइटची पातळी खराब होऊ शकते. त्याचबरोबर जेव्हा मूत्रपिंड योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा जास्त पाणी प्यायल्याने किडनीवर ताण वाढू शकतो. म्हणून अशा परिस्थितीत काळजी घ्यावी लागते.
हृदयाचे पंपिंग आणि पाणी पिण्याचा संबंध
डॉ. प्रदीप हर्नहल्ली सांगतात की, हृदयाच्या पंपिंगचे काम पाण्याच्या सेवनाशी संबंधित असते. ज्या रूग्णांचे हृदय कमी पंप करते त्यांना इतरांच्या तुलनेत सामान्य प्रमाणातील पाणी सेवनही पंपिंग व्यवस्थापित करण्यात अडचण येऊ शकते. पण कमी पाणी पिण्याचा नियम सर्व हृदयरोग्यांना लागू होत नाही, असे डॉ.प्रदीप सांगतात. कधी-कधी जास्त पाणी प्यायल्याने चालताना किंवा झोपताना श्वास घेण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
किती पाणी प्यावे?
हृदयविकाराच्या रुग्णांनी दिवसातून दीड लिटरपेक्षा जास्त पाणी पिऊ नये, असे डॉ.प्रदीप हर्नहल्ली सांगतात. त्याचबरोबर हृदयरोग्यांनी उन्हाळ्यात २ लिटरपेक्षा जास्त पाणी पिऊ नये. डॉ. मुकुल गोयल म्हणतात की हृदयरोग्यांनी कोणत्याही प्रकारचे द्रवपदार्थ घेण्यापूर्वी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.