मानसिक आजारांचा सामना कसा कराल?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 11:48 AM2023-11-05T11:48:53+5:302023-11-05T11:49:06+5:30

आयुष्यात प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर मानसिक आजारांना सामोरे जात असतो. 

How to deal with mental illness? | मानसिक आजारांचा सामना कसा कराल?

मानसिक आजारांचा सामना कसा कराल?

आजही आपल्याकडे मानसिक आजाराबाबत फारसे बोलले जात नाही. हा आजारसुद्धा इतर आजारप्रमाणेच आहे. या आजारावरसुद्धा उत्तम उपचार पद्धती आहे. गेल्या काही वर्षांत काही सेलिब्रिटी मानसिक आजाराबद्दल त्यांचे अनुभव शेअर करत आहेत. विशेष म्हणजे, समाजातून त्यांना सहकार्य मिळत आहे. त्यांना कुणी हिणवत नाही. मात्र, सामान्य नागरिकांमध्ये आजही या आजाराबद्दल मनात साशंकता असते. आयुष्यात प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर मानसिक आजारांना सामोरे जात असतो. 

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आय.सी.एम.आर.) २०१९ मध्ये मानसिक आजारावरील विस्तृत पद्धतीने अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालाचा आधार घेऊनच देशातील मानसोपचारतज्ज्ञ आपली मते व्यक्त आकारात असतात. त्यामधील आकडेवारीनुसार १९ करोड ७० लाख भारतीयांना कोणत्या तरी स्वरूपाचा मानसिक आजार आहे. त्यानुसार देशात सरासरी सात व्यक्तींमधील एकाला मानसिक आजार असल्याचे या अहवालातून पुढे आले होते. त्यामध्ये नैराश्य चिंता आजार ( एन्जायटी डिसऑर्डर ) स्किझोफ्रेनिया, बायपोलार डिसऑर्डर, आचरण विकार, या विकारांचा समावेश होता. 

काही मूलभूत मानसिक विकार
एचडीएचडी विकार :
अटेन्शन डेफिसिट, हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर हा विकार विशेष करून शाळेत शिकणाऱ्या मुलांमध्ये आढळून येतो. या विकारामध्ये विद्यार्थ्यांच्या लक्षात राहत नाही. ते सतत विसरतात. समजून न घेणे, वर्गात गडबड करणे, शांत न बसणे अशी लक्षणे असतात. हे विद्यार्थी अभ्यासात कमी पडत असल्याने त्यांना ‘ढ’ म्हणून चिडवतात. 
व्यसन विकार : संबंधित व्यक्ती प्रमाणाबाहेर व्यसन करतात. त्यांना कायम वाटत असते की, जर हे व्यसन केले नाही तर त्रास होईल. ते कायम या व्यसनावर अवलंबून असतात. या व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेलेल्या असतात. विशेष करून जे अमली पदार्थ, चरस घेतात त्यांना जर या गोष्टी मिळाल्या नाही तर ते स्वतःला किंवा इतरांना इजा पोहोचवतात.

वर्तन विकार : या विकारात व्यक्तीच्या वर्तनात सतत बदल होत असतात. एका वेळी ते खूप आनंदात असतात, तर कधी खूपच दु:खी असतात. तर कधी त्या खूप रागावतात. त्यांचे वागणे सर्वसाधारण नसते. ते विचित्र वागत असतात.
अस्वस्थता विकार : व्यक्ती कायम अस्वस्थ असते. तिची सतत चीड-चीड होत असते. मनात अकारण भीती निर्माण होते. छातीची धडधड वाढलेली असते. एकच विचार मनात वारंवार घोळत राहतो.

खाण्याचा विकार :
या विकारात व्यक्ती आपण काही खाल्ले तर वजन वाढेल म्हणून काही खात नाही. काही वेळा त्यांनी काही अतिरिक्त खाल्ले तर उलटी करून बाहेर काढतात. याउलट काही व्यक्ती या विकारात प्रचंड खात राहतात. त्यांना जेवण कमी मिळाले तर ते खूप त्रागा करतात.

शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा विशेष संबंध आहे, हे निर्विवाद सिद्ध झालेले आहे. मानसिक आजार आरोग्य संवर्धन करणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनावरही परिणाम करतात. समजून उमजून आहार घेण्याच्या सवयी, आवश्यक व्यायाम करण्याच्या सवयी, निर्व्यसनी राहण्याचा निश्चय, सुरक्षित लैंगिक सवयी, वैद्यकीय उपचारांचे शिस्तबद्ध पालन या सगळ्या आरोग्याशी निगडित असलेल्या गोष्टी निरोगी मनाला व्यवस्थित कळतात. याकरिता मानसिक आरोग्याचे महत्त्व संपूर्ण आरोग्यासाठी अधोरेखित केले जाते. मानसिक आरोग्य कसे जतन करायचे तर निरोगी जीवनशैली आणि सुदृढ वर्तन व विचार संवर्धित करायचे. आपला मूड सुधारायचा, तणाव नियोजन करायचे, स्पष्ट शास्त्रशुद्ध विचार करायचे. योगासने आणि प्राणायाम करायचा, व्यायाम करायचा, आहाराचे नियोजन करायचे. 
डॉ. शुभांगी पारकर, 
मानसोपचार तज्ज्ञ, माजी अधिष्ठाता के.इ.एम. रुग्णालय

जर तुम्हाला एखादी व्यक्ती काही सांगत असेल तर त्याचे ऐकून घ्या. त्याला केवळ मानसिक आहे काहीतरी असे म्हणू नका. त्याला एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्याचा सल्ला द्या. प्रत्येक व्यक्तीने मानसिक आरोग्याचा शिपाई झाले पाहिजे. या विषयावर लोकांचे ऐकायला शिकले पाहिजे, तसेच त्यांना शास्त्रीय सल्ला दिला पाहिजे. या विषयावर खुलेपणाने चर्चा केली पाहिजे. कुठल्यातरी गोष्टीचा मानसिक ताण आला, म्हणून व्यसनाच्या आहारी जाऊ नका. कोणतेही व्यसन हे वाईट आणि त्याचे आरोग्यावर वाईट परिणाम होत असतात.  मानसिक आजारांपासून स्वताला सावरायचे असेल तर रोज सकाळी ४० ते ५० मिनिटे चांगला व्यायाम करा. मानसिक आरोग्य चांगले असेल, तर आयुष्य निरोगी राहते.
डॉ. सागर मुंदडा,
 मानसोपचार 
तज्ज्ञ

Web Title: How to deal with mental illness?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.