हिवाळ्यात सांधेदुखीपासून सुटका करण्यासाठी 'या' काही खास टीप्स वापराल तर फिट रहाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 11:42 AM2019-12-30T11:42:04+5:302019-12-30T11:47:43+5:30
हिवाळा सुरू झाल्यानंतर अनेकजणांना सांधेदुखी आणि अंगदुखीची समस्या उद्भवत असते.
हिवाळा सुरू झाल्यानंतर अनेकजणांना सांधेदुखी आणि अंगदुखीची समस्या उद्भवत असते. प्रत्येकाच्या सांधेदुखीची कारणं वेगवेगळी असू शकतात पण वातावरणात गारवा वाढल्यानंतर जास्त त्रास होण्याची शक्यता असते कोणतीही क्रीम किंवा पेन रिलिफ लावल्यानंतर तेवढ्यापूरताच बरं वाटत असतं. नंतर पुन्हा गुडघेदुखी तसंच सांधेदुखीची समस्या उद्भवत असते. तर काही वेळा सूज सुद्धा येते.
अशावेळी जर तुम्हाला सांधेदूखीपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. कारण अंगदुखी संबंधित असलेल्या लहान मोठ्या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा वाईट परिणाम होऊन आजार वाढण्याची शक्यता असते. चला तर मग जाणून घेऊया सांधेदुखी होऊ नये म्हणून कोणते उपाय करायला हवेत.
हाडांची हालचाल
सायकलिंगमुले आपली हाडं रोटेशनल मोडमध्ये येत असतात. त्यातून पुरेशी पायांची हालचाल होत असते. त्यामुळे तुम्ही सायकलिंग करणं आवश्यक आहे. यामुळे तुमच्या पायांच्या किंवा मांड्यांच्या ज्या भागात दुखत असेल त्या भागात आराम मिळेल. तसंच शरीर लवचीक राहील. सकाळी चालायला जाणं जर तुम्हाला शक्य असेल तर नक्की चालायला हवं. त्यामुळे तुमचं हृदय चांगलं राहिल.
तुपाचं सेवन करा
तर तुम्ही हिवाळ्यात तुपाचं सेवन कराल तर शरीरासाठी लाभदायक ठरेल. कारण त्यामुळे हाडांना पोषण मिळत असतं. तुपामुळे शरीराला नैसर्गिक घटक मिळतात. शिवाय तुपात ओमॅगा ३ फॅटी असतात ज्यामुळे सांध्यांचे कार्य सुधारते आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
योगा करणे
रोजच्या जगण्यात तुम्ही जर योगाचा समावेश केलात तर शरीर सशक्त, चपळ आणि लवचिक बनेल. रोज न चुकता योगा केला तर तुमच्या शरीराच्या स्नायूंना बळकटी येईल. तुमच्या शरीराची ठेवण सुधारेल. उभे राहताना, बसताना, झोपताना आणि चालताना त्यात एक प्रकारचा डौल येईल. तसंच हाडं दुखण्याचा किंवा गुडघे दुखण्याचा त्रास कमी होईल.
कोवळं ऊन
(image credit-aqualaure)
हाडांची झीज होत असल्यास कॅल्शियमचे हाडांपर्यंत शोषण होण्यासाठी D व्हिटामीन्सची गरज असते. त्यासाठी सकाळचे कोवळे ऊन अंगावर घ्यावे. तसंच संतुलित आहार घेणं सुद्धा तितकच महत्वाचं आहे. आहारात समतोल नसेल तर हाडं कमकूवत व्हायला लागतात.