‘झिका’ला असे राेखा !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 08:42 AM2024-07-14T08:42:59+5:302024-07-14T08:43:40+5:30

झिका विषाणू हा फ्लॅव्हीव्हायरस प्रजातीचा असून, तो एडिस डासांकडून पसरतो

How to prevent Zika virus transmission | ‘झिका’ला असे राेखा !

‘झिका’ला असे राेखा !

डॉ. महेंद्र जगताप
राज्य कीटकशास्त्रज्ञ, सहसंचालक, हिवताप, हत्तीराेग व जलजन्य विभाग, आराेग्य सेवा

झिका विषाणू हा फ्लॅव्हीव्हायरस प्रजातीचा असून, तो एडिस डासांकडून पसरतो. विशेष म्हणजे हा डास दिवसा चावतो. हा आजार १९४७ साली युगांडा देशातील काही माकडांमध्ये आढळला हाेता. त्यानंतर १९५२ साली युगांडा आणि टांझानिया देशात प्रथमच माणसांमध्ये हा आजार दिसून आला.

एडिस इजीप्ताय, एडिस अल्बोपिक्टस व एडिस विटाटस यांच्यामार्फतच या आजारांचा प्रसार होत असतो. या डासांचे वैशिष्ट्य म्हणजे यांच्या अंगावर आणि पायावर पांढरे पट्टे दिसून येतात. तसेच रंगाने काळपट असतात. हा आजार डासांव्यतिरिक्त इतर पद्धतीने लैंगिक संपर्काद्वारे, गर्भधारणेदरम्यान, आईपासून गर्भापर्यंत संक्रमित होतो. 

निदान कसे कराल?  

नवी दिल्लीतील राष्ट्रीय रोगनिदान संस्था, पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था व देशात १३१ ठिकाणी झिका या आजाराच्या निदानाची सुविधा मोफत उपलब्ध आहे. 

उपचार काय? 

झिका विषाणूने आजारी असलेल्या लोकांनी भरपूर आराम करावा, भरपूर द्रवपदार्थ प्यावेत, वेदना आणि तापासाठी पॅरासिटामॉल आणि अँटीहिस्टामिनिक उपचार घ्यावा. 

ॲस्पिरीनसारख्या औषधांचा वापर करू नये. लक्षणे तीव्र असल्यास त्यांनी संदर्भीय वैद्यकीय सेवा आणि सल्ला घ्यावा. झिका आजारावर कोणतीही लस नाही.

लक्षणे काय? 

‘झिका’ची लक्षणे सर्वसाधारणपणे डेंग्यू आजारासारखी असतात. त्यामध्ये ताप, अंगावर रॅश उमटणे, डोळे येणे, सांधे व स्नायूदुखी, थकवा आणि डोकेदुखी या लक्षणांचा समावेश होतो. तसेच चक्कर येणे, हातापायांना सूज, डोळ्यांच्या खोबणीत वेदना, घसा खवखवणे, खोकला, अल्सर, पाठदुखी, घाम येणे ही इतर लक्षणे आहेत.

गुंतागुंत काय?

गरोदरपणात झिका विषाणूची बाधा झाल्यास होणाऱ्या अर्भकाच्या डोक्याचा घेर हा ३१ सेंमीपेक्षा कमी आढळल्यास त्या बालकाला ‘मायक्रोसिफॅली’ हा आजार झाला असण्याची शक्यता असते. इतर जन्मजात विकृती, मुदतपूर्व जन्म आणि गर्भपात होऊ शकतो. दुसरा धोका ‘गिया बारी सिंड्रोम’ या आजारामध्ये स्वतःची रोगप्रतिकारशक्ती त्यांच्या शरीराच्या मज्जातंतूंना इजा करते. यामुळे स्नायू कमकुवत होतात आणि कधी कधी अर्धांगवायू होतो.

प्रतिबंधात्मक उपाययोजना 

झिकाबाधित जिल्ह्याने/मनपाने आपल्या कार्यक्षेत्रातील ताप रुग्ण सर्वेक्षण आणि कीटकशास्त्रीय सर्वेक्षण अधिक सुदृढपणे करणे आवश्यक आहे.

उद्रेकग्रस्त गावामध्ये तसेच त्याच्या आजूबाजूच्या ५ किमी परिसरामधील गावांमध्ये १०० टक्के गृहभेटी, खासगी वैद्यकीय व्यावसायिक व प्रयोगशाळांना भेट देऊन तेथील तापरुग्णांची व सर्व गर्भवती महिलांची नोंद घेऊन सर्व गर्भवती महिलांचे रक्तजल नमुने संकलित करावेत आणि ते एनआयव्ही, पुणे येथे तपासणीसाठी पाठवावेत.  

जनतेने काय करावे? 

या आजारात रुग्णालयात भरती व्हावे लागत नाही तसेच मृत्यूचे प्रमाणही अत्यंत नगण्य आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची अजिबात आवश्यकता नाही. ताप आल्यास त्वरित सरकारी दवाखान्यामध्ये दाखवावे. शक्यताे मच्छरदाणीतच झाेपावे.

उपचार सरकारी दवाखान्यांमध्ये मोफत आहेत. घरातील, गावातील सर्व पाणीसाठे वाहते करावेत, साठवलेल्या पाण्याची भांडी कापडाने झाकून घ्यावीत, जे सिमेंटचे कंटेनर रिकामे करता येत नाहीत, अशामध्ये गप्पी मासे किंवा टेमिफोस या अळीनाशकांचा वापर करावा.
 

Web Title: How to prevent Zika virus transmission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.