जिम सोडलीय? फिकर नॉट, या 5 गोष्टी खा आणि फिट व्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 11:26 AM2018-08-23T11:26:54+5:302018-08-23T11:54:36+5:30
धडधाकट शरीरासाठी त्याची देखभाल करणंही तितकंच महत्त्वाचे असेत. जिममध्ये जाऊन व्यायामाच्या मदतीनं वजन घटवलं तर जाऊ शकतं, मात्र..
वाढलेलं वजन कमी करण्यासाठी उत्साहाच्या भरात अनेक जण जिमचा पर्याय स्वीकारतात. काही दिवसांनंतर बऱ्याच जणांना जिमसाठी वेळ मिळत नाही, तर काहींना व्यायामाचा कंटाळाही येऊ लागतो. मग काय, जिमकडे जाणारा मार्ग आपोआप टाळला जातो. पण जिम सोडल्यानंतर फिटनेसच्या तक्रारी पुन्हा निर्माण होतात. उदाहरणार्थ वजन वाढणे, वजन घटणे, अन्य शारीरिक दुष्परिणाम निर्माण होणे. जिममध्ये जाऊन शरीरयष्टी कमावली म्हणजे सर्वकाही मिळालं, असं बऱ्याच जणांना वाटतं. पण धडधाकट शरीरासाठी त्याची देखभाल करणंही तितकंच महत्त्वाचे असेत. जिममध्ये जाऊन व्यायामाच्या मदतीनं वजन घटवलं तर जाऊ शकतं, मात्र त्याचं संतुलन कायम राखणं मोठं आव्हान असतं. जिममध्ये जाणं बंद झाल्यानंतर एकूणच शरीर सुदृढ ठेवणे आणि त्याचे आरोग्य जपणे मुश्किलच नाही तर नामुमकीन होतं. पण जिथे समस्या आहे तिथे उपायही असतो. हा उपाय म्हणजे काही फळांचा, पदार्थांचा आहारात समावेश केल्यास जिममध्ये केलेली तुमची मेहनत वाया जाणार नाही.
या गोष्टींचा आहारात करा समावेश
सफरचंद
असे म्हणतात 'अॅन अॅपल अ डे कीप्स डॉक्टर अवे'. दैनंदिन जीवनात आहारामध्ये एका सफरचंदाचा समावेश केल्यास आरोग्यास अतिशय फायदा होतो. सफरचंदमध्ये फायबर, फ्लेवोनॉइड, बी-केरोटिन यांसारखे पोषक तत्व असतात. शिवाय, यामध्ये असलेले पेक्टिन वजन घटवण्यास मदत करते. नियमित सफरचंद खाल्ल्यास फॅट्स कमी होण्यास मदत होते.
काकडी
कितही वर्कआऊट केलं तरी वजनाचा ताळमेळ राखणं म्हणजे कसरतच असते. दिवसभरात अन्नपदार्थातून जितक्या कॅलरीज् पोटात गेल्या आहेत, त्या बर्न करणंही तितकंच आवश्यक आहे. दुषित पदार्थांच्या सेवनामुळे रक्ताभिसरण प्रक्रियेवरही परिणाम होतो. रक्ताभिसरण योग्यप्रकारे होत नसेल तर शरीरातील दुषित घटक शरीराबाहेर फेकले जाण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो आणि अतिरिक्त चरबी वाढण्यास सुरुवात होते. शरीरातील दुषित घटक बाहेर फेकण्यासाठी मदत होईल, असे पोषक तत्व काकडीमध्ये आहेत. त्यामुळे आहारात काकाडीचा समावेश करावा. काकडीमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते आणि फायबर प्रचंड प्रमाणात असतात.
पालक
पालकमध्ये फायबरचे प्रमाण प्रचंड असते. आपल्या शरीरात फायबर अतिशय सहजरित्या पचते. यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्याही कमी होते.
अंडे
संडे हो या मंडे रोज खाओ अंडे. अंड्यामध्ये प्रोटीन असते, हे शरीरातील कॅलरी बर्न करण्यासाठी मदत करते. सोबतच शरीराला सुदृढ ठेवते आणि अंड्याच्या सेवनामुळे शरीरातील ऊर्जादेखील वाढते.
अॅव्होकाडो
अॅव्होकाडो शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असे फळ आहे. या फळात लेसिथिन अमिनो अॅसिड असते, जे पोटावरील अतिरिक्त चरबी घटवण्यास मदत करते. शिवाय यामध्ये असलेल्या फायबरमुळे वारंवार भूकदेखील लागत नाही. महत्त्वाचे म्हणजे या फळाच्या सेवनामुळे शरीरातील साखरचे प्रमाणही संतुलित राहते.
अशा पद्धतीनं भरपूर प्रमाणात व्यायाम न करताही या गोष्टींचा आहारात समावेश केल्यास वजन नियंत्रणात ठेवता येऊ शकते.