एक महिना साखर खाणं सोडलं तर किती कमी होईल वजन? जाणून घ्या काय होतात इतर फायदे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 15:31 IST2025-02-24T15:31:09+5:302025-02-24T15:31:34+5:30
Health Tips : तुम्ही जर सुरूवातीलाच एक महिना साखर खाणं बंद कराल तर त्यानं शरीरात काय बदल होतील? हे आपण आज जाणून घेणार आहोत.

एक महिना साखर खाणं सोडलं तर किती कमी होईल वजन? जाणून घ्या काय होतात इतर फायदे...
Health Tips : लोक रोज वेगवेगळे गोड ड्रिंक पितात आणि वेगवेगळे गोड पदार्थ खातात. यात शुगर जास्त असल्यानं लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोगसारख्या आजारांचा धोका वाढतो. अशात या आजारांचा धोका टाळण्यासाठी तुम्हाला आहारातून शुगर पूर्णपणे दूर करावी लागते का? तुम्ही जर सुरूवातीलाच एक महिना साखर खाणं बंद कराल तर त्यानं शरीरात काय बदल होतील? हे आपण आज जाणून घेणार आहोत.
कमी होईल वजन
एक महिना जर साखर खाणं पूर्णपणे सोडलं तर तुमचं वजन कमी होईल आणि एकंदर आरोग्यही खूप चांगलं होईल. एक्सपर्ट सांगतात की, आहारात अतिरिक्त शुगर दूर केल्यास २ ते ५ किलो वजन कमी करू शकता. हे तुमचं चयापचय, आहार आणि शारीरिक हालचालीवर अवलंबून असेल. साखरेमुळे कॅलरी अधिक वाढतात आणि पोटाच्या आजूबाजूला चरबीही जमा होते.
साखर सोडल्यावर शरीर कसं रिअॅक्ट होतं
साखर खाणं सोडल्यावर काही दिवसांच्या आतच तुम्हाला डोकेदुखी, मूड स्विंग आणि थकवा यांसारखी लक्षणं दिसू लागतात. मात्र, एक आठवड्यानंतर तुमच्या ऊर्जेचा स्तर स्थिर होतो आणि साखरेची किंवा गोड खाण्याची लालसा कमी होते. दुसऱ्या आठवड्यापर्यंत तुमचं पचन चांगलं होतं, त्वचा साफ दिसते आणि फोकसही चांगला होतो.
तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यापर्यंत तुमचं शरीर ऊर्जेसाठी शरीरात जमा चरबी जाळणं सुरू करतं. ज्यामुळे वजन कमी होतं. साखर कमी खाल्ल्यानं सूजही कमी होते, ज्यामुळे मधुमेहाचा धोकाही टळतो आणि हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं. एक्सपर्ट साखरेऐवजी फळं खाण्याचा सल्ला देतात. तसेच प्रोटीन आणि फायबर असलेले पदार्थ खाण्याचाही सल्ला देतात.
एकंदर काय तर एक महिना जर तुम्ही साखर खाणं सोडलं तर शरीरात भरपूर बदल बघायला मिळतील. पचनक्रिया मजबूत होईल, वजन कमी होईल, वेगवेगळ्या आजारांचा धोका कमी होईल. महत्वाची बाब म्हणजे तुम्ही अनेक वर्ष निरोगी जीवन जगू शकाल.