पावसाळ्यात कशी घ्याल बाळाच्या त्वचेची काळजी? तज्ज्ञांनी सांगितले उपाय....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 02:56 PM2021-07-07T14:56:53+5:302021-07-07T14:57:34+5:30

पावसाळ्यात आपल्याला तप्त उन्हाळ्यापासून दिलासा मिळतो खरा; परंतु प्रत्येक पावसाळ्यात तपमान आणि आर्द्रतेत बदल दिसून येतो. पावसाळ्याची सुरूवात आता झाली आहे आणि या काळात बाळाच्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी पालकांनी त्यांच्या बाळाच्या काळजी घेण्याच्या पद्धतीत आणि नित्यक्रमात बदल करण्याची आवश्यकता आहे.

How to take care of baby's skin in the rain? Experts say the solution .... | पावसाळ्यात कशी घ्याल बाळाच्या त्वचेची काळजी? तज्ज्ञांनी सांगितले उपाय....

पावसाळ्यात कशी घ्याल बाळाच्या त्वचेची काळजी? तज्ज्ञांनी सांगितले उपाय....

googlenewsNext

पावसाळ्यात आपल्याला तप्त उन्हाळ्यापासून दिलासा मिळतो खरा; परंतु प्रत्येक पावसाळ्यात तपमान आणि आर्द्रतेत बदल दिसून येतो. पावसाळ्याची सुरूवात आता झाली आहे आणि या काळात बाळाच्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी पालकांनी त्यांच्या बाळाच्या काळजी घेण्याच्या पद्धतीत आणि नित्यक्रमात बदल करण्याची आवश्यकता आहे. नवजात बाळांची त्वचा प्रौढांपेक्षा 40-60 पट पातळ असते आणि म्हणूनच त्या अतिकोमल भागाची काळजी घेणे आणि त्याचे व्यवस्थित पोषण करणे गरजेचे आहे.पावसाळ्यात बाळांच्या त्वचेची काळजी घेण्याच्या सर्वोत्तम पद्धतींसाठी मार्गदर्शक तत्वे पुढीलप्रमाणे :

मालिश करणे
बाळाला तेलाने मालिश करणे हे एक जुने तंत्र आहे. बाळाला त्याचे अनेक लाभ मिळतात. भारतातील जवळजवळ प्रत्येक घरात बाळाला मालिश केले जाते. इंडियन अॅकेडमी ऑफ पेडियाट्रिक्स (आयएपी) या संस्थेच्या मते, योग्य तेलाने, योग्य पद्धतीने मालिश केल्याने बाळाच्या मनावरचे तणाव कमी होतात, ‘कॉर्टिसॉल’ची पातळी कमी होते आणि बाळाची आकलनक्षमता वाढते. जेव्हा बाळ आरामात असते आणि भुकेले नसते, तेव्हाच त्याला मालिश करणे योग्य. त्याला मालिश करण्याची खोली उबदार असावी. आपल्या हातावर थोडे तेल ओतून घ्या आणि ते त्याच्या त्वचेवर हळूवारपणे पसरवा. हे तेल ‘व्हिटॅमिन ई’युक्त, हलके, चिकटपणा नसलेले, खनिज स्वरुपाचे असावे. बाळाच्या अंगावर कडकपणे मालिश करू नये. त्याऐवजी, वरच्या दिशेने चोळणे, हात वर्तुळाकार फिरवणे अशा पद्धतींनी त्याच्या पुढील व मागील अंगाला हळूवारपणे मालिश करावे. या जेंटल स्पर्शामुळे पालक आणि मूल यांच्यात भावनिक बंध निर्माण होतात. बाळाच्या त्वचेत या मालिशमुळे उबदारपणा निर्माण होतो. पावसाळ्याच्या बदलत्या तपमानात हा उबदारपणा बाळाला लाभदायी ठरतो.

सहजपणे अंघोळ घालणे
मालिशप्रमाणेच अंघोळीच्या वेळीही आपल्याला बाळासह मौल्यवान क्षण घालवता येतात. पावसाळ्यात बाळाला दररोज अंघोळ घालणे आवश्यक नसते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा त्याला अंघोळ घातली, तरी ते पुरेसे ठरते. एखाद्या उबदार खोलीमध्ये कोमट पाण्याने बाळाला अंघोळ घालावी. बाळाच्या अंघोळीसाठी पालक ‘बेबी क्‍लेन्जर’ किंवा ‘बेबी सोप’ निवडू शकतात. ही उत्पादने ‘पैराबिन’, कृत्रिम रंग आणि ‘थॅलेट्स’पासून मुक्त असल्याची आणि वैद्यकीयदृष्ट्या सौम्य व मुलाच्या त्वचेसाठी योग्य असल्याची खात्री करून घ्यावी. ‘मिल्क प्रोटिन’ आणि ‘व्हिटॅमिन ई’ने समृद्ध असलेला ‘बेबी सोप’ हा सर्वोत्तम असतो; कारण तो त्वचेवरील जंतू हळूवारपणे धुवून टाकतो आणि त्वचा मऊ व सौम्य करतो. साबणाप्रमाणेच,  नैचुरल मिल्‍क एक्‍सट्रैक्‍ट्स, राइस ब्रैन प्रोटीन व 24 तास मॉइश्चरायझिंग यांसारख्या घटकांनी युक्त असे ‘बेबी वॉश’देखील बाजारात सहज उपलब्ध आहेत. अंघोळ झाल्यावर बाळाला मऊ आणि उबदार टॉवेलने पुसावे. त्याच्या अंगावरील वळ्यांखालील भागदेखील व्यवस्थित कोरडे करावेत; जेणेकरून त्याच्या त्वचेवर पुरळ येणार नाही.

मॉइश्चरायझिंग महत्वाचे
एका संशोधनानुसार, भारतातील 3 पैकी 2 बाळांची त्वचा कोरडी असते. चांगले मॉइश्चरायझिंग क्रीम किंवा लोशन वापरल्यास बाळाच्या त्वचेमध्ये ओलावा टिकून राहण्यास मदत होते. हे चांगले उत्पादन केवळ पोषणच देत नाही तर बाळाच्या त्वचेचे रक्षणदेखील करते. ग्लिसरीन किंवा मिल्‍क एक्‍सट्रैक्‍ट्स व राइस ब्रैन प्रोटीन असलेली, 24 तासांची ‘लॉकिंग सिस्टम’ असलेली लोशन्स यासाठी वापरली जाऊ शकतात. विशेषत: अंघोळीनंतर ती वापरावीत. मॉइश्चरायझर वापरताना, ते दोन्ही हातांवर थोडे घ्या आणि बाळाच्या पुढील व मागील बाजूस हृदयाच्या आकारात लावा. ‘व्हिटॅमिन ई’ व मिल्‍क एक्‍सट्रैक्‍ट्स असलेले ‘बेबी क्रीम’ बाळाच्या चेहऱ्यावर लावावे आणि उर्वरित शरीरावर लोशन वापरावे.

डायपर वापराबाबत काळजी
डायपर लावावयाच्या भागाची काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे. पावसाळ्यातील आर्द्र हवामानात ओल्या व घट्ट डायपरमुळे बाळाला त्या भागात खूप घाम येतो. परिणामी डायपरच्या भागात लाल चट्टे उमटतात, तेथील त्वचेची जळजळ होते आणि गुदद्वारापाशी जंतूसंसर्ग होऊ शकतो. शक्य असेल तेव्हा नेहमी डायपर बदलावा किंवा बाळाला डायपर-मुक्त ठेवावे. डायपरची जागा स्वच्छ करण्यासाठी मॉइश्चरायझिंग सामग्रीसह ‘अल्कोहोल-मुक्त वाइप्स’ वापरावेत. डायपरचे क्षेत्र स्वच्छ व कोरडे ठेवल्यास पुरळ टाळता येईल. पुरळ उठण्याची समस्या कायम राहिली, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आरामदायी कपडे
पावसाळ्यात संपूर्ण लांबीचे सुती कपडे घातल्यास, त्वचेला ताजी हवा मिळेल. त्यामुळे पुरळ टाळता येईल आणि डास चावण्यापासून बचाव होईल. जास्त पावसामुळे तपमान कमी झाल्यास, बाळाला मऊ वूलन स्वेटर घालावा.
-डॉ. प्रदीप सूर्यवंशी, प्राध्यापक व प्रमुख, नवजात शिशू चिकीत्सा विभाग, बीव्हीयू मेडिकल कॉलेज, पुणे, आणि सदस्य, इंडियन अ‍ॅकेडमी ऑफ पेडियाट्रिक्स (आयएपी)

 

Web Title: How to take care of baby's skin in the rain? Experts say the solution ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.