अमेरिकेतील भारतीय डॉक्टरांनी वाचवला कोरोना रुग्णांचा जीव, बचावासाठी दिला अनोखा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 12:28 PM2020-04-16T12:28:35+5:302020-04-16T12:42:52+5:30
अमेरिकेतील भारतीय वंशाच्या डॉक्टरर्सनी असाच एक दावा केला आहे. त्यानुसार कोरोनापासून वाचण्यासाठी सोपा आणि अनोखा सल्ला दिला आहे.
कोरोना व्हायरसचा प्रसार संपूर्ण जगभरात झपाट्याने होत आहे. लोकांना कोरोनापासून वाचवता यावं यासाठी विविध स्तरांवर उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाची लस आणि औषध शोधण्यासाठी सर्वच देशातील शास्त्रज्ञ प्रयत्नरत आहेत. आनंदाची गोष्ट म्हणजे अमेरिकेतील भारतीय वंशाच्या डॉक्टरर्सनी असाच एक दावा केला आहे. त्यानुसार कोरोनापासून वाचण्यासाठी सोपा आणि अनोखा सल्ला दिला आहे.
लाँगआयलंड ज्युइश हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या ४० वर्षीय कोरोना रुग्णाची स्थिती गंभीर होती. त्याला तपासण्यासाठी डॉ. मंगला नरसिंहा यांना फोन आला. त्या नॉर्थवेल हेल्थमध्ये क्रिटिकल केअरच्या प्रादेशिक संचालिका आहेत. डॉ. मंगला यांनी रुग्णाला पोटावर झोपवण्याचा सल्ला दिला. वाचून आश्चर्य वाटेल, पण डॉ. मंगला यांनी दिलेला हा सल्ला यशस्वी ठरला आहे. यांमुळे प्रचंड त्रास सहन करत असलेल्या या रुग्णाला फुफ्फुसामध्ये जास्त ऑक्सिजन मिळण्यास मदत झाली. जेव्हा या रुग्णाला पोटावर झोपवलं तेव्हा रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण ८५ टक्क्यांवरून तब्बल ९८ टक्क्यांवर पोहोचलं.
यावर डॉ. नरसिंहा यांनी सांगितलं की "आम्ही १०० टक्के रुग्णांचा जीव असाच वाचवत आहोत. ही अगदी सोपी गोष्ट आहे आणि यामुळे सुधारणा होत असल्याचं आम्हाला दिसलं आहे. प्रत्येक रुग्णांमध्ये आपण ती पाहू शकतो."
जाणून घ्या रिसर्च
कोरोना व्हायरसमुळे रुग्णांना अनेकदा एक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिन्ड्रोममुळे जीव गमवावा लागतो, म्हणजेच न्यूमोनिया, एन्फ्लूएंजा यांसारख्या आजारांमुळे जीव जातो. तज्ज्ञांच्या मते, पोटावर झोपल्याचा रुग्णाच्या फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन सहज जातं. जेव्हा रुग्ण पाठीवर झोपतो तेव्हा शरीराच्या भारामुळे फुफ्फुसाचा काही भाग दाबला जातो. त्यामुळे शरीराचं कार्य सुरळीत चालतं.
एका रिसर्चनुसार वेंटिलेटरवर असलेल्या ARDS रुग्णांना पोटावर झोपण्यास सांगितलं तर त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता कमी होते.तेव्हापासून यूएसमध्ये वेंटिलेटरवर असलेल्या ARDS रुग्णांना पोटावर झोपवलं जातं. हा रिसर्च न्यू इंग्लड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये ७ वर्षापूर्वी प्रकाशित करण्यात आला होता.