ती पुन्हा सावरली त्याची गोष्ट..! स्ट्रेस रिस्पॉन्स सिण्ड्रोमची लक्षणं कशी ओळखायची?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 06:01 IST2025-02-09T06:00:39+5:302025-02-09T06:01:01+5:30

आयुष्यात आकस्मिक आघात होत असतात. अशा परिस्थितीत न डगमगता समोर उभे ठाकलेले आव्हान स्वीकारावे लागते; पण त्यातून सावरण्याची शक्ती आपल्यात निर्माण होऊ शकते, याची खात्री असायला हवी.

How to recognize the symptoms of stress response syndrome? | ती पुन्हा सावरली त्याची गोष्ट..! स्ट्रेस रिस्पॉन्स सिण्ड्रोमची लक्षणं कशी ओळखायची?

ती पुन्हा सावरली त्याची गोष्ट..! स्ट्रेस रिस्पॉन्स सिण्ड्रोमची लक्षणं कशी ओळखायची?

डॉ. विद्याधर बापट 
मानसोपचार तज्ज्ञ

आदित्यचा तरुण वयात अपघाती मृत्यू झाला. त्याच्या अचानक जाण्याने पदरी दोन मुले असलेल्या श्वेतावर आकाश कोसळले. तिच्या आणि आदित्यच्या मित्र-मैत्रिणींनी, नातेवाइकांनी तिला भरपूर आधार दिला. आदित्यच्या ऑफिसने नियमाप्रमाणे श्वेताला नोकरीही दिली; मात्र श्वेता खचून गेली होती.  श्वेताला महिनाभरात आदित्यच्या ऑफिसमध्ये रुजू व्हायचे होते. धीर एकवटून ती दु:खातून सावरू पाहत होती. तिने आदित्यच्या ऑफिसमध्ये जाण्यास सुरुवात केली. मात्र, मुख्य अडचण तर पुढेच होती. तिला ऑफिसच्या नवीन वातावरणाशी जुळवून घेता येईना. ऑफिसची इमारत दिसली तरी श्वेता अस्वस्थ व्हायला लागली. दिवसभर ती कशीबशी ऑफिसमध्ये थांबायची. काम शिकण्याचा मनापासून प्रयत्न करायची. साहेबांनी बोलावले तरी तिला दडपण यायचे. कामात लक्ष लागायचे नाही. 

सुरुवातीला नवीन असल्याने होत असेल असे म्हणून तिला सगळ्यांनी समजावले. कसेबसे दोन महिने गेले आणि श्वेताला शारीरिक-मानसिक अस्वस्थता विलक्षण वाढल्याचे लक्षात आले. ऑफिसला गेले की मळमळायला लागणे, डोकेदुखी वाढणे, हातपाय थरथर कापणे, असे त्रास होऊ लागले. सर्व शारीरिक तपासण्या केल्या; मात्र त्यातून काही निष्पन्न झाले नाही. आदित्यच्या अकाली जाण्याने नैराश्याबरोबरच ॲडजेस्टमेंट डिसऑर्डर किंवा स्ट्रेस रिस्पॉन्स सिण्ड्रोमची ही लक्षणे होती.  ॲडजेस्टमेंट डिसऑर्डरची लक्षणे घटना घडून गेल्यानंतर किंवा विपरित स्थिती निर्माण झाल्यावर साधारणत: तीन-चार महिन्यांत दिसू लागतात. ही लक्षणे आठ-दहा महिन्यांपर्यंत टिकतात. परिस्थिती बदलली किंवा उपचारांमुळे लक्षणे हळूहळू नाहीशी होतात. 

लक्षणे काय ? 

अस्वस्थता, चिडचिडेपणा, निराश वाटणं, असाहाय्य वाटणे, मधूनच रडू येणे, सतत पूर्वीची त्रास नसतानाची स्थिती आठवत राहणे, लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करणं, ऑफिस/शाळा/कॉलेजला जाणे टाळणे, छातीत धडधडणे, घाम येणे, हात थरथरणे, अपचन तसेच डोकं दुखणे. 

उपचार काय?

डायलेक्टिकल बिहेव्हियर थेरपी : ही थेरपी, कॉग्निटिव्ह बिहेव्हरल थेरपी (सीबीटी) या दोन्ही पद्धतींमध्ये तुमचे विचार, भावना आणि वर्तन व त्यांचा एकमेकांवर होणारा परिणाम तपासला जातो. 

विशेषतः, चुकीची विचार करण्याची पद्धत ही अंतिमतः वागणुकीवर, तिच्या विपरीत परिणामांवर आणि मन:स्वास्थ्यावर कशी परिणाम करते, हे लक्षात आणून दिले जाते. वेगवेगळ्या युक्त्या वापरून विचार, भावना आणि वर्तन सुधारण्याची कौशल्ये शिकवली जातात.  विपरीत किंवा बदललेल्या परिस्थितीचा स्वीकार करायला शिकवले जाते. घडलेल्या घटनेचा विनाअट स्वीकार करायला शिकवले जाते. मग मन:स्वास्थ्य सुधारायला लागते. आज श्वेता नोकरीत छान स्थिरावली आहे. तिने दु:ख स्वीकारायची, त्याच्याकडे साक्षीभावाने पाहायची आणि नव्याने आव्हान पेलण्याची शक्ती स्वत:मध्ये निर्माण केली आहे.

Web Title: How to recognize the symptoms of stress response syndrome?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.