हिवाळा संपताना 'ही' पथ्यं नक्की पाळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 04:14 PM2019-02-02T16:14:27+5:302019-02-02T16:16:08+5:30

सध्या मुंबईतला संपू पाहणारा हिवाळा आणि येऊ घातलेला उन्हाळा, दोन्ही ऋतू आपल्यासोबत काही आजार घेऊन आलेले असतात. मागील लेखात उल्लेख केलेले उलट्या-जुलाब आणि बाळदमा हे त्यापैकी काही आजार.

How to Stay Healthy, Fit and Safe During the end of Winter Season | हिवाळा संपताना 'ही' पथ्यं नक्की पाळा!

हिवाळा संपताना 'ही' पथ्यं नक्की पाळा!

Next

सध्या मुंबईतला संपू पाहणारा हिवाळा आणि येऊ घातलेला उन्हाळा, दोन्ही ऋतू आपल्यासोबत काही आजार घेऊन आलेले असतात. मागील लेखात उल्लेख केलेले उलट्या-जुलाब आणि बाळदमा हे त्यापैकी काही आजार. कोणत्याही आजारांच्या इलाजाच्या अनुषंगाने आहार व इतर पथ्यांची चर्चा तर होतेच.

जुलाब झालेल्या रुग्णांचे पालक ताबडतोब जलसंजीवनी, इतर द्रवपदार्थ, दही, ताक, तांदळाचे पदार्थ अशा जुलाबांना बाधक नसणाऱ्या पदार्थांचे सेवन करण्यास सांगतात व रुग्णांचा आहार त्याप्रमाणे ठरवतात. वर्षानुवर्षे चालत आलेल्या काही साधक व काही बाधक समजुतींचा पगडा आपल्या रोजच्या व्यवहारात आपल्यावर असतो.

दुधामुळे जुलाब वाढतात किंवा जुलाब आटोक्यात येण्यास वेळ लागतो, हा असाच एक समज. हा सर्वस्वी गैरसमज आहे, असेही नाही. काही प्रकारांच्या जुलाबांच्या बाबतीत डॉक्टर स्वत:च रुग्णांचे दुधाचे सेवन बंद करण्यास सांगतात. याला एक प्रमुख अपवाद म्हणजे मातेचे दूध. ते कधीही बंद करू नये.

डिहायड्रेशनमुळे थकलेल्या व शुष्क झालेल्या बालकांना ताकद यावी म्हणून काही पालक ग्लुकोज पावडर घातलेले पाणी पिण्यास देतात. प्रमाणानुसार न तयार केलेले ग्लुकोजचे मिश्रण सेवन केल्याने जुलाब वाढू शकतात. जलसंजीवनीमध्ये साखर व मीठ प्रमाणात असते, त्यामुळे आतड्यातून ते शोषले जाण्यास व शरीराची शुष्कता कमी होण्यास जशी मदत होते, तशी केवळ ग्लुकोज पावडरच्या पाण्याने होत नाही.

खाल्ल्याबरोबर लगेच जुलाब होतात, या कारणास्तव रुग्णांना घनपदार्थाचा आहार देणे टाळले जाते. रुग्णाला ताकद येण्यासाठी सतत थोडेथोडे घनपदार्थ, खासकरून पिष्टमय पदार्थ देणे कधीही योग्य. दूषित अन्नाचे सेवन पोटाच्या विकारांचे कारण असते. एकंदरीतच बाजारातील आणि त्यातही उघड्यावर मिळणारे खाद्यपदार्थ टाळावेत. तळलेले व तिखट पदार्थ आम्लतेला कारणीभूत ठरतात. त्यामुळे पचनाच्या सर्व तक्रारींच्या बाबतीत तिखट व तेलकट पदार्थांचे सेवन टाळावे.

दीर्घकाळ वापरलेले तेल, अतिआंबट व कच्ची फळे, जात्याच जास्त चीक असलेली फळे ( उदा.काजूचे फळ) खोकल्यास कारणीभूत होतात. याचा अर्थ, माफक तेल असलेल्या सर्वच खाद्यपदार्थांनी किंवा सर्वच फळांनी श्वसनविकार बळावतात, असे नाही. वरील उल्लेख करण्याचे कारण की, थंडीच्या मोसमात श्वसनविकार टाळण्यासाठी सरसकट मुलांना दही व फळे देणे टाळले जाते व त्यायोगे त्यांना पोषक अन्नपदार्थांपासून वंचित ठेवले जाते. मुलांना आवडणारी, पिकलेली, ताजी, ऋतुमानानुसार मिळणारी फळे, ताजे दही व ताक आवर्जून मुलांना द्यावे.

काही रुग्णांना ठरावीक अन्नपदार्थांचे सेवन केल्याने जुलाब, बाळदमा, अंगावर पित्ताच्या गांधी उठणे, आम्लता वाढून उलट्या होणे, असे आजार होतात. रुग्णांनी असे आजार बळावण्यास कारणीभूत होणारे पदार्थ जरूर टाळावेत. बऱ्याच व्यक्तींना वैयक्तिक अनुभवाअंती अशा आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या अन्नघटक व इतर घटकांची माहिती होते. त्यांनी अशा प्रकारचे पदार्थ व घटना टाळाव्यात.

Web Title: How to Stay Healthy, Fit and Safe During the end of Winter Season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.